संरक्षण मंत्रालय
भारत आणि श्रीलंकेचा संयुक्त लष्करी सराव ‘मित्र शक्ती’चा श्रीलंकेतील मादुरु ओया येथे प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2024 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2024
भारत आणि श्रीलंकेचा संयुक्त लष्करी सराव ‘मित्र शक्ती’ची 10 वी आवृत्ती आज, श्रीलंकेतील मदुरु ओया येथील आर्मी ट्रेनिंग स्कूल येथे सुरू झाली. हा सराव 12 ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत होत आहे.
106 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व राजपुताना रायफल्सच्या बटालियन करत असून या दलात इतर सशस्त्र दल आणि सेवेतील जवानांचा देखील समावेश आहे. श्रीलंकेच्या तुकडीचे प्रतिनिधित्व श्रीलंकन सैन्याच्या गजाबा रेजिमेंटचे जवान करत आहेत. संयुक्त सराव ‘मित्र शक्ती’ हा भारत आणि श्रीलंकेत आयोजित केला जाणारा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा युद्ध सराव भारत आणि श्रीलंकेत आलटून पालटून आयोजित केला जातो. या सरावाची मागील आवृत्ती नोव्हेंबर 2023 मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आली होती.
या संयुक्त सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यातील अध्याय VII अंतर्गत उप-पारंपरिक परिस्थितीत बंडखोरीविरोधी कारवाया करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा आहे. हा सराव अर्ध-शहरी वातावरणातील मोहीमेवर लक्ष केंद्रित करेल.

सरावाच्या दरम्यान करायच्या सामरिक कवायतींमध्ये दहशतवादी कारवाईला प्रतिसाद, संयुक्त कमांड पोस्टची स्थापना, गुप्तचर आणि निगराणी केंद्राची स्थापना, हेलिपॅड किंवा लँडिंग साइट सुरक्षित करणे, लहान तुकड्या तैनात करणे आणि त्या माघारी बोलावणे, स्पेशल हेलिबोर्न ऑपरेशन्स आणि कॉर्डन यासह ड्रोन आणि काउंटर ड्रोन प्रणालीच्या अंमलबजावणीव्यतिरिक्त शोध मोहीम यांचा समावेश आहे.
युद्ध सराव ‘मित्र शक्ती’ दोन्ही देशांना रणनीती, तंत्रे आणि संयुक्त मोहीमा चालवण्याच्या प्रक्रियेतील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल. हा सराव दोन्ही देशांच्या सैन्यांमधील आंतर-कार्यक्षमता, सौहार्द आणि परस्पर सौहार्द विकसित करण्यास मदत करेल. या संयुक्त सरावामुळे दोन्ही मित्र राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होऊन संरक्षण सहकार्य देखील वृद्धिंगत होईल.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2044651)
आगंतुक पटल : 171