माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मिफ्फ 2024 मध्ये पथदर्शी महिला चित्रपटनिर्मात्यांनी सामाईक केल्या त्यांचे संघर्ष आणि यशोगाथा
सृष्टी लखेरा, फरहा खातून, प्रेरणा बार्बरूआ आणि इसाबेल सिमोनी माहितीपट निर्मितीच्या माध्यमातून महिलांच्या कथनाचा वेध घेण्यासाठी आल्या एकत्र
Posted On:
17 JUN 2024 10:11PM by PIB Mumbai
मुंबई, 17 जून 2024
18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने चार आघाडीच्या महिला चित्रपटनिर्मात्यांना “ तिची कहाणी उलगडताना :माहितीपट निर्मितीच्या माध्यमातून महिलांच्या कथनाचा वेध” नावाच्या एका अभ्यासपूर्ण सत्रामध्ये एकत्र आणले. नामवंत माहितीपट कथनकार क्वीन हजारिका यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. या सत्रामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सृष्टी लखेरा, फरहा खातून, प्रेरणा बार्बरूआ आणि प्रसिद्ध लेखिका, निर्मात्या आणि दिग्दर्शिका इसाबेल सिमोनी सहभागी झाल्या. या चमूने त्यांची कला, सामाजिक विषय आणि आव्हाने आणि चित्रपट उद्योगातील यशस्वी कामगिरी याविषयी चर्चा केली.
उत्तराखंडच्या सृष्टी लखेरा यांनी महिलांसाठी दगड फोडण्यापासून कविता लेखनापर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही यावर भर दिला. त्यांचा पदार्पणातील माहितीपट एक था गाव या माहितीपटाने 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम ऑडियोग्राफीचा पुरस्कार मिळवला होता. या माहितीपटात त्यांच्या वडिलांच्या हिमालयाच्या परिसरातील गावातील आयुष्य टिपले होते. केवळ सात रहिवाशांसह चित्रिकरण सुरू केलेल्या या माहितीपटात एका 80 वर्षाच्या वृद्धेचा आणि 19 वर्षांच्या युवतीचा एकाकी गावातील आयुष्य आणि दुरावत चाललेल्या शहराचे अस्तित्व यामध्ये कशाची निवड करायची याबाबतचा संघर्ष मांडला आहे. अशा प्रकारच्या त्याग केलेल्या गावांमध्ये नेहमीच महिला आणि दलित मागे राहतात कारण शहरांमध्ये जाण्याचा बहुमान नेहमीच पुरुषांचा असतो, याकडे लखेरा यांनी लक्ष वेधले. “ महिलांना आपली स्वतःची कमाई करायची असते पण त्यांच्याकडे तसे पर्याय नसतात,” या चित्रपट निर्मातीने सांगितले. ग्रामीण भागांमध्ये डिजिटल मंचावरील वाढत्या अवलंबित्वाकडे त्यांनी लक्ष वेधले आणि दुर्गम गावातही अतिशय सामान्य परिस्थितीमधल्या स्वतःहून लिखाण करायला, रेकॉर्ड करायला आणि संगीताचे मिश्रण करायला शिकलेल्या तरुण हिप हॉप कलाकारांच्या प्रेरणादायी वाटचालीचा उल्लेख केला.
इसाबेल सिमोनी यांनी लैंगिक समानता प्राप्त करण्याच्या आव्हानांवर आणि त्यांच्या कथाकथनात महिलांचे प्रतिनिधित्व करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी महिला चित्रपट निर्मात्यांना तोंड द्यावे लागणाऱ्या त्यांचे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत न पोहोचण्याची भीती आणि आर्थिक परिणाम यासह विविध अडचणींवर प्रकाश टाकला. “चित्रपटाच्या सेटवर देखील तुम्हाला तुमच्या चमूला आत्मविश्वास द्यावा लागतो. आपण व्यावसायिक व्हायला हवे आणि जो विषय पडद्यावर दाखवायचा आहे त्यासाठी संघर्ष केला पाहिजे.” असे सिमोनी यांनी भावी चित्रपट निर्मात्यांना सल्ला देताना सांगितले.
भारताच्या ईशान्येकडील राज्यांतील कुशल दिग्दर्शक, लेखिक, अभिनेत्री आणि मॉडेल प्रेरणा बार्बरूआ यांनी 50 हून अधिक माहितीपट तयार केले आहेत. बार्बरूआ यांचा पहिला चित्रपट त्यांच्या पितृसत्ताक संगोपनाशी विरोधाभासी असून मेघालयातील मातृसत्ताक समाजापासून प्रेरित आहे. या माहितीपटात, त्यांनी मातृसत्ताक जमातींमधील अनोख्या सामाजिक भूमिकांचा मागोवा घेतला आहे. यासाठी त्यांनी 36 तासांचे फुटेज गोळा करून त्यातून एका 36 मिनिटांचा माहितीपट तयार केला आहे. मेघालयच्या आदिवासी समाजातील एका पद्धतीनुसार पत्नीच्या घरात राहणाऱ्या पुरुषांबद्दल बार्बरूआ यांनी उत्सुकता व्यक्त केली.
एक चित्रपट निर्माती आणि संपादक असणाऱ्या फरहा खातून यांनी आपल्या माहितीपटांमध्ये लिंग, पितृसत्ता आणि धार्मिक कट्टरता या विषयांचा धांडोळा घेतला आहे. त्यांनी भारतातील महिला माहितीपट निर्मात्यांच्या लक्षणीय उपस्थितीवर प्रकाश टाकला तसेच पूर्वीची फिल्म्स डिव्हिजन आणि सध्याच्या एनएफडीसी द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या समर्थनाची प्रशंसा केली. हे सरकारी समर्थन महिला माहितीपट निर्मात्यांना त्यांची कारकीर्द सुरू करण्यासाठी तसेच ती टिकवून ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाठींबा आणि आत्मविश्वास देते असेही त्या म्हणाल्या.
* * *
PIB Team MIFF | N.Chitale/Shailesh/Shraddha/D.Rane | 29
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2026003)
Visitor Counter : 74