संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाने साजरा केला आंतरराष्ट्रीय योगदिन
हिंद महासागरी क्षेत्रात आणि पश्चिम प्रशांत महासागरी क्षेत्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी समुद्रात आणि परदेशी बंदरांवर आयोजित केले योगसत्र
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2024 6:05PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या नौकांवर तसेच किनारी आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी, नौसैनिक आणि अधिकाऱ्यांनी 21 जून या दिवशी, 'योग - स्वतःसाठी आणि समाजासाठी' या मध्यवर्ती संकल्पनेसह दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन (IDY 24) साजरा केला. नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी आणि नौदल कल्याण तथा स्वास्थ्य संघटनेच्या अध्यक्षा शशी त्रिपाठी यांनी नवी दिल्लीतील चाणक्य बाग येथे योगसत्रात भाग घेतला.
आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचा भाग म्हणून नौदलाच्या समुद्रातील नौकांवर तसेच परदेशातील बंदरांवरही सामुदायिक योग (कॉमन योग प्रोटोकॉल) सत्रे घेण्यात आली. संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामान्य नागरिकांसह नौदलातील कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज आयोजित योगविषयक कार्यक्रमांमध्ये विशेष उत्साहाने भाग घेतला. मित्रराष्ट्रांच्या नौदलांतील प्रशिक्षणार्थीही योगदिनाच्या कार्यक्रमांत उत्साहाने सामील झाले.
हिंद महासागरी क्षेत्रात आणि पश्चिम प्रशांत महासागरी क्षेत्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी समुद्रात आणि परदेशी बंदरांवर योगसत्र आयोजित केले. जिबूतीमधील नौका- कोलकाता आणि तबर, मॉरिशसच्या पोर्ट लुई येथील सुनयना, ओमानच्या सलालाह मधील तरकश , श्रीलंकेच्या त्रिंकोमालीमधील कामोर्टा , इंडोनेशियाच्या बेलावान मधील शरयू या भारतीय नौदलाच्या नौकांवर त्या-त्या बंदरांमध्ये योगसत्रे घेतली गेली. याद्वारे, महासागरांच्या व्यापक आणि विस्तीर्ण क्षेत्रांवर योगाचा संदेश पोहोचवण्यात आला.



***
S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2027818)
आगंतुक पटल : 72