विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळाच्या पुण्याच्या सीएसआयआरसह सात प्रयोगशाळांद्वारे ऊर्जा आणि ऊर्जा उपकरणांच्या संकल्पनेवर आधारित साप्ताहिक संकल्पना मोहिमेचे उद्घाटन

Posted On: 27 JUN 2024 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2024

 

सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळाचे महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी यांच्या उपस्थितीत माननीय केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते दिल्लीतील भारत निवास केंद्रात साप्ताहिक संकल्पना (ओडब्ल्यूओटी) मोहिमेचे उद्घाटन आणि त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण झाल्यावर सर्व सीएसआयआर प्रयोगशाळा त्यांच्या संबंधित संस्थांमध्ये ओडब्ल्यूओटी (ऊर्जा आणि ऊर्जा उपकरणे) वर कार्यक्रम आयोजित करत आहेत. 27 जून 2024 रोजी, पुण्याच्या सीएसआयआरसह 7 सीएसआयआर प्रयोगशाळांनी संकल्पनाधारित उपक्रम आयोजित केले. ओडब्ल्यूओटी मोहीम सीएसआयआर च्या 8 संकल्पनांवर आधारित आहे ज्यामध्ये सर्व 37 सीएसआयआर प्रयोगशाळा विशिष्ट संकल्पनांवर कार्यक्रम आयोजित करतील.

सीएसआयआर च्या साप्ताहिक संकल्पना कार्यक्रमाच्या ऊर्जा आणि ऊर्जा उपकरणे संकल्पनेंतर्गत  "शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) पूर्ण करण्यासाठी उत्प्रेरक आणि नवीकरणीय ऊर्जा" या विषयावर पुण्याच्या सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (सीएसआयआर-एनसीएल) परिसंवादाचे आयोजन केले होते. पर्यायी इंधनावर या कार्यक्रमाचा भर होता. त्यात सादरीकरणे झाली तसेच उत्प्रेरक आणि अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानातील अद्ययावत प्रगतीवर विचारमंथन झाले. या परिसंवादाने ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन दिले आणि जागतिक ऊर्जा आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत विकासाला समर्थन देण्यासाठी सहकार्य वाढवले.

सीएसआयआर -केंद्रीय खाणकाम आणि इंधन संशोधन संस्था (सीएसआयआर- सीआयएमएफआर), धनबाद यांनी सीएसआयआर च्या साप्ताहिक संकल्पना कार्यक्रम-ऊर्जा आणि ऊर्जा उपकरणे संकल्पनेचा भाग म्हणून गॅसिफिकेशन केअरिंग-2024 मधील आव्हाने आणि संधी या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. गॅसिफिकेशनमधील आव्हाने आणि संधींवर या कार्यशाळेचा भर आहे. सीएसआयआर- सीआयएमएफआर दिग्वाडीह संकुलात 26-27 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गॅसिफिकेशन तंत्रज्ञानातील जटिलता आणि संधी जाणून घेण्यासाठी उद्योग धुरिण, संशोधक, धोरणकर्ते आणि हितधारक सहभागी होत आहेत. कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल), स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल), जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल) अंगुल, हिंदाल्को इंडस्ट्रीज, थरमॅक्स आणि भारतभरातील अन्य विविध संस्थांमधील 75 हून अधिक सहभागींमुळे ही कार्यशाळा गॅसिफिकेशन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे.

सीएसआयआर च्या साप्ताहिक संकल्पना मोहिमेची पुढील संकल्पना ‘रसायने आणि पेट्रोकेमिकल्स’ असून ती 15 ते 20 जुलै 2024 दरम्यान राबवण्यात येईल.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029207) Visitor Counter : 15