संरक्षण मंत्रालय

कारगिल विजयाची 25 वर्ष साजरी करण्यासाठी ‘हार्ट टू ब्रेव्हहार्ट्स’ ही दिल्ली ते द्रास कार रॅली लष्कराकडून मार्गस्थ

Posted On: 11 JUL 2024 4:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2024
 

कारगिल युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘हार्ट टू ब्रेव्हहार्ट्स’ या कार रॅलीला दिल्ली भागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल भावनिश कुमार यांनी आज 11 जुलै 2024 रोजी दिल्लीच्या करिअप्पा परेड मैदानावर झेंडा दाखवून रवाना केले.
 
‘हार्ट टू ब्रेव्हहार्ट्स’ ही कार रॅली म्हणजे कारगिल युद्धाची रजत जयंती साजरी करत या युद्धात शौर्य , लवचिकता आणि समर्पणवृत्ती यांचा परिचय देणाऱ्या कारगिल वीरांना वाहिलेली आदरांजली आहे.तसेच नागरिकांचे संदेश सैनिकांपर्यंत विशेषतः सीमेवर तैनात जवानांपर्यंत पोचविण्यासाठी अशीच एक कार रॅली 30 जून 2024 रोजी तेझु येथील तनोट बॉर्डर पोस्ट आणि कोची पोर्ट येथून रवाना झाली.
ही सर्व पथके 9 जुलै रोजी दिल्ली येथे एकत्र आली आणि आज त्यांनी द्रास येथील कारगिल युध्द स्मारकाकडे कूच केले. ही रॅली10,000 किमीहून अधिक अंतर पार करत 15 जुलै 2024 रोजी कारगिल युध्द स्मारक स्थळी रॅलीचा समरोप होईल .


ही रॅली मार्गात असलेल्या विविध लष्करी ठाण्यांना भेट देत पुढे जात आहे आणि लष्करातील शूर जवानांचा सन्मान करत आहे. या प्रवासात प्रमुख ठिकाणी सेनेत कर्तव्यावर असलेल्या व्यक्ती, निवृत्त अधिकारी, वीरनारी आणि शूरवीरांचे कुटुंबीय तसेच सुप्रसिद्ध व्यक्ती  यांच्या उपस्थितीत फ्लॅग-ऑफ आणि  फ्लॅग-इन समारंभ आयोजित करण्यात येत आहेत. कारगिल युद्धातील निवृत्त सैनिक आणि वीर नारी यांनी युद्धादरम्यान केलेला त्याग आणि दिलेले भक्कम पाठबळ लक्षात घेत त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.


भारतीय लष्कराच्या सहकार्यासह महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आयोजित केलेली ही रॅली पत्रे, कविता, रेखाटने तसेच इतर सर्जनशील अभिव्यक्तीच्या स्वरुपात नागरिकांचे संदेश घेऊन जात आहे. देशामध्ये सर्व भागांतून प्रवास करताना या रॅलीतील जवान त्यांच्यासोबत धैर्य, बलिदान आणि देशभक्तीच्या कहाण्या घेऊन जात आहेत. संपूर्ण भारतातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या शोरूम्समध्ये संकलित करण्यात आलेली पत्रे, संदेश आणि पोस्टर्स/छायाचित्रे यांच्या स्वरूपातील अभिव्यक्ती देखील ते सोबत घेऊन जात आहेत. ही मोहीम म्हणजे सर्व भारतीयांसाठी आपल्या सशस्त्र सेनेप्रती असलेले कौतुक करण्याचे प्रामाणिक आवाहन आणि ते व्यक्त करण्याची संधी आहे.

 
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2032455) Visitor Counter : 29