राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तिमोर-लेस्टे ला  भेट, तिमोर-लेस्टेचे राष्ट्रपती  आणि पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीत परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर केली चर्चा


तिमोर-लेस्टे कडून  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘द ग्रँड-कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

Posted On: 10 AUG 2024 9:02PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर-लेस्टे या तीन देशांच्या दौऱ्यावर असून, आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात त्या आज सकाळी (10 ऑगस्ट, 2024) तिमोर-लेस्टे ची राजधानी दिली येथे पोहोचल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी या देशाला दिलेली ही पहिलीच भेट आहे.

तिमोर- लेस्टेचे राष्ट्रपती  जोसे रामोस-होर्टा यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे विमानतळावर स्नेहमय स्वागत केले.

गव्हर्नमेंट पॅलेसमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांचे समकक्ष राष्ट्रपती होर्टा यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत आणि तिमोर- लेस्टे यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या संधींवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये माहिती तंत्रज्ञान, फिनटेक, आरोग्य सेवा, कृषी आणि क्षमता विकास यांसारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी विपुल संधी असल्याचे त्या म्हणाल्या. भारत तिमोर- लेस्टेचा कायमस्वरूपी भागीदार राहील, असे आश्वासन त्यांनी राष्ट्रपती  होर्टा यांना दिले. राष्ट्रपती  होर्टा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘ग्रँड-कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ हा त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. सार्वजनिक सेवा आणि शिक्षण, समाजकल्याण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, हा सन्मान भारत आणि तिमोर-लेस्टे यांच्यातील मैत्रीच्या नात्याचे प्रतिबिंब आहे.

बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी निवेदन जारी केले.

त्यानंतर तिमोर-लेस्टेचे पंतप्रधान काय राला क्साना गुस्माओ यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि पर्यटन यासारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान गुस्माओ यांच्या उपस्थितीत, i) सांस्कृतिक देवाणघेवाण, (ii) प्रसार भारती आणि ‘तिमोर-लेस्टे रेडिओ आणि टेलिव्हिजन’ (RTTL) यांच्यातील सहयोग, (iii) राजनैतिक, अधिकृत आणि सेवा पासपोर्ट धारकांसाठी व्हिसाच्या अटीतून सूट, या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. हे सामंजस्य करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करतील, असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,  RTTL वर, राष्ट्रपती जोसे रामोस-होर्टा यांनी सूत्रसंचालन केलेल्या "प्रेसिडेंट होर्टा शो", या दूरचित्रवाणी कार्यक्रमात सहभागी झाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी त्यांचा जीवन प्रवास, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी भारत सरकारने हाती घेतलेले उपक्रम आणि महिला सक्षमीकरणाबाबतचा त्यांचा दृष्टीकोन, यावर आपले विचार मांडले.

तिमोर-लेस्टे येथील भारताच्या राजदूतांनी आयोजित केलेल्या भारतीय समुदायाच्या संमेलनात राष्ट्रपती सहभागी झाल्या. या मेळाव्याला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, तिथले भारतीय नागरिक विविध संस्कृतींना जोडणारी आणि सीमांच्या पलीकडे सद्भावना पोहोचवणारी ऊर्जा आहेत. तिमोर-लेस्टेबरोबर सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

दिवसभरातील अखेरच्या औपचारिक कार्यक्रमा अंतर्गत, राष्ट्रपती  जोस रामोस-होर्टा यांनी पलासिओ नोब्रे डी लोहाने येथे राष्ट्रपती मुर्मू यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते.

राष्ट्रपती आपला तिन्ही देशांचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून, उद्या (11 ऑगस्ट, 2024) नवी दिल्लीला रवाना होतील.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2044181) Visitor Counter : 24