भूविज्ञान मंत्रालय
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने साजरा केला 18 वा स्थापनादिन : लोकोपयोगी आणि जनहिताचे महत्वपूर्ण दस्तऐवज केले प्रकाशित
Posted On:
27 JUL 2024 3:37PM by PIB Mumbai
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने आज पृथ्वी भवन या मुख्यालयात आपला 18 वा स्थापनादिन साजरा करून, पृथ्वी विज्ञान क्षेत्रातील सुमारे दोन दशकांचे उल्लेखनीय योगदान अधोरेखित केले. 27 जुलै 2006 रोजी स्थापन झालेले हे मंत्रालय वैज्ञानिक संशोधन आणि सेवा क्षेत्रात आघाडीवर आहे. मंत्रालयाची कामगिरी भूविज्ञान क्षेत्रातील तिन्ही शाखांमध्ये विस्तारलेली आहे : हवा किंवा वातावरण, जलावरण किंवा हायड्रोस्फियर, शिलावरण किंवा लिथोस्फियर, निम्नतापावरण (पृथ्वीचा बर्फाच्छादित भाग) किंवा क्रायोस्फियर, पृथ्वीवरील जीवनाचे क्षेत्र किंवा बायोस्फियर आणि त्यांचे परस्परसंवाद यातून मंत्रालयाची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीबद्दल असलेली बांधिलकी दिसून येते.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अठराव्या स्थापना दिन कार्यक्रमाला एका शानदार उदघाटन समारंभाने आरंभ झाला. यावेळी मान्यवर अतिथी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि प्रमुख हितसंबंधी उपस्थित होते. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. "आपण सर्व पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एकोणिसाव्या स्थापना वर्षात प्रवेश करत असताना, आतापर्यंत केलेल्या असंख्य यशस्वी कामगिरींबद्दल अभिमानाची भावना तर आहेच मात्र भविष्यात अन्न, पाणी, ऊर्जा, आरोग्य आणि हवामान बदल यांसारख्या अनेक आव्हानांवर उपाययोजना करण्यासाठी आपण सर्व तयारीनिशी जोमाने कार्याला सुरुवात करूया. आपण लोकांची सेवा आणि समाजहितासाठी विज्ञानाचा उत्तमोत्तम वापर करण्याचे ब्रीदवाक्य पाळले पाहिजे”, असे ते म्हणाले.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना, भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय के सूद
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या दस्तऐवजांचे प्रकाशन (डावीकडून) अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार, विश्वजित सहाय, प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय के सूद, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि सहसचिव डी. सेंथिल पांडियन (उजवीकडे)
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने आपल्या 18 व्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ खालील दस्तऐवज प्रकाशित केले:
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सहाय्यक कार्यालय अर्थात भारतीय हवामान विभागाने (आय एम डी) "भारतातील चक्रीवादळाविषयी इशारा" यावर 'प्रमाणित परिचालन प्रक्रिया' (एसओपी) आणि 'हवामानाशी संबंधित आपत्तींच्या संदर्भात उच्च-प्रभाव टाकणाऱ्या हवामान विषयक घटनांचे निरीक्षण आणि अंदाज व्यक्त करण्यासाठी सक्षम संरचना' हे दस्तऐवज आज प्रकाशित केले. हे दस्तऐवज भागधारकांना अधिक कार्यक्षम आणि आपत्ती निवारणासाठी आवश्यक तात्काळ प्रयत्नांमध्ये मदत करतील.
गोव्यातील ध्रुवीय आणि महासागर संशोधन राष्ट्रीय केंद्र (NCPOR), या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एका स्वायत्त संस्थेने, 18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झालेल्या भारताच्या पहिल्या हिवाळी आर्क्टिक मोहिमेसह 14 व्या भारतीय आर्क्टिक मोहिमेचा (2023-24) एकत्रित अहवाल जारी केला. या अहवालात ध्रुवीय आणि महासागर संशोधन राष्ट्रीय केंद्राद्वारे आयोजित भारतीय आर्क्टिक मोहिमेअंतर्गत राबवण्यात आलेले वैज्ञानिक प्रकल्प आणि क्षेत्रीय उपक्रमांची सखोल माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल ध्रुवीय आणि महासागर संशोधन राष्ट्रीय केंद्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोची येथील सागरी जीवन स्रोत आणि पर्यावरणशास्त्र केंद्र (CMLRE) या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाशी संलग्न कार्यालयाने, भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रातील ‘अनाम्युरन खेकड्यांचे पद्धतशीर वर्गीकरण' (पॅग्युरॉयडिया, कायरोस्टायलॉयडिया आणि गॅलाथिओडिया) नावाचा कॅटलॉग जारी केला. हा प्रयत्न मंत्रालयाच्या सागरी जैवविविधता दस्तऐवजीकरण तसेच संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांशी संलग्न असून खोल-समुद्रातील वर्गीकरणाची क्षमता वाढवण्यात महत्वाचे योगदान देतो.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (MoES) वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. त्रैमासिक स्वरूप असलेल्या या अंकातून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाशी संबंधित बातम्या, घटना आणि अद्ययावत माहितीवर प्रकाश टाकण्यावर प्रामुख्याने भर दिला जाईल.
युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्टिंग मधील गंतव्य पृथ्वी उपक्रम : किलोमीटर प्रमाणात क्रांतिकारी हवामान अंदाज आणि वातावरण प्रारुप : मूल्यमापन आणि नैदानिक क्रियांमधून अंतर्दृष्टी', या विषयावर युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्टिंग (ECMWF) या संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस्टिबालिझ गॅस्कॉन यांचे प्रसिद्ध विज्ञान व्याख्यान आयोजित केले होते. अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार विश्वजित सहाय तसेच सहसचिव डी सेंथिल पांडियन हे देखील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
“सर्व नागरिकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करत राहील”, असे डॉ रविचंद्रन म्हणाले. हा कार्यक्रम पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या युट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित करण्यात आला. हा कार्यक्रम पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या युट्यूब वाहिनीवर सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
हवामान, वातावरण, महासागर आणि किनारी राज्ये, जलविज्ञान, भूकंपशास्त्र आणि नैसर्गिक धोके यासंदर्भात सेवा प्रदान करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालय वचनबद्ध आहे. त्याचबरोबर, शाश्वत पद्धतीने सागरी सजीव आणि निर्जीव स्रोत शोधणे आणि त्यांचा उपयोग करणे; पृथ्वीचे दोन्ही ध्रुव (आर्क्टिक, अंटार्क्टिक) आणि हिमालयाचे सखोल अन्वेषण करण्यासाठी; तसेच सागरी स्रोत आणि सामाजिक उपयोजनाच्या शोधासाठी महासागर तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सुद्धा पृथ्वी विज्ञान मंत्रालय वचनबद्ध आहे.
***
M.Pange/B.Sontakke/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2037946)
Visitor Counter : 81