माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिफ्फ 2024: चरित्रात्मक माहितीपट विरुध्द जीवनपट यावर तज्ज्ञांद्वारे प्रबोधनात्मक चर्चा


चरित्रात्मक चित्रपटांसाठी खऱ्या अर्थाने संशोधन आवश्यक, तथ्यांना धरून रहा: राहुल रवैल

चरित्रात्मक चित्रपटातील मुख्य पात्राच्या कथानकाला धक्का न लावता घटना नाट्यमय करा : रॉबिन भट

Posted On: 18 JUN 2024 9:45PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) आज चरित्रात्मक माहितीपट (बायोग्राफिकल डॉक्युमेंट्री) आणि जीवनपट (बायोपिक) यांच्यातील सूक्ष्म बारकाव्यांबाबत तज्ज्ञांच्या विचारप्रवर्तक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘बायोग्राफिकल डॉक्युमेंटरीज विरुद्ध बायोपिक्स: द ब्लरिंग ऑफ बाउंडरीज’ या शीर्षकाखालील सत्राने चित्रपट उद्योगातील या दोन शैलींचे नाजूक वेगळेपण आणि सहअस्तित्व यांचा धांडोळा घेतला. 

 

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि एडिटर राहुल रवैल, पटकथा लेखक रॉबिन भट्ट, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते बी.एस. लिंगदेवरू आणि दिग्दर्शक-निर्माते मिलिंद लेले यांच्यासह चित्रपट उद्योगातील नामवंत व्यक्तींनी त्यांचा दृष्टिकोन मांडला. सत्राचे सूत्रसंचालन प्रतिष्ठित चित्रपट समीक्षक आणि 21 चित्रपटविषयक पुस्तकांचे लेखक ए. चंद्रशेखर यांनी केले.

 

राहुल रवैल यांनी चरित्रात्मक माहितीपट आणि जीवनपट यातील फरक दाखविण्याचे अवघड आव्हान अधोरेखित करून चर्चेला सुरुवात केली. त्यांनी स्पष्ट केले, “चरित्रात्मक माहितीपट वास्तविक घटनांचे जसेच्या तसे वर्णन करतो, तर जीवनपट त्याच घटनांनी प्रेरित असतो, परंतु कथा अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्याला नाट्यमय रूप दिलेले असते. दोन्ही शैलींना सखोल संशोधनाची आवश्यकता आहे आणि ते वेगळे प्रवाह आहेत जे एकमेकांना पुनर्स्थित करण्याऐवजी एकत्र असले पाहिजेत.

 

रॉबिन भट्ट यांनी भारतातील बायोपिकची सध्याची लोकप्रियता आणि यश यावर भर दिला. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी नाट्यीकरणाचे महत्त्व त्यांनी नमूद केले परंतु चित्रपट निर्मात्यांना मुख्य पात्राच्या कथानकाला धक्का न लावता त्याचा मान राखण्यास सांगितले. “तुम्ही घटना नाट्यमय दाखवू शकता, परंतु व्यक्ती नाही. कथेच्या साराशी खरे राहून मनोरंजन करणे हे ध्येय आहे,” असा सल्ला त्यांनी दिला.

 

बी.एस. लिंगदेवरू यांनी त्यांच्या ‘नानू अवनल्ला…अवलू’ या चित्रपटातील त्यांचा अनुभव कथन केला आणि माहितीपटांमध्ये तथ्यांना धरून राहण्याच्या महत्त्वावर जोर दिला. “कथेचा भाग असलेल्या प्रत्येक पात्राचा समावेश करा. कोणतेही पात्र वगळल्यास माहितीपट अपूर्ण राहू शकतो,” अशी टिप्पणी त्यांनी केली.

 

मिलिंद लेले यांनी चरित्रात्मक चित्रपटांमध्ये सनसनाटी टाळण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी सुचवले की चित्रपट निर्मात्यांनी मुख्य पात्राच्या कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत करून त्यांची संमती आणि पाठिंबा मिळवावा, ज्यामुळे चित्रपटाला महत्त्वपूर्ण कस आणि सत्यता प्राप्त होऊ शकते. "पात्राच्या जिवलगांसोबत संवाद साधल्याने अमूल्य दृष्टिकोन मिळू शकतो आणि संभाव्य विवाद टाळण्यास मदत होते," असे त्यांनी निदर्शनास आणले.

चर्चासत्राचा समारोप करताना चित्रपटाच्या कथानकात एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी ते पूरक असल्याची खात्री करून, चरित्रात्मक माहितीपट आणि जीवनपट या दोन्हींची अखंडता राखण्याच्या महत्त्वावर तज्ज्ञांनी एकमत व्यक्त केले. 

 

* * *

PIB Team MIFF | S.Nilkanth/V.Joshi/D.Rane | 36



(Release ID: 2026376) Visitor Counter : 42