माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मिफ्फ 18 मधील मिडफेस्ट लघुपट 'द कमांडंट्स शॅडो', होलोकॉस्टबाबतचा नवा दृष्टीकोन मांडतो
भारतामध्ये आंतरराष्ट्रीय सह-निर्मितीची अफाट क्षमता आहे: दिग्दर्शक डॅनिएला वोल्कर
बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न हा चित्रपटाच्या आशयाइतकाच महत्वाचा असतो: कार्यकारी निर्माता साजन राज कुरूप
कथा आणि सादरीकरणाचा एकसंधपणा चित्रपट घडवतो अथवा बिघडवतो: सह कार्यकारी निर्माता वेंडी रॉबिन्स
Posted On:
18 JUN 2024 10:40PM by PIB Mumbai
मुंबई, 18 जून 2024
भारतामध्ये आंतरराष्ट्रीय सह-निर्मितीची अफाट क्षमता असल्याचे 'द कमांडंट्स शॅडो' चित्रपटाच्या दिग्दर्शिका डॅनिएला वोल्कर यांनी म्हटले आहे. त्या आज 18 वा मिफ्फ, म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करत होत्या. “विशाल देश असल्यामुळे भारताकडे विपुल आशयसंपन्न सामुग्री आहे. भारताकडे चित्त गुंतवून ठेवणाऱ्या कथांचे भांडार आहे, आणि भारतीय कथा जागतिक बनताना आणि व्यापक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचताना पाहायला मला आवडेल,” त्या म्हणाल्या. मिफ्फ मध्ये आज अधिकृत मिड-फेस्ट चित्रपट म्हणून 'द कमांडंट्स शॅडो', चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. वोल्कर यांचा हा कालसुसंगत आणि मार्मिक टिप्पणी करणारा माहितीपट, आपल्याला हान्स यूर्गन हॉस, जो रुडॉल्फ हॉसचा 87 वर्षांचा मुलगा आहे, त्याच्या भावविश्वात घेऊन जातो. त्याच्या वडिलांनी मागे सोडलेल्या भयानक वास्तवाला तो प्रथमच सामोरा जात आहे. हॅन्सचे वडील ऑशविट्झचे कॅम्प कमांडंट होते आणि दहा लाख ज्यूंच्या हत्येचे सूत्रधार होते. हान्स यूर्गन, जेव्हा हॉस ऑशविट्झ मधल्या आपल्या कुटुंबाच्या व्हिलामध्ये बालपणाचा आनंद घेत होता, तेव्हा ज्यू कैदी अनिता लास्कर-वॉलफिश, छळ छावणीतल्या जीवघेण्या संघर्षाला तोंड देत जगण्यासाठी धडपडत होती. काई हॉस, माया लास्कर-वॉलफिश आणि त्यांची मुलं, ही चित्रपटातली चार प्रमुख पात्र, अत्यंत भिन्न पार्श्वभूमीचं आपापलं ओझं घेऊन, त्याचा शोध घेत असतात. या पत्रकार परिषदेला चित्रपटाचे कार्यकारी निर्माता साजन राज कुरूप आणि सह कार्यकारी निर्माते वेंडी रॉबिन्स देखील उपस्थित होते.
(छायाचित्र: डॅनिएला वोल्कर, 'द कमांडंट्स शॅडो' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता साजन राज कुरूप आणि वेंडी रॉबिन्स मिफ्फ 2024 मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना)
या चित्रपटासाठी आशयसंपन्न सामुग्री मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नांबद्दल बोलताना दिग्दर्शक, डॅनिएला वोल्कर म्हणाल्या की, रुडॉल्फ हॉसने आपल्याला मृत्यूदंड होण्याच्या केवळ सात ते आठ आठवडे आधी लिहिलेलं हस्तलिखित, हाच या चित्रपटाचा आधार होता. “हे हस्तलिखित यापूर्वी कधीच वाचलं गेलं नव्हतं, अथवा चित्रित केलं गेलं नव्हतं. हा चित्रपट त्यावेळी नेमकं काय घडलं, हे हॉसच्या स्वतःच्या शब्दातच सांगतो, त्या म्हणाल्या.ऑशविट्झची कल्पना कशी केली गेली आणि त्यामधून गॅस चेंबर्सची निर्मिती झाली, हे सांगताना, दुसरीकडे त्याचा विरोधाभासही हा चित्रपट सांगतो. ते म्हणजे, रुडॉल्फ हॉसने त्याच्या नऊ वर्षांच्या मुलाला लिहिलेल्या पत्रातून एक चांगला आणि प्रेमळ पिता म्हणून त्याची छबी आपल्याला दिसते, त्या म्हणाल्या. चित्रपटाच्या निर्मितीसाठी निधी गोळा करण्याचा अनुभव सांगताना साजन राज कुरूप म्हणाले, “अचूक अंदाजाला पर्याय नाही. सिनेमा हा व्यवसाय आहे. कथा सामग्रीचा प्रत्येक भाग हा एक व्यवसाय आहे. बाजारपेठ ही सिनेमाच्या आशयाइतकीच महत्त्वाची आहे. चित्रपट निर्मितीमागे अहंकार नव्हे, तर उद्दिष्ट असायला हवे. या दोन्हीमध्ये अत्यंत धूसर सीमा रेषा आहे. चित्रपट जग बदलू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला राजकारणी व्हावे लागेल. मात्र आपण एकच करू शकतो, ते म्हणजे प्रामाणिकपणे कथा सांगू शकतो. अहंकार हे उद्दिष्ट असू नये. दर्जेदार कथाकथन ही चित्रपट निर्मात्याची प्राथमिक जबाबदारी असते.”माहितीपटांकडे बघण्याच्या भारताच्या बदलत्या दृष्टिकोनावर बोलताना साजन राज कुरूप म्हणाले की, ऑस्कर सारखे सन्मान मिळायला सुरुवात झाली आहे आणि माहितीपटांबाबतच्या पूर्वकल्पना दूर होऊन, या माध्यमातून मनोरंजनाची भरपूर सामग्री तयार केली जात आहे. “आता माहितीपट बनवण्याच्या व्यवसायाचं नवीन प्रारूप देखील तयार झालं आहे. त्याचं स्वरूप आता स्वीकारलं जात आहे. माहितीपट देखील स्ट्रीमिंग विश्वाचा एक भाग बनत आहे,” ते पुढे म्हणाले. आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आणखी बरेच प्रकल्प प्रस्तावित असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
(छायाचित्र: डॅनिएला वोल्कर, 'द कमांडंट्स शॅडो' चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता साजन राज कुरूप आणि वेंडी रॉबिन्स मिफ्फ 2024 मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना)
वेंडी रॉबिन्स यांनी चित्रपटांसाठी निधी मिळविण्यासाठी असलेले वेळेचे महत्त्व अधोरेखित केले. “सुरुवातीला आम्ही डॅनिएलाच्या क्रेडिट कार्डवर पैसे खर्च करत होतो आणि डॅनेलाच्या घरात ब्लॅक आउट शीट वापरून चित्रीकरण करत होतो. पण, याच कुटुंबाची काल्पनिक कथा सांगणाऱ्या ‘झोन ऑफ इंटरेस्ट’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाने आमच्या चित्रपटाला नवी दिशा दिली. सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे हा चित्रपट अधिक कालसुसंगत बनला आणि शेवटी वॉर्नर ब्रदर्सने तो विकत घेतला.” वेंडीनेही याला दुजोरा दिला, आणि कथा आणि सादरीकरणाचा एकसंधपणा चित्रपट घडवतो अथवा बिघडवतो, याचा पुनरुच्चार केला.मिफ्फचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या डॉक बझारचा संदर्भ देताना डॅनिएला वोल्कर म्हणाल्या की, चित्रपट निर्मात्यांना भेटण्यासाठी आणि सहयोग करण्यासाठी असे व्यासपीठ मिळणे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
* * *
PIB Team MIFF | M.Chopade/R.Agashe/D.Rane | 41
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2026440)
Visitor Counter : 53