संरक्षण मंत्रालय
डीआरडीओ द्वारे टप्पा-II बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी उड्डाण-चाचणी
Posted On:
24 JUL 2024 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2024
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने 24 जुलै 2024 रोजी टप्पा -II बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी उड्डाण-चाचणी केली. जमीन आणि समुद्रावर तैनात करण्यात आलेल्या शस्त्र प्रणाली रडारद्वारे शोधण्यात आलेल्या शत्रूच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची नक्कल करून बनवलेले लक्ष्य क्षेपणास्त्र LC-IV धामरा येथून 16.20 वाजता प्रक्षेपित करण्यात आले आणि प्रगत हवाई संरक्षण आंतररोधी (एडी इंटरसेप्टर) प्रणाली सक्रिय करण्यात आली.
टप्पा -II एडी एंडो- ऍटमॉस्फेरिक क्षेपणास्त्र चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (आयटीआर) एलसी -III वरून 16. 24 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. उड्डाण चाचणीने लांब पल्ल्याचे सेन्सर्स, कमी विलंबाची दूरसंचार प्रणाली आणि एमसीसी आणि प्रगत आंतररोधी क्षेपणास्त्रांचा समावेश असलेल्या संपूर्ण नेटवर्क-केंद्रित युद्धजन्य शस्त्र प्रणालीचे प्रमाणीकरण करणारी सर्व चाचणी उद्दिष्टे पूर्ण केली.
चाचणीने 5000 किमी श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्याची राष्ट्राची स्वदेशी क्षमता प्रदर्शित केली आहे. क्षेपणास्त्राच्या कार्यक्षमतेवर जहाजावरुन तसेच विविध ठिकाणी आयटीआर, चांदीपूर द्वारे तैनात केलेल्या इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली, रडार आणि टेलिमेट्री स्टेशन्स सारख्या रेंज ट्रॅकिंग उपकरणांद्वारे प्राप्त उड्डाण डेटावरून परीक्षण केले गेले.
टप्पा -II एडी एंडो- ऍटमॉस्फेरिक क्षेपणास्त्र ही स्वदेशी विकसित दोन टप्प्यातील सॉलिड प्रॉपल्शन जमिनीवरून प्रक्षेपित होणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी जमिनीलगतच्या वातावरणातील तसेच बाह्य वातावरणातील शत्रूच्या अनेक प्रकारच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यासाठी आहे. विविध डीआरडीओ प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या अनेक अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये करण्यात आला आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आजच्या यशस्वी उड्डाण चाचणीसाठी डीआरडीओचे कौतुक करताना डीआरडीओ ने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता पुन्हा प्रदर्शित केल्याचे नमूद केले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी आजच्या यशस्वी उड्डाण चाचणीसाठी त्यांच्या अथक प्रयत्न आणि योगदानाबद्दल संपूर्ण डीआरडीओ चमूचे अभिनंदन केले.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2036608)
Visitor Counter : 128