गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल - 3 वरील 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम' या सुविधेचा प्रारंभ


फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (एफटीआय- टीटीपी) ही सुविधा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा दूरदर्शी उपक्रम

Posted On: 22 JUN 2024 5:36PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल - 3 वर 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम' या सुविधेचा प्रारंभ केला. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहसचिव तसेच इतर अनेक मान्यवरही उपस्थित होते.

फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम ही सुविधा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा दूरदर्शी उपक्रम आहे. भारतीय नागरिक तसेच परदेशस्थ भारतीय नागरिकत्व (Overseas Citizenship of India - ओसीआय) कार्डधारकांच्या सोयीची ठरावी यादृष्टीने अगदी विचारपूर्वक या सुविधेला आकार दिला असल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमामुळे इतर देशांतून येणारे भारतीय नागरिक आणि ओसीआय प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या उपक्रमाचा प्रारंभ हा विकसित भारत @2047 साठी निश्चित केलेल्या प्रमुख ध्येय उद्दिष्टांपैकीय एक आहे. ही सुविधा म्हणजे प्रत्येक प्रवाशाला सुलभतेने प्रवास करता येण्याजोग्या सुविधा उपलब्ध करून देणे प्रवासी सुविधांची परिणामकारता वाढणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबच असल्याचे ते म्हणाले. सर्व प्रवाशांसाठी ही सुविधा विना शुल्क उपलब्ध असणार असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानतळावरील परदेश प्रवासाठीच्या सर्व तपासणी प्रक्रिया अर्थात इमिग्रेशन क्लिअरन्स जलदगतीने, सुलभरित्या आणि सुरक्षितपणे पार पाडता याव्यात यादृष्टीने या सुविधेची रचना करण्यात आली आहे. हा उपक्रम ई - गेट किंवा  स्वयंचलित बॉर्डर गेट वर चालवला जाणार आहे, त्यामुळे विमानतळावरील परदेश प्रवासाठीच्या सर्व तपासणी प्रक्रियांमधील मानवी हस्तक्षेप कमी होऊ शकणार आहे. सद्यस्थितीत हा कार्यक्रम दोन टप्प्यांत राबवला जाणार आहे. या अंतर्गतच्या पहिल्या टप्प्यात भारतीय नागरिक आणि ओसीआय कार्डधारकांना आणि दुसऱ्या टप्प्यात परदेशी प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वयंचलित दरवाजांद्वारे (ई-गेट्स) तपासणी केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवास करत असलेल्या प्रवाशांसाठी विमानतळावरील तपासणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करता येईल, अशा प्रकारची जागतिक दर्जाची सुविधा विकसित करत, आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करता यावा हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम या सुविधेअंतर्गतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबवली जाणार आहे. या कार्यकमाअंतर्गत विविध वर्गवारीतील प्रवाशांसाठी वेगवान इमिग्रेशन  प्रक्रियेसाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडे समन्वयकाची जबाबदारी राहणार आहे. या योजनेअंतर्गत नाव नोंदणी करण्यासाठी संबंधित प्रवासी अर्जदाराला आपले संपूर्ण तपशील आणि आवश्यक दस्तऐवजांसह पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. अर्ज दाखल झाल्यावर आवश्यक पडताळणीनंतर 'विश्वासू प्रवाशांची' व्हाईट लिस्ट  तयार केली जाईल, या यादीनुसार ई-गेट्सवरील प्रक्रियेची अंमलबजावणी व्हावी यासाठी ती अपलोड केली जाईल. ई-गेट्सवरून जाणाऱ्या 'ट्रस्टेड ट्रॅव्हलर'ची बायोमेट्रिक्स अर्थात जीवशास्त्रीय ओळखीचे - तपासणीचे तपशील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाद्वारे (FRRO) गोळा केले जातील किंवा असे नोंदणीकृत प्रवासी विमानतळाच्या आवारात आल्यावर त्याचे तपशील घेतले जातील. ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (FTI- TTP) अंतर्गतची ही नोंदणी अशा प्रवाशांच्या पासपोर्टच्या वैधतेच्या तारखेपर्यंत किंवा 05 वर्षे यांपैकी जे आधी संपणार असेल तोपर्यंत वैध असणार आहे. त्यानंतर अशा प्रवाशांना आपल्या नोंदणीचे पुन्हा एकदा नूतनीकरण करावे लागणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत असे 'नोंदणीकृत प्रवासी' ई - गेटवर पोहोचताच ते विमान कंपन्यांनी त्यांना दिलेला बोर्डिंग पास ई - गेटवर स्कॅन करून त्याच्या विमान उड्डाणाविषयीचा तपशील प्राप्त करू शकतात. यावेळी या प्रवाशांचा पासपोर्ट स्कॅन केला जाईल तसेच  ई - गेटवर त्यांची जीवशास्त्रीय ओळखही पडताळून पाहिली जाणार आहे. प्रवाशाची खरी ओळख पटल्यानंतर आणि त्यांच्या जीवशास्त्रीय ओळखीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर ई - गेट आपोआप उघडला जाईल आणि या प्रवाशांची इमिग्रेशन  प्रक्रिया यशस्वीरित्या पार झाल्याचे मानले जाईल.

फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम सुविधा देशभरातील 21 प्रमुख विमानतळांवर सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली विमानतळासह मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद अशा सात प्रमुख विमानतळांवर ही सेवा सुरू केली जाणार आहे.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2027969) Visitor Counter : 79