राष्ट्रपती कार्यालय

भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या 2022 च्या तुकडीच्या एका गटाने घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट


लोकांचा विश्वास कमावणे आणि तो टिकवून ठेवणे ही कोणत्याही प्रशासकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला

Posted On: 01 JUL 2024 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2024

 

भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या 2022 च्या तुकडीच्या एका गटाने आज दिल्लीत राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. हे अधिकारी सध्या केंद्र सरकारची विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत.

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी या अधिकाऱ्यांना संबोधित केले. भारतीय प्रशासकीय सेवेत कारकिर्द घडवणे हे देशातल्या अनेकांचे स्वप्न असते असे त्या म्हणाल्या. देशातील लाखो महत्त्वाकांक्षी युवा भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. यांपैकीच अनेकजण, भारतीय प्रशासकीय सेवेत आपली निवड व्हावी याकरता प्रचंड मेहनत करतात. अशा सर्व युवा उमेदवारांमधूनच आज भेटीला आलेले अधिकारी निवडले गेले आहेत, आणि या सेवेच्या माध्यमातून त्यांना नागरिकांच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे, असे त्या म्हणाल्या. तुम्ही जिथे जिथे काम कराल तिथे तिथे आपल्या कामात संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेने आपला ठसा उमटवा असा मोलाचा सल्ला त्यांनी या अधिकाऱ्यांना दिला.

सध्याचे युग हे उच्च तंत्रज्ञानाचे आहे. आजच्या परिस्थितीत लोकांना आपला देश तसेच जगभरातील घडामोडींची माहिती अगदी थेट, त्या त्या क्षणाला मिळत असते, आणि यामुळेच अधिकाऱ्यांसमोरची आव्हाने देखील अनेक पटींनी वाढली आहेत असे त्यांनी सांगितले. एखाद्या योजनेची सामाजिक किंवा आर्थिक उद्दिष्टे साध्य झाली आहेत असे तुम्हाला वाटू शकेल, पण हे घडेपर्यंत लोकांच्या त्यावेळच्या गरजा, त्यांच्यातील जागरुकता आणि त्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्याचे दिसून येईल असे त्यांनी या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळेच या सर्व अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची यंत्रणा - व्यवस्था उभारायला सुरूवात केली पाहीजे जी   भविष्यातील कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असेल   असा सल्लाही राष्ट्रपतींनी भेटीला आलेल्या अधिकाऱ्यांना दिला.

मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी तसेच प्रत्येक घटकाच्या सामाजिक - आर्थिक सक्षमीकरणासाठी, प्रशासनाची कार्यसंस्कृती ही लोकसहभागावर आधारलेली असणे गरजेचे आहे ही बाब राष्ट्रपतींनी अधोरेखित केली.

आजच्या काळाच्या संदर्भाने पाहिले तर सर्व अधिकाऱ्यांनी केवळ प्रशासकच म्हणून नाही, तर एक सूत्रधार आणि व्यवस्थापकाचीही भूमिका पार पाडायला हवी असे त्या म्हणाल्या. सगळ्यांना एकत्रितपणे सोबतीला घेऊन उत्तरदायी, पारदर्शक आणि प्रभावी प्रशासन कशा रितीने देऊ शकाल त्यावरच तुमचे यश अवलंबून असणार आहे असेही राष्ट्रपतींनी भेटीला आलेल्या अधिकाऱ्यांना सांगितले.

लोकांचा विश्वास कमावणे आणि तो टिकवून ठेवणे ही कोणत्याही प्रशासकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. नागरिकांना सुलभरित्या सेवा उपलब्ध होतील, प्रशासनात पारदर्शकता राहील आणि त्याचवेळी परस्पर विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा असा सल्ला राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्यांना दिला. मात्र तंत्रज्ञानाचा विशेषत: समाज माध्यमांचा वापर स्वत:च्या प्रसिद्धीसाठी करू नये, असा सावधगिरीचा इशारा देखील  त्यांनी या अधिकाऱ्यांना दिला.

नैतिकतेशी कोणतीही तडजोड होण्यापासून रोखण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच सजग आणि सक्रिय राहायला हवे, असे राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्यांना सांगितले. सरकारची धोरणे आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासोबतच, तुम्ही सगळे अधिकारी आपल्या वैयक्तिक आचरणात देखील सचोटी, प्रामाणिकपणा आणि शाश्वततेला देखील चालना द्याल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विकसित भारताच्या उभारणीसाठी विकसित मानसिकतेची गरज असल्याची बाब राष्ट्रपतींनी अधोरेखित केली. तुम्ही सर्व अधिकारी नवी विचारसरणी आणि नव्या उपाययोजनांच्या माध्यमातून देशाच्या विकासाचा गाडा पुढे न्याल असा विश्वासही त्यांनी या अधिकाऱ्यांबद्दल व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030047) Visitor Counter : 47