माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिन्स्क ते मुंबई : 18 व्या मिफ्फ मध्ये बेलारशियन सिनेमाचे प्रदर्शन


मिफ्फ सारखे मंच देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करतात: युरी अलेक्सेई, महासंचालक बेलारूस फिल्म

बेलारूसमध्ये भारतीय चित्रपट लोकप्रिय आहेत, आम्ही भारतीय चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत : अलेक्झांडर मात्सुको, मुंबईतील बेलारूसचे महावाणिज्यदूत

Posted On: 20 JUN 2024 8:55PM by PIB Mumbai

मुंबई, 20 जून 2024

 

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) चार बेलारशियन चित्रपटांचे विशेष पॅकेज प्रदर्शित करण्यात आले, ज्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण आणि भारत आणि बेलारूस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मिफ्फ 2024 च्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेला संबोधित करताना, बेलारूसच्या नॅशनल फिल्म स्टुडिओ 'बेलारूसफिल्म' चे महासंचालक युरी अलेक्सेई यांनी मिफ्फ ने प्रदान केलेल्या मंचाबद्दल आनंद आणि कौतुक व्यक्त केले. मुंबईतील बेलारूसचे महावाणिज्यदूत अलेक्झांडर मात्सुको देखील यावेळी उपस्थित होते, ज्यांनी अशाच भावना व्यक्त केल्या.

युरी अलेक्सेई यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामंजस्य वाढवण्यासाठी मिफ्फ सारख्या चित्रपट महोत्सवाच्या महत्त्वावर भर दिला. "मला खूप आनंद आहे की 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 4 बेलारशियन चित्रपट विशेष पॅकेज म्हणून प्रदर्शित केले गेले. मिफ्फ सारखे मंच देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात," असे त्यांनी नमूद केले.

'बेलारूसफिल्म' स्टुडिओ यावर्षी 100 वा वर्धापन दिन साजरा करेल असे युरी अलेक्सेई यांनी जाहीर केले. हा मैलाचा टप्पा गाठल्याची आठवण म्हणून, नोव्हेंबर 2024 मध्ये बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे 'लिस्टापड' अर्थात 'पवित्र युग' नावाचा चित्रपट महोत्सव आयोजित केला जाईल. या महोत्सवात माहितीपट, लघुपट, ॲनिमेशनपट आणि नाटक यासह सहा वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट दाखवले जातील. "मला या चित्रपट महोत्सवासाठी भारतीय सिनेरसिकांना आमंत्रित करायचे आहे," असेही ते म्हणाले.

बेलारशियन चित्रपट आणि कलागुणांना चालना देण्यासाठी मिफ्फ चे महत्त्व अलेक्झांडर मात्सुको यांनी अधोरेखित केले. "आम्ही बेलारशियन चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी मिफ्फ ला भेट दिली. मुंबई हे भारतीय चित्रपटाचे केंद्र असल्याने आम्हाला बेलारशियन प्रतिभा जगासमोर सादर करण्याची उत्तम संधी आहे," असे ते म्हणाले. त्यांनी मिथुन चक्रवर्तीच्या अभिनयाने रसिकप्रिय ठरलेला आणि बेलारूसमध्ये प्रदर्शित झालेला पहिला भारतीय चित्रपट ‘डिस्को डान्सर’ची आठवण सांगितली आणि बेलारूसमध्ये भारतीय चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख केला. "बेलारूसमधील लोक भारतीय चित्रपटातील नृत्य, संगीत आणि नाटकाचा आनंद घेतात," असे त्यांनी नमूद केले.

भारतीय चित्रपट निर्मात्यांना आमंत्रण देत मत्सुको यांनी बेलारूसच्या निसर्गरम्य सौंदर्याबद्दल वर्णन करून ते चित्रिकरणाचे ठिकाण होऊ शकते असे सांगितले. "बेलारूस हा चित्रपट-चित्रिकरणासाठी एक सुंदर देश आहे. आम्ही भारतीय चित्रपट निर्मात्यांना सुविधा देण्याच्या मार्गांवर काम करत आहोत आणि त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास उत्सुक आहोत," असे त्यांनी समारोप करताना सांगितले.

पत्रकार परिषदेत सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठीचा परस्पर उत्साह आणि सांस्कृतिक दरी भरून काढण्यात सिनेमाची भूमिका अधोरेखित करण्यात आली, ज्यामुळे भारतीय आणि बेलारशियन चित्रपट निर्मात्यांमधील भविष्यातील सहयोगाचा मार्ग मोकळा झाला.

 

* * *

PIB Team MIFF | S.Patil/V.Joshi/D.Rane | 52

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027232) Visitor Counter : 25


Read this release in: English , Urdu , Hindi , Hindi_MP