गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान-शहरी (SBM-U ) 2.0 अंतर्गत सफाई अपनाओ, बीमारी भगाओ उपक्रमाचा केला आरंभ
पावसाळ्यातील स्वच्छता आणि रोगनियंत्रण यासंदर्भात शहरी स्थानिक संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्याचा या उपक्रमाचा उद्देश
Posted On:
25 JUN 2024 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2024
पावसाळा आला रे आला की स्वच्छता आणि त्यासंदर्भातील इतर आव्हाने प्रकर्षाने जाणवतात. याबरोबरच जलजन्य आणि कीटक-जनित रोगाचे प्रमाण देखील वाढत असते. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांशी निगडित आरोग्याच्या तक्रारी आणि धोके लक्षात घेऊन ते रोखण्यासाठी प्रतिबंधित उपाययोजनेचे महत्व लक्षात घेऊन गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (1 जुलै ते 31 ऑगस्ट, 2024) या कालावधीसाठी स्वच्छ भारत अभियान-शहरी (SBM-U ) 2.0 अंतर्गत सफाई अपनाओ, बीमारी भगाओ उपक्रम सुरु केला आहे. त्यादृष्टीने विशेषतः जून ते ऑगस्ट महिन्याच्या कालखंडात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उद्भवणारी संकटे आणि त्याच्याशी निगडित आरोग्य समस्यांविषयीची सर्व शहरी स्थानिक संस्थांची सुसज्जता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
पावसाळयातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक तक्रारी आणि अनेक आव्हानांविषयी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या 'अतिसार नियंत्रण' - 'अतिसार रोखणे, स्वच्छता आणि ओआरएस घेईल आपली काळजी' या उपक्रमाच्या बरोबरीने हा उपक्रम सर्व संबंधित मंत्रालये आणि आंतर विभागीय सहकार्याने प्रयत्न करत आहे. स्वच्छता आणि साफसफाईसंदर्भात शहरी स्थानिक संस्थांमध्ये एक सर्वसमावेशक दृष्टिकोन वाढीस लागावा ही काळाची गरज आहे.
सफाई अपनाओ, बीमारी भगाओ अर्थात स्वच्छता राखा आणि आजारांना दूर पळवा या अभियानांतर्गत शहरी स्थानिक संस्थांमध्ये स्वच्छता, जनजागृती आणि आंतर विभागीय सहकार्य यांचा समन्वय राखणे आवश्यक आहे. या अभियानात प्रामुख्याने स्वच्छता मोहीम, कचरा संकलन आणि वाहतूक, सर्व सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई, बालकांसाठी स्वच्छता सुविधा, पाण्याच्या गुणवत्तेचे पुरेसे नमुने घेणे, माहिती शिक्षण संप्रेषण आणि घरोघरी जाऊन जनजागृती करणे या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय अति जोखमीच्या आजारांचे वेळीच निदान, काळजी घेणे, रोखणे आणि निदान या पद्धतीचा (PPTS) अवलंब आणि समन्वय आणि देखरेख यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यातील तयारीच्या सुसज्जतेशी संबंधित उपक्रमांमध्ये आठ आठवड्यांच्या कालखंडात अतिसार व्यवस्थापन, ठळकपणे दिसून येईल अशा उच्च दर्जाच्या स्वच्छतेचे पालन, स्थानिक समुदाय, सरकारी अधिकारी आणि संस्थांचे प्रशिक्षण यांचा समावेश असेल. तसेच जलव्यवस्थापन, स्वच्छता, जनजागृती, स्वच्छता कर्मचाऱ्यांची काळजी, सुविधा आणि देखभाल या विषयावर अधिकारी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था, समुदाय गट आणि खाजगी क्षेत्र यांच्याशी भागीदारी करून स्वच्छता संदेशांना अधिक प्रभावी करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. समुदायाचा सहभाग, जनजागृती, सामुदायिक एकत्रित कार्य आणि शिक्षण, पावसाच्या पाण्याची साठवण, पावसाळ्यानंतरचे देखभाल नियोजन आणि एकत्रीकरण यावर विशेष भर दिला जाईल.
* * *
S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2028641)
Visitor Counter : 157