माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18 व्या मिफ्फ मध्ये फॅब्रिस कॅरीबरोबरच्या कार्यशाळेत स्टॅनिस्लावस्कीच्या अभिनयाचे गुपित उलगडले
अभिनय म्हणजे जीवन जगणे, ते नेहमीच नैसर्गिक असायला हवे: फॅब्रिस कॅरी
Posted On:
20 JUN 2024 10:31PM by PIB Mumbai
मुंबई, 20 जून 2024
18 वा मिफ्फ, म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज "अभिनय कलेत स्टॅनिस्लाव्स्की पद्धतीचा दृष्टीकोन" या विषयावरील चित्तवेधक कार्यशाळा झाली. फ्रँको-बेलारशियन असोसिएशन डेमेन ले प्रिंटेम्प्स टीएट्रोचे प्रसिद्ध कला संचालक फॅब्रिस कॅरी यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
या थेट आणि परस्परसंवादी सत्रात, कॅरी यांनी रशियन रंगभूमीवरील प्रख्यात व्यक्तिमत्व कॉन्स्टँटिन स्टॅनिस्लावस्की यांच्या जीवनाचा आणि कलात्मक कारकीर्दीचा पट उलगडला आणि त्यांच्या आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनाचा मागोवा घेतला. “अभिनेत्याने नेहमीच जीवंत असायला हवं. अभिनय म्हणजे आयुष्य जगणे,” असे नमूद करून, कॅरीने अभिनयातील सहजतेच्या महत्त्वावर भर दिला.
पारंपरिक अभिनयापेक्षा नैसर्गिक पात्रांना स्टॅनिस्लावस्कीने दिलेल्या प्राधान्यावर प्रकाश टाकून, कॅरीने स्टॅनिस्लाव्स्कीने त्याच्या पद्धतीत स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विशद केला. “आपल्या पात्रांमध्ये नेहमीच प्रामाणिकपणा आणि सहजता प्राप्त करण्याचा त्याचा हेतू होता,” असे मत व्यक्त केले. थिएटर आणि कलेच्या वैश्विक भाषेवर चर्चा करताना, कॅरी म्हणाले, “संवादाचा अर्थ केवळ मजकूर नाही. तो हेतू आणि भावना आहे. एक चित्ताकर्षक नाटक नेहमीच भाषा आणि संस्कृतीचे अडथळे ओलांडून प्रेक्षकांशी खोलवर संवाद साधते.”
प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेण्यासाठी कलाकारांनी नैसर्गिक आणि संवेदनशील राहण्याची गरज कॅरीने अधोरेखित केली. एखाद्या अभिनेत्याने कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहायला हवे, यावर त्यांनी भर दिला, "चांगल्या अभिनेत्याला कोणत्याही प्रकारच्या कठीण किंवा आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी अत्यंत सावध असणे आवश्यक आहे."
प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, नवोदित अभिनेत्यांनी आपल्या कामगिरीमध्ये सृजनशीलता आणि वेगळेपणा अंगीकारावा असे कॅरीने सुचवले. "प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्ही नेहमीच काहीतरी वेगळे, सृजनशील आणि असामान्य करण्याची आवश्यकता असते," त्याने सुचवले.
या सत्राने स्टॅनिस्लाव्स्कीची हाताळणी जाणून घेण्यासाठी मोलाचा दृष्टीकोन दिला आणि अभिनयातील सहजता, सहानुभूती आणि तत्परतेच्या महत्वावर भर दिला.
* * *
PIB Team MIFF | S.Kane/R.Agashe/D.Rane | 57
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2027291)
Visitor Counter : 55