माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ्फ’चा शानदार सोहळ्याने समारोप, पुढच्या वेळी अधिक दमदार पुनरागमनाची दिली ग्वाही


‘द गोल्डन थ्रेड’ या भारतीय माहितीपटाला महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या सुवर्ण शंख पुरस्काराने गौरवण्यात आले

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणाऱ्या उर्जेचे भांडार असल्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Posted On: 21 JUN 2024 9:36PM by PIB Mumbai

मुंबई, 21 जून 2024

 

मुंबईच्या आयकॉनिक क्षितिजाच्या झगमगत्या प्रकाशात, माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. कधीही न झोपणारे हे शहर अनोख्या कथा सादरीकरण आणि सर्जनशीलतेच्या प्रतिध्वनींनी दुमदुमले.आज मुंबईत झालेल्या या नेत्रदीपक समारोप सोहळ्याला  महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेते शेखर सुमन, दिग्दर्शक शाजी एन. करुण आणि सुब्बिया नल्लामुथू आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार निष्ठा जैन दिग्दर्शित ‘द गोल्डन थ्रेड’ या भारतीय माहितीपटाला प्रदान करण्यात आला.

प्रशस्तिपत्र आणि रोख 10 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘द गोल्डन थ्रेड’ हा महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट म्हणूनही प्रदर्शित करण्यात आला.

वेरा पिरोगोवा दिग्दर्शित ‘सावर  मिल्क’ या एस्टोनियन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय काल्पनिक लघुपटाचा रौप्य  शंख पुरस्कार प्रदान करण्यात आला. आई आणि मुलामधील गुंतागुंतीचे क्लिष्ट बंध उलगडून  दाखवताना  अपेक्षा आणि निराशेची अद्भुत  कथा यात मांडली आहे. या लघुपटाला  प्रशस्तिपत्र आणि रोख  5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.

टोमेक पोपाकुल आणि कासुमी ओझेकी दिग्दर्शित 'झीमा', या पोलिश चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपटाचा रौप्य शंख पुरस्कार, प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपये रोख मिळाले.

मॅट वॉल्डेक दिग्दर्शित ‘लव्हली जॅक्सन’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कार मिळाला. ज्युरी सदस्य, चित्रपटाची अध्यत्मक बाजू, आणि चित्त वेधक कथा सांगण्यासाठी वापरलेल्या सृजनशील तंत्राने प्रभावित झाले.

प्रमोद पाटी मोस्ट इनोव्हेटिव्ह/प्रायोगिक चित्रपटाचा पुरस्कार 'द ओल्ड यंग क्रो' या जपानी चित्रपटाला देण्यात आला, ज्याचे दिग्दर्शन लियाम लोपिन्टो यांनी केले आहे. मानचिन्ह आणि रु. 1 लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटाचा रौप्य शंख पुरस्कार निर्मल चंदर दंडरियाल दिग्दर्शित ‘6-A आकाश गंगा’ या चित्रपटाला मिळाला. दिग्गज संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचा जीवन प्रवास उलगडून प्रेक्षकांवर छाप पडणाऱ्या या चित्रपटाला 5 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार मिळाला.

बरखा प्रशांत नाईक दिग्दर्शित ‘सॉल्ट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा (30 मिनिटांपर्यंत) रौप्य शंख पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा चित्रपट अत्यंत कलात्मकतेने  रचलेल्या पिता-पुत्राच्या कथेतून दोन पिढ्यांचा लैंगिकतेबद्दलची  समज उलगडतो. 3 लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गौरव पाटी दिग्दर्शित ‘निर्जरा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन चित्रपटाचा रौप्य शंख पुरस्कार मिळाला. हा चित्रपट, गंगेच्या घाटावर शोकाकुल वातावरणात सुरु असलेल्या विधी दरम्यान दोन भाऊ एकत्र येतात, त्याची कथा सांगतो. 3 लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  

स्थलान्तर आणि हवामानबदल या तातडीच्या विषयांकडे लक्ष पुरवल्याबद्दल, जॉशी बेनेडिक्ट दिग्दर्शित 'अ कोकोनट ट्री'ला राष्ट्रीय स्पर्धा विभागात परीक्षकांकडून विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला.

मिफ्फ 2024 चा 'पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा दादासाहेब फाळके चित्रनगरी' पुरस्कार 'टूवर्डस हॅपी ऍलीज' या चित्रपटासाठी दिग्दर्शिका श्रीमोयी सिंग यांना प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समीक्षक परीक्षकांचा FIPRESCI हा पुरस्कारही मिळाला. सन्मानचिह्न आणि एक लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मिफ्फमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठीचा आयडीपीए पुरस्कार, एल्वाचिसा संगमा आणि दीपंकर दास यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चांचीसोआ (अपेक्षा)' या गारो चित्रपटाला मिळाला. सन्मानचिह्न आणि एक लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

'अमृतकाळातील भारत' या विषयावर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा पुरस्कार 'लाईफ इन लूम' या लघुपटाला मिळाला. एडमंड रॅन्सन यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात भारतातील विणकर समुदायासमोरील सामाजिक-आर्थिक आणि हवामानविषयक आह्वानांचा धांडोळा घेण्यात आला आहे. सन्मानचिह्न, प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचे पारितोषिक अनुक्रमे निरज गेरा यांना, त्यांच्या ‘द गोल्डन थ्रेड’ तर अभिजित सरकार यांना त्यांच्या 'धारा का टेम’ साठी देण्यात आले.  सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार विघ्नेश कुमुलाई यांना ‘करपरा’ साठी तर इरिन धर मलिक यांना 'फ्रॉम द शॅडोज' या चित्रपटाकरिता देण्यात आला. आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी म्हणजे सिनेछायाचित्रण यासाठीचा पुरस्कार बबिन दुलाल यांना ‘धोरपाटन: नो विंटर हॉलिडेज’ साठी तर सूरज ठाकूर यांना 'एंटँगल्ड' या चित्रपटांच्या उत्कृष्ट तांत्रिक हाताळणीसाठी देण्यात आले. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपये रोख असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे.

सन्माननीय अतिथी म्हणून बोलताना महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाची आणि त्यात प्रदर्शित झालेल्या अतुलनीय प्रतिभेची प्रशंसा केली. आपल्या देशातील चित्रपट दिग्दर्शक हे देशाचे कोहिनूर हिरेच आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या, समारोपाच्या सोहळ्यातील आपल्या बीजभाषणात दिग्दर्शकांची प्रशंसा केली. ज्या वेळी आपण पुढची वाटचाल सुरू करू, त्या वेळी आपल्या देशाचा वारसा आणि आपल्या चित्रपटांशी निगडित प्रत्येक घटकही पुढचा टप्पा गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येकाने इथून जाताना नवा दृष्टीकोन आत्मसात केल्याची जाणिव घेऊन आणि आगामी काळात स्वतःच्या क्षमता वाढविण्याची वचनबद्धता बाळगतच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा निरोप घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

चित्रपट महोत्सवासारख्या प्रभावी माध्यमातून प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदनही केले. आपल्या बीजभाषणातून मुनगंटीवार यांनी चित्रपटांची परिवर्तन घडवून आणण्याची क्षमताही अधोरेखित केली. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, त्यामुळेच तो सामाजिक परिवर्तनाचाही कारक ठरतो असे ते म्हणाले. या क्षेत्रातून उमटलेला एकच संवाद एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणू शकतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुनगंटीवार यांनी चित्रपटांची बहुआयामी भूमिकाही अधोरेखित केली. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर चित्रपट म्हणजे माणजे व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणाऱ्या उर्जेचे भांडारच आहे असो ते म्हणाले. जेव्हा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, त्यावेळी समाजाचा विकास होतो आणि जेव्हा समाजाचा विकास होतो तेव्हा राष्ट्राचाही विकास होतो हे तत्व त्यांनी आवर्जून मांडले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या ज्युरी सदस्यांची स्पर्धेतील चित्रपटांविषयीची मते व्यक्त करताना ज्युरी समितीचे  अध्यक्ष भारत बाला म्हणाले की सभोवतालच्या जगात आज देखील कुटुंब हेच जीवनाचा केंद्रबिंदू असून मानवतेतील लवचिकता आपल्याला आपलीच उत्तम आवृत्ती बनण्यासाठी प्रवृत्त करते आणि याच  सांस्कृतिक मूल्यांनी आपण प्रभावित झालो आहोत. "माहितीपटांच्या गाभ्यात मानवतेची संस्कृती आणि आपल्या जगातील प्रत्येक श्वास आणि जीवन प्रतिबिंबित होते. आपण आज आपल्या सर्वांकडूनच अधिकाधिक माहितीपटांमध्ये गुंतवणूक करण्याची अपेक्षा करूया जेणेकरुन मानवतेची भरभराट होईल, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार स्वीकारताना 'द गोल्डन थ्रेड'च्या दिग्दर्शिका निष्ठा जैन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या चित्रपटप्रवासातून त्यांनी शिकून घेतलेल्या गोष्टी उपस्थितांसमोर मांडल्या.

पंकज कपूर, अक्षय ओबेरॉय, शीबा चढ्ढा, अनुप सोनी, तनुज गर्ग, विवेक वासवानी अशा चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून या समारोप सोहळ्याची शान वाढवली. बहुरंगी, चैतन्यमयी आणि वेधक-वेधक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची रंगत वाढवली आणि उपस्थित प्रेक्षकांना या सांस्कृतिक संध्येने मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यात महोत्सवाच्या तांत्रिक समितीचा आणि चित्रपटक्षेत्रातील काही प्रख्यात व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि महोत्सव संचालक  पृथुल कुमार यांनी आभार प्रदर्शन  केले.

मिफ्फ  2024 सारांश :

मिफ्फच्या या 18 व्या आवृत्तीत 59 देशांतील 61 भाषांमधील 314 चित्रपट मोठ्या दिमाखाने प्रदर्शित झाले. याशिवाय 8 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 18 आशिया प्रीमियर आणि 21 भारतीय प्रीमियर यांची  उत्कृष्ट गुंफण देखील अनुभवायला मिळाली. या माध्यमातून जगभरातील चित्रपटनिर्मात्यांची जागतिक स्तरावरील पकड आणि कथानक मांडण्याची हातोटी यांचे दर्शन झाले.

मिफ्फ महोत्सवातील काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे डॉक्युमेंटरी फिल्म बझार.  एक अतिशय अभिनव उपक्रम ज्या माध्यमातून चित्रपटनिर्मात्यांना खरेदीदार, पुरस्कर्ते आणि सहयोगी घटकांशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाने 10 देशांमधील सुमारे 200 प्रकल्पांना आकर्षित केले, 27 भाषांमधील वैविध्यपूर्ण कल्पना आणि संधींचे स्फूर्तिदायक आदानप्रदान झाले.

महोत्सवातील उपस्थितांना अल्फोन्स रॉय, नेमिल शाह, शाजी एन. करुण, ऑड्रिअस स्टोनीस, संतोष सिवन आणि सुब्बिया नल्लामुथू यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांच्या  मास्टर क्लासेसची पर्वणी लाभली. या सत्राच्या माध्यमातून उदयोन्मुख चित्रपटनिर्मात्यांना चित्रपट निर्मितीच्या कलेतील मोलाची दृष्टी लाभली. असाधारण अध्ययनाच्या संधीचा अनुभव मिळाला ज्यामुळे त्यांचे ज्ञान आणि कौशल्य अधिक समृद्ध झाले. मिफ 2024 मधील पॅनेल चर्चेत माहितीपट,   शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन फिल्म निर्मितीशी  संबंधित समकालीन आणि नाविन्यपूर्ण विषयांवर विचारमंथन झाले. याशिवाय प्रतिनिधींना चित्रपट निर्मिती, जाहिरात आणि वितरणाचे नवीन पैलू उमगले आणि या उद्योगाच्या विकसित होत असलेल्या परिदृश्याबद्दलची त्यांची समज अधिक उंचीवर गेली. याशिवाय वरिष्ठ वॉर्नर ब्रदर ॲनिमेटरद्वारे एक विशेष ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स पाइपलाइन कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत अत्याधुनिक तंत्रांच्या गहन संशोधनाने सहभागी सदस्यांना मंत्रमुग्ध केले.

भारतीय माहितीपट निर्माते संघटनेने आयोजित केलेल्या खुल्या मंचामुळे माहितीपटांना निधी पुरवठा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ओ टी टी मंच, आणि समाज माध्यमांच्या युगातील चित्रपट निर्मिती यांसारख्या विषयांवर समावेशक आणि विचारप्रवर्तक चर्चा झाली.  या मंचाने आजच्या काळात या क्षेत्रासमोर असलेली  आव्हाने आणि संधी याविषयावर आपली मते सामायिक करण्यासाठी व्यावसायिकांना एक गतिशील जागा प्रदान केली. मिफ 2024 ने जागतिक सिनेमॅटिक देवाणघेवाण, सर्जनशीलता, सहयोग आणि जगभरातील वैविध्यपूर्ण कथाकथन परंपरेचा उत्सव साजरा करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून पुन्हा एकदा आपले स्थान अबाधित राखले आहे.

 

* * *

PIB Team MIFF | JPS/MC/Sushma/Rajshree/Jai/Tushar/Bhakti/D.Rane | 60

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027817) Visitor Counter : 84


Read this release in: English , Hindi , Urdu