सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार उद्या नवी दिल्लीत नशा मुक्त भारत अभियानात देणार सामूहिक प्रतिज्ञा
'विकसित भारताचा मंत्र, भारत व्हावा नशेपासून स्वतंत्र' ही या अभियानाची मुख्य संकल्पना
Posted On:
11 AUG 2024 5:38PM by PIB Mumbai
भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, अंमली पदार्थ मुक्त भारत अभियान (NMBA) पाचव्या वर्षात प्रवेश करत आहे. या अभियानाचा हा महत्वपूर्ण टप्पा लक्षात घेऊन, सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग देशभरात अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध सामूहिक प्रतिज्ञा समारंभ आयोजित करत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, डॉ. वीरेंद्र कुमार, 12 ऑगस्ट, 2024 रोजी नवी दिल्लीतील बाराखंबा मार्गावरील मॉडर्न स्कूल मधील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ मुक्त भारत अभियाना अंतर्गत सामूहिक प्रतिज्ञा देणार आहेत. 'विकसित भारताचा मंत्र, भारत व्हावा नशेपासून स्वतंत्र' ही या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे, केंद्रीय मंत्रालये, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम, तंत्र विद्यानिकेतन महाविद्यालय, फॅशन इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटना आणि इतर सार्वजनिक संस्थांचे विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद देखील अंमली पदार्थांच्या वापराविरुद्ध शपथ घेतील तर इतर, ऑनलाइन माध्यमातून या शपथ सोहळ्यात सहभागी होतील.
अंमली पदार्थांचा वापर ही एक अशी समस्या आहे जी देशाच्या सामाजिक जडणघडणीवर विपरित परिणाम करत आहे. कोणत्याही अंमली पदार्थावरच्या अवलंबित्वामुळे व्यक्तीच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण समाजही विस्कळीत होतो. मनावर परिणाम करणाऱ्या विविध पदार्थांचे नियमित सेवन केल्याने व्यक्तीचे त्या पदार्थावरचे अवलंबित्व वाढते. काही अंमली पदार्थ संयुगे न्यूरो-मानसिक विकार, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासोबतच अपघात, आत्महत्या आणि हिंसा अशा गोष्टींसाठी कारणीभूत ठरू शकतात. म्हणून, अंमली पदार्थांचा वापर आणि त्यावरील अवलंबित्व याकडे मानसिक-सामाजिक-वैद्यकीय समस्या म्हणून पाहण्याची गरज आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 15 ऑगस्ट 2020 रोजी अंमली पदार्थ मुक्त भारत अभियानाचा (NMBA) प्रारंभ केला होता. ऑगस्ट 2023 पासून हे अभियान देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे. लोकांपर्यंत पोहोचून अंमली पदार्थांच्या वापराविषयी जागरूकता पसरवण्याचा अंमली पदार्थ मुक्त भारत अभियानाचा (NMBA) मानस आहे. अंमली पदार्थांच्या वापरावर अवलंबून असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना ओळखण्यासाठी उच्च शैक्षणिक संस्था, विद्यापीठ परिसर, शाळा इत्यादींवर मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले आहे. रुग्णालये, पुनर्वसन केंद्रांमध्ये समुपदेशन आणि उपचार सुविधा प्रदान करणे तसेच सेवा प्रदात्यांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रम सुलभ करणे हे अंमली पदार्थ मुक्त भारत अभियानाचे (NMBA) उद्दिष्ट आहे.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044323)
Visitor Counter : 76