इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सी-डॅक आणि ए.आय.सी.टी.ई यांच्यात कंप्युटिंग आणि संबंधित क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाची कामगिरी बजावण्यास सक्षम मनुष्यबळ विकसित करण्यासाठी सहयोग करार
Posted On:
25 JUN 2024 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2024
कंप्युटिंग व संबंधित क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाची कामगिरी बजावण्यास सक्षम मनुष्यबळ विकसित करण्यासाठी ‘सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ ॲडवान्स्ड कंप्युटिंग - सी-डॅकने आज ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’ - ए.आय.सी.टी.ई.सह सहयोग करार केला.
ए.आय.सी.टी.ई.चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम आणि सी-डॅक, पुणेचे कार्यकारी संचालक व कॉर्पोरेट धोरण कर्नल (निवृत्त) अशीत नाथ यांनी सहयोग करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्यासह मंत्रालयाचे अधिकारी, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
सहयोग करारांतर्गत राबवले जाणारे काही महत्त्वाचे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
- मास्टर ट्रेनर उपक्रम – मास्टर ट्रेनर अर्थात मुख्य प्रशिक्षकांच्या उच्च स्तरीय कंप्युटिंग व संबंधित तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्यक अध्यापन कौशल्यात वाढ करण्यासाठी प्रशिक्षण आणि उजळणी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. हे मुख्य प्रशिक्षक पुढे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अध्यापकांना आवश्यक प्रशिक्षण देतील.
- दर्जा सुधारणा कार्यक्रम - उच्च स्तरीय कंप्युटिंग व संबंधित तंत्रज्ञानातील अध्यापकांचे संगणक विज्ञानाखेरीज इतर विषयांचे ज्ञान वाढावे याकरता दर्जा सुधारणा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतील.
- ‘स्वयम’ वर अभ्यासक्रम - उच्च स्तरीय कंप्युटिंग अभ्यासक्रम शिक्षण मंत्रालयाच्या स्वयम या मंचावर उपलब्ध करून दिले जातील. या मंचावर विविध विषयांचे विनामूल्य अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे देशभरातली विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देता येईल.
- उद्योगांच्या गरजा लक्षात घेणाऱ्या अभ्यासक्रमांची निर्मिती - उच्च स्तरीय कंप्युटिंग अभ्यासक्रम तयार करताना या उद्योग क्षेत्रातील वर्तमान व भविष्यात निर्माण होणाऱ्या गरजा लक्षात घेतल्या जातील.
- सी-डॅकद्वारा विकसित उच्च स्तरीय कंप्युटिंग शिक्षण मंचांचा पर्याय देणे - सी-डॅककडून उच्च स्तरीय कंप्युटिंग शिक्षण मंच जसे की परम शावक, परम विद्या आणि इतर आगामी ए.आय.सी.टी.ई.द्वारा नामांकनप्राप्त संस्थांद्वारे उपलब्ध करून दिले जातील.
ही उद्दीष्टे पाहता लक्षात येते की सी-डॅक आणि ए.आय.सी.टी.ई. यांच्यातील सहयोग कराराचे ध्येय उच्च स्तरीय कंप्युटिंग व संबंधित तंत्रज्ञानात शाश्वत मनुष्यबळ विकासाचे, नवोन्मेषाला चालना देण्याचे आणि उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या उत्क्रांत होत असलेल्या गरजांची पूर्तता करण्याचे आहे.
उच्च स्तरीय कंप्युटिंगची जाण असलेले मनुष्यबळ विकसित करण्याचा उपक्रम देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसह व्यापक लोकसंख्येपर्यंत पोहोचेल, असे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी यावेळी बोलताना सांगितले. “त्यातून उच्च स्तरीय कंप्युटिंगसाठी सक्षम तांत्रिक कार्यबळ उद्योगासाठी सज्ज ठेवता येईल”, असे ते म्हणाले.
ए.आय.सी.टी.ई.चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम म्हणाले, “या सहयोग कराराच्या माध्यमातून आम्ही भारतात उच्च स्तरीय कंप्युटिंग शिक्षणासाठी भक्कम व्यवस्था उभारण्याच्या दिशेला महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.” या कार्यक्रमाची उद्दीष्टे ‘राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियाना’ची ध्येय आणि ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’ची दृष्टी यांच्याशी जुळणारी आहेत, असे सांगून, यामुळे आपली तंत्रशिक्षण व्यवस्था जागतिक प्रगतीपथावर आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियानामार्फत उच्च स्तरीय कंप्युटिंगची प्रगती
उच्च स्तरीय कंप्युटिंगची जाण असलेले मनुष्यबळ विकसित करणे हे राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियानाच्या महत्त्वाच्या उद्दीष्टांपैकी एक आहे. उच्च स्तरीय कंप्युटिंगची क्षमता आणि सक्षमता विकसित करण्यासाठी हे अभियान भारत सरकारचा महत्त्वाचा कार्यक्रम असून इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग त्याची अंमलबजावणी करत आहेत. ए.आय.सी.टी.ई.ला नियोजन आणि तंत्रशिक्षणाची देशव्यापी समन्वयी व्यवस्था विकसित करून या शिक्षणात दर्जेदार सुधारणांचा प्रसार करणे बंधनकारक आहे. अभियानाच्या ध्येयपूर्ततेसाठी सी-डॅक ए.आय.सी.टी.ई.सह भागीदारी करत असून त्यामुळे देशभरातील ए.आय.सी.टी.ई.शी संलग्न महाविद्यालयांमध्ये उच्च स्तरीय कंप्युटिंग शिक्षणाचा प्रसार शक्य होईल.
भारतातील सुमारे 1000 अभियांत्रिकी महाविद्यालयांतील 2500 अध्यापकांना 50 अध्यापक विकास कार्यक्रमांमार्फत प्रशिक्षण मिळेल, असे अपेक्षित आहे. हे प्रशिक्षित अध्यापक जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून उच्च स्तरीय कंप्युटिंगशी संबंधित विषय शिकवतील. सुमारे 1000अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उच्च स्तरीय कंप्युटिंगबाबत रस निर्माण करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याद्वारे 100,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. ए.आय.सी.टी.ई.शी संलग्न शिक्षण संस्थांमध्ये सी-डॅकच्या परम शावक अर्थात ‘सुपरकॉम्प्युटींग सोल्युशन इन अ बॉक्स’ प्रणाली 50 ठिकाणी लावण्याचा प्रस्ताव आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना सुपरकॉम्प्युटर वापरण्याचा थेट अनुभव घेता येईल.
* * *
S.Patil/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2028639)
Visitor Counter : 71