सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर केली स्वाक्षरी

Posted On: 09 JUL 2024 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2024

 

दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी सचिव राजेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पहिला सामंजस्य करार "दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग" आणि "एनेबल मी" ऍक्सेस असोसिएशन यांच्यात आणि दुसरा सामंजस्य करार भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि YUNIKEE यांच्यात झाला.

एनेबल मी ऍक्सेस असोसिएशन बरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारामध्ये दोन प्रगत सुगम्यता  प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्याचा समावेश आहे. हे प्रशिक्षण कार्यक्रम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पॅनेल ऍक्सेसिबिलिटी ऑडिटर्स आणि इंजिनीअर्ससाठी असतील.

भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि YUNIKEE यांच्यातील सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश कर्णबधिर समुदाय आणि या  तरुणांना विनामूल्य आणि सहज उपलब्ध होणारी  कौशल्ये प्रदान करणे आहे. या कौशल्याच्या ज्ञानाने, कर्णबधिर युवक त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकतील, उच्च दर्जाच्या नोकऱ्या मिळवू शकतील आणि त्यांच्या सध्याच्या नोकऱ्यांमध्ये बढती देखील मिळवू शकतील.  हा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम कर्णबधिर युवकांना त्यांची आवड जोपासण्यास, फ्रीलान्सिंगद्वारे चांगले जीवन जगण्यास  आणि उपजीविकेच्या बाबतीत स्वयंपूर्ण  बनण्यास सक्षम बनवेल.

या दोन महत्त्वपूर्ण करारांसह, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वसमावेशक आणि सक्षम वातावरण निर्मितीच्या  दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जीवनात समान संधी उपलब्ध करून देणे, दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर  आणि सशक्त नागरिक बनवणे हे विभागाचे उद्दिष्ट आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031923) Visitor Counter : 27