वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-कंबोडिया व्यापार आणि गुंतवणुकीवरील संयुक्त कार्यगटाची दुसरी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न


युपीआय, फार्मास्युटिकल्स, पारंपारिक औषधे यांमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक तसेच सहकार्य वृद्धिंगत करण्यावर देण्यात आला भर

Posted On: 20 JUN 2024 2:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जून 2024

 

भारत-कंबोडिया व्यापार आणि गुंतवणुकीवरील संयुक्त कार्यगटाची दुसरी बैठक काल नवी दिल्ली येथील वाणिज्य भवनात भारताने आयोजित केली होती. या बैठकीच्या सह-अध्यक्षपदी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या  वाणिज्य विभागाचे सहसचिव सिद्धार्थ महाजन आणि कंबोडियाच्या वाणिज्य मंत्रालयाचे आंतरराष्ट्रीय व्यापार महासंचालक लाँग केमविचेत होते. या बैठकीत संबंधित मंत्रालयांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

सिद्धार्थ महाजन यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुक वृद्धिंगत करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य आणि सहयोग यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला.

या बैठकीत पारंपारिक औषधे आणि ई-प्रशासनातील  सहकार्य, नवीन उत्पादने समाविष्ट करून  व्यापारी मालात वैविध्य आणणे , द्विपक्षीय गुंतवणूक करार, भारतीय औषधकोशाला मान्यता औषध निर्मिती क्षेत्रातील सहकार्य यावर चर्चा झाली.

या बैठकीत व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आधारित डिजिटल पेमेंटमध्ये सहकार्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली.

कंबोडियात भारतीय व्यवसायांसाठी उपलब्ध असलेल्या असंख्य गुंतवणुकीच्या संधींबाबत कंबोडियाच्या बाजूने माहिती देण्यात आली.  उच्च विकास क्षमता असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये या संधी आहेत.

भारत-कंबोडिया व्यापार आणि गुंतवणुकीवरील संयुक्त कार्यगटाची पहिली बैठक जुलै 2022 मध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. संयुक्त कार्यगटाची स्थापना झाल्यानंतर ही पहिली प्रत्यक्ष बैठक होती. संयुक्त कार्यगटाने व्यापाराचा विस्तार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी व्यापाराचे मूल्य आणि प्रमाण सुधारण्यासाठी विविध उपायांवर चर्चा केली. ठोस परस्पर लाभांसाठी अधिक संवाद साधण्याच्या गरजेवर दोन्ही बाजूंकडून सहमती झाली.

 

* * *

NM/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026950) Visitor Counter : 20