पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जगातली तिसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या भारताच्या उद्दिष्टपूर्तीत महत्वाचे योगदान देण्याची पर्यटन उद्योग क्षेत्रात क्षमता -केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत

Posted On: 03 AUG 2024 4:51PM by PIB Mumbai

 

7 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य प्रदर्शनाचे (IHE 2024) उद्घाटन आज केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते झालं.  इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट इथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सातव्यांदा यशस्वीरित्या आयोजित होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य प्रदर्शनाचा भाग होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना गजेंद्रसिंह शेखावत यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात व्यक्त केली. या प्रदर्शाने गेल्या सहा वर्षांमध्ये भारताच्या आदरातिथ्य उद्योग क्षेत्राला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी सांगितले.  भारतीय आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य प्रदर्शनामुळे भारताच्या आदरातिथ्य उद्योग क्षेत्राला केवळ पाठबळच मिळत नाही, तर भारतातील या उद्योग क्षेत्राच्या क्षमतेला जागतिक पटलावर अधोरेखीत करण्याचे कामही या प्रदर्शनामुळे होत आहे अशा शब्दांत त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. हे केवळ प्रदर्शन नसून, हे प्रदर्शन म्हणजे आदरातिथ्य उद्योग क्षेत्राचे केंद्रस्थान आहे, या प्रदर्शनामुळे या क्षेत्राशी संबंधित आणि जोडल्या गेलेल्या उद्योजक - व्यावसायिकांना एकत्र येण्याची, परस्परांसोबत संकल्पनांची  देवाणघेवाण करण्याची, या क्षेत्राबद्दलच्या परस्परांकडील ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवण्याची संधी मिळते असे मतही केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.

जगातली तिसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या भारताच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महत्वाचे योगदान देण्याची क्षमता पर्यटन उद्योग क्षेत्रात असल्याचेही शेखावत यांनी आपल्या संबोधनात सांगितले. आपल्या देशातले पर्यटन क्षेत्र हे जागतिक दर्जाचे आहे ही बाब अधोरेखित करण्यासाठी आवश्यक सर्व संसाधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्राच्या नंतर पर्यटन हे सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे असे ते म्हणाले.

आपले केंद्र सरकार पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योग क्षेत्राला सर्वोत्तम  बनवण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही देखील शेखावत यांनी यावेळी दिली. हे सरकार नुकतेच स्थापन झाले आहे, मात्र सरकार स्थापन होताच केवळ 40 दिवसांच्या अवधीतच देशात जागतिक वारसा समितीच्या बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीत 170 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि सद्यस्थितीत भारत हा जगभराच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून उदयाला येऊ लागला आहे असेही त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनात व्हिएतनामधून आलेले प्रतिनिधी त्यांची उत्पादने प्रदर्शनात प्रदर्शित करणार आहेत. या दरम्यान व्हिएतनामचे शेफ / आचारी देखील त्यांच्या मूळ पाककृतींवरच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाची सत्रे आयोजित करणार आहेत. यंदाच्या प्रदर्शनात हिमाचल प्रदेशाला मध्यवर्ती राज्य (फोकस स्टेट)  म्हणून घोषित केले गेले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशाला एक प्रदर्शक या नात्याने आपल्या क्षमतांचे दर्शन जगाला घडवण्याची संधी मिळाली आहे.

A group of people sitting on tablesDescription automatically generated

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041144) Visitor Counter : 65