माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिफ मध्ये “प्रेरणादायक कथा: नवोन्मेष आणि सर्जनशीलता” या विषयावर पॅनेल चर्चासत्राचे आयोजन


प्रेरणादायी मिफ तज्ज्ञमंडळींद्वारे सामाजिक नवोन्मेषकारांचा प्रवास साजरा

‘आझादी की अमृत कहानियाँ’ अंतर्गत सामाजिक उद्योजकांच्या यशोगाथांच्या आकर्षक ॲनिमेशन कथापटाचे ट्रेलर प्रदर्शित

Posted On: 16 JUN 2024 9:22PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2024

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ) आज “प्रेरणादायक कथा: नाविन्य आणि सर्जनशीलता” या सर्जनशील तज्ज्ञमंडळ (पॅनेल) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात नवोदित सामाजिक उद्योजकांचा समावेश होता ज्यांनी समाजात परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेले उपक्रम सामायिक केले. या नवोन्मेषकारांनी आव्हानांचा सामना करत, सर्जनशीलतेची कास धरत त्यांच्या नवकल्पना साकार करण्यासाठी प्रयत्नांची कशी पराकाष्ठा केली याबाबत त्यांचा जीवनपट या चर्चासत्रात उलगडण्यात आला. या चर्चासत्रात तज्ज्ञमंडळींनी स्त्री-पुरुषांच्या सीमारेषा मोडून सामाजिक अडथळ्यांवर मात करण्यापर्यंत त्यांचा दृष्टिकोन आणि अनुभव सामायिक केले, ज्याद्वारे इतरांना त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यास आणि चिरस्थायी प्रभाव पाडण्यास प्रेरणा मिळाली.

या यशोगाथा साजऱ्या करण्याच्या आणि लाखो लोकांना प्रेरणा देण्याच्या प्रयत्नात, ‘आझादी की अमृत कहानियाँ’ मालिकेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि नेटफ्लिक्स द्वारे त्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ॲनिमेशन चित्रपटांची सहनिर्मिती केली जात आहे. चर्चासत्रादरम्यान या चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. या नवोन्मेषकारांच्या कथा या पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी निवडल्या असून त्या एनएफडीसी आणि नेटफ्लिक्स यांच्यातील सहयोगी उपक्रमात केंद्रस्थानी आहेत. ॲनिमेशन आणि लाइव्ह-ॲक्शन यांचे मिश्रण असलेल्या आकर्षक कथाकथनाच्या तंत्राद्वारे, राज कुमार राव यांनी कुशलतेने कथन करून, या नवोदितांची प्रभावशाली जीवनगाथा साकारली जात आहे.

या मालिकेवर प्रकाश टाकताना, भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयातील स्ट्रॅटेजिक अलायन्सेसच्या संचालक डॉ. सपना पोटी यांनी सांगितले की, या केवळ ॲनिमेटेड कथा नसून लाखो लोकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक नवकल्पकांच्या गाथा आहेत. नवोन्मेष म्हणजे केवळ नवीन गोष्टीचा विकास नसून तो शाश्वत असायला हवा, यावर त्यांनी भर दिला. “या मालिकेतील या प्रत्येक कथेत शाश्वतता आहे, ज्याचा विस्तार करणे आवश्यक आहे जेणेकरून देशभरातील लोकांना त्यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती मिळेल. यामुळेच सरकारने त्यांच्या कथा उजेडात आणण्यासाठी हा मंच निवडला आहे,” असेही त्यांनी उद्धृत केले. 

एखादा नवोपक्रम वापरकर्त्यांना सुलभ, उपलब्ध होणारा आणि सोयीस्कर बनवणे हा त्या नवोन्मेषाकरिता सर्वोत्तम मार्ग असल्याचे मत पॅनेल चर्चेला संबोधित करताना, मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक हसमुख रावल यांनी व्यक्त केले. वानगीदाखल त्यांनी कोविसेल्फ, स्वयं-वापरासाठी अग्रगण्य कोविड -19 चाचणी किटमागील यशोगाथा विशद केली.

अंगिरस चे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी लोकेश पी. गोस्वामी यांनी त्यांची प्रेरणादायी कथा सामायिक करताना, प्रत्येक सामाजिक उद्योजकाने मोठ्या सामाजिक समस्येला वैयक्तिक समस्या म्हणून हाताळले पाहिजे यावर भर दिला. या जबाबदारीच्या जाणिवेतून नवोन्मेष साकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर सहभागींमध्ये ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी स्थानिक भाषांमध्ये ई-लर्निंग सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित कंपनी AHARAN EduSMAR Pvt. Ltd.चे संस्थापक अमित घोष; द गुड स्टफ स्टुडिओ (टीजीएस) या क्रिएटिव्ह एजन्सीच्या सह-संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर मेघना रॉय आणि अंगिरस चे सह-संस्थापक कुंजप्रीत अरोरा यांचा समावेश होता. चर्चासत्रादरम्यान त्यांनी त्यांचे अनुभव आणि दृष्टिकोन सामायिक केला. 

या चर्चासत्राचे संचालन आदित्य कुट्टी यांनी केले होते, जे सध्या नेटफ्लिक्स मध्ये कायदेशीर संचालक, लिटिगेशन आणि रेग्युलेटरी फंक्शनचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 

 

* * *

PIB Team MIFF | M.Chopade/V.Joshi/D.Rane | 18

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025794) Visitor Counter : 35