संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तबर ही भारतीय नौदलाची युद्धनौका इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे दाखल

Posted On: 27 JUN 2024 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2024  

 

भारतीय नौदलाची प्रमुख युद्धनौका आयएनएस तबर, आफ्रिका आणि युरोपमध्ये तिच्या चालू तैनातीचा एक भाग म्हणून 27 ते 30 जून 2024 या कालावधीत सदिच्छा भेटीसाठी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया या ऐतिहासिक बंदराच्या शहरामध्ये पोहोचली.

भारत आणि इजिप्तमध्ये शतकानुशतकांचा सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचा समृद्ध वारसा आहे. आधुनिक युगात हे संबंध अधिक दृढ झाले आहे. अलिकडच्या वर्षांत, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध संरक्षण आणि सागरी सहकार्यासह विविध क्षेत्रात विस्तारले आहेत. इजिप्तसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारणे तसेच सागरी सुरक्षेच्या विविध पैलूंमध्ये वाढ करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करणे हा भारतीय नौदलाची युद्धनौका तबरच्या अलेक्झांड्रिया भेटीचा उद्देश आहे.

आयएनएस तबर ही भारतीय नौदलासाठी रशियामध्ये बांधलेली एक महत्त्वाची आणि अत्यंत सक्षम युद्धनौका आहे. या जहाजाची धुरा कॅप्टन एमआर हरीश वाहत असून त्यात 280 कर्मचारी आहेत. आयएनएस तबर ही विविध शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे आणि ती भारतीय नौदलाच्या सर्वात प्राचीन स्टेल्थ युद्धनौकांपैकी एक आहे. हे जहाज पश्चिम नौदल कमांडच्या अंतर्गत पश्चिमी ताफ्याचा एक भाग म्हणून मुंबई येथे तैनात असते.

अलेक्झांड्रियामध्ये त्यांच्या तीन दिवसांच्या मुक्कामादरम्यान, जहाजावरील अधिकारी काही सामाजिक उपक्रमांव्यतिरिक्त इजिप्शियन नौदलासोबत अनेक व्यावसायिक चर्चाही करतील. यानंतर दोन्ही देशांचे नौदल समुद्रात लष्करी कारवाईशी संबंधित एक महत्वपूर्ण सराव किंवा “पासेक्स” द्वारे बंदरांच्या अभ्यासाचा टप्पा पूर्ण करतील. या सर्व संयुक्त उपक्रमांचा उद्देश दोन्ही नौदलाने स्वीकारलेल्या विविध पद्धतींमध्ये समानता वाढवणे तसेच सामान्यतः उद्भवणाऱ्या सागरी धोक्यांविरुद्ध दोन्ही नौदलांमधील परस्परसंवादाची व्याप्ती वाढवणे हा आहे.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2029212) Visitor Counter : 95