माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

18व्या मिफ्फ मध्ये माहितीपूर्ण रेट्रोस्पेक्टिव्ह सत्रासह ॲनिमेशनचे अग्रणी जिरी त्रन्का यांना देण्यात आली मानवंदना

Posted On: 20 JUN 2024 10:12PM by PIB Mumbai

मुंबई, 20 जून 2024

 

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज प्रख्यात चेक ॲनिमेशन चित्रपट निर्माते जिरी त्रन्का यांना “फ्रॉम थिएट्रिकल पपेट्री टू सिनेमॅटिक पर्स्पेक्टिव्ह – अ न्यू जर्नी इन युरोपियन ॲनिमेशन” शीर्षक असलेल्या  माहितीपूर्ण रेट्रोस्पेक्टिव्ह सत्राद्वारे मानवंदना देण्यात आली. या सत्रात प्रतिष्ठित नृवंशशास्त्रज्ञ आणि फ्रेंच ॲनिमेशन चित्रपट निर्माते ऑलिव्हियर कॅथरीन यांनी त्रन्का यांच्या महत्त्वपूर्ण कार्याप्रति आदर  आणि विस्तृत ज्ञान सामायिक केले.

गुंतागुंतीचे नाट्य  आणि मनोवैज्ञानिक सखोलता  व्यक्त करण्यासाठी कठपुतळ्यांचा वापर करण्याच्या ॲनिमेशनच्या उल्लेखनीय नवीन शैलीचे अग्रणी  म्हणून जिरी त्रन्का यांची महत्त्वपूर्ण भूमिका ऑलिव्हियर कॅथरीन यांनी अधोरेखित केली.  देहबोली, बोलकी प्रकाशयोजना आणि गतिशील  कॅमेरा हालचालींच्या नाविन्यपूर्ण वापराद्वारे, त्रन्का यांची पात्रे जिवंत झाली आणि ॲनिमेशन उद्योगात नवीन मानके प्रस्थापित केली. लक्षवेधी  चित्रपट निर्मिती करिअरला सुरुवात करण्यापूर्वी, त्रन्का एक सर्जनशील कलाकार, लोकप्रिय चित्रकार आणि लेखक होते. ॲनिमेशनकडे ते वळल्याचा प्रचंड प्रभाव या क्षेत्रावर पडला, जगभरातील असंख्य चित्रपट निर्माते आणि ऍनिमेटर्सना यामुळे प्रेरणा मिळाली.

कॅथरीन यांनी सांगितले की “चेक ॲनिमेशनच्या विकासावर त्रन्का यांच्या चित्रपटांचा मोठा प्रभाव पडला. जागतिक स्तरावरील चित्रपट निर्मात्यांच्या अनेक पिढ्यांच्या करिअरला त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. त्यांनी अठरा लघुपट आणि सहा दीर्घावधीचे ॲनिमेटेड चित्रपट तयार केले. याची तुलना केवळ वॉल्ट डिस्ने स्टुडिओने केलेल्या चित्रपटांशी होऊ शकते आणि कान ते व्हेनिस आणि त्याही पलीकडे या चित्रपटांनी वाहवा मिळवली.

1946 मध्ये उभारलेला त्रन्का यांचा पपेट ॲनिमेशन स्टुडिओ, चेक ॲनिमेशनचा आधारस्तंभ बनला आणि या क्षेत्रात देशाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात मदत केली. त्यांनी कॅरेल झेमन, हर्मिना टायर्लोवा, जॅन स्वंकमेजर आणि जिरी बार्टा यांसारख्या अन्य  स्टॉप-मोशन ॲनिमेशन मास्टर्ससोबत देखील काम केले. ट्रन्का, ज्यांना "पूर्व युरोपचा वॉल्ट डिस्ने" म्हणून संबोधले जाते, त्यांनी पारंपारिक चेक  थिएटरच्या कठपुतळ्यांच्या क्षमता आणि मर्यादांचा अचूक वापर  केला आणि त्यांचे रूपांतर एका अद्वितीय आणि सामर्थ्यवान सिनेमॅटिक भाषेत केले.  समकालीन पूर्व युरोपीय ॲनिमेशनमध्ये त्याचा प्रभाव कायमच लक्षणीय राहिला आहे..

त्रन्का यांच्या उल्लेखनीय कामगिरींपैकी एक म्हणजे "झविरात्का अ पेट्रोव्स्टी" हा त्यांचा लघुपट, ज्याने 1946 मध्ये कानमहोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जिंकला आणि ॲनिमेशन विश्वात त्यांच्या दिमाखदार  प्रवासाची सुरुवात केली.

मिफ्फ मधील रेट्रोस्पेक्टिव्ह सत्रामध्ये केवळ त्रन्का यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला  नाही तर कठपुतळी आणि ॲनिमेशनप्रति त्यांचा अभिनव दृष्टिकोन आजही ॲनिमेटर्सना कशी  प्रेरणा देतो आणि प्रभावित करतो याचाही मागोवा घेण्यात आला.

 

* * *

PIB Team MIFF | S.Patil/S.Kane/D.Rane | 55

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2027248) Visitor Counter : 63


Read this release in: Urdu , English , Hindi , Hindi_MP