माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) 'इंडिया इन अमृत काल' या विशेष संकल्पनेअंतर्गत सहा चित्रपट दाखवले जाणार

Posted On: 16 JUN 2024 4:25PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2024

 

नवकल्पनांना पाठबळपूर्वक चालना देणे आणि विकसित राष्ट्रासाठी परस्पर सामायिक वचनबद्धता जोपासणे, या उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने वाटचाल करत  मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (MIFF) यंदाचे 18 वे पर्व आजपासून औपचारिकरित्या सुरू झालेल्या आहे. त्याअंतर्गतच यंदा या महोत्सवात 'इंडिया इन अमृत काल' या विशेष संकल्पनेअंतर्गत सहा चित्रपटांच्या विविधांगी संग्रहाचा नजराणा सादर केला जाणार आहे. कलात्मक पातळीवर अपवादच वाटावेत अशा दर्जाच्या या सहा चित्रपटामधून रसिकांना भारताची वाटचाल, विकास आणि समृद्धीचे दर्शन घडणार आहे.

या महोत्सवातील देशांतर्गत राष्ट्रीय स्पर्धेच्या गटाअंतर्गत दरवर्षी एक विशेष संकल्पनेवर आधारीत विषय निश्चित केला जातो. त्यानुसारच यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (MIFF) 18 व्या पर्वासाठी 'इंडिया इन अमृत काल' ही  संकल्पना असणार आहे. या गटातील विजेत्याला एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले जाणार आहे.

 

'इंडिया इन अमृत काल' या वर्गवारीतल सर्वोत्कृष्ट लघुपटाच्या विशेष पुरस्काराच्या स्पर्धेअंतर्गत निवड झालेले चित्रपट

1) अजय ध्वज (AJAY DHAWAJA)

हा एक संगीतपट म्हणजेच म्युझिक व्हिडीओ आहे. यात  आपल्या देशाला केलेले देशभक्तीपर वंदन असून, यात देशासोबत जोडलेले घट्ट नाते आणि देशाभिमानाचे चित्रण केले आहे. यात देशाच्या कल्याणासाठी त्याग करण्याच्या आणि देशाचे यश उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची वचनबद्धता भानवोत्कटतेने व्यक्त केली गेली आहे. यात 'देशाच्या मातीतूनच उभारलेले' या संकल्पनेभोवती केलेले चित्रण आहे. आपण या भूमीशीच जोडले गेलो  असल्याची आणि त्यातूनच आपली ओळख निर्माण झाल्याची अस्मिताप्रधान भावना अधोरेखित केले गेली आहे.

2) ओनाके ओबाव्वा (ONAKE OBAVVA)

ओनाके ओबाव्वा या चित्रपटात एका धाडसी महिलेची कथा चित्रित केली आहे. हैदर अली हा चित्रदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीची भिंत उध्वस्त करण्याचे सातत्याने प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याला जोरदार प्रतिकार होतो. त्यावेळी त्याचे सैन्य किल्ल्यावरील सामान्य कामगारांच्या वेशात गुप्त मार्गाने प्रवेश करण्यातत यशस्वी होते. त्याचवेळी ओबाव्वा ही धाडसी गृहिणी या  घुसखोर सैन्याला गुप्त मार्गाने आत प्रवेश करताना पाहते, आणि ती  न डगमगता जवळच पडलेले  ओनाके म्हणजेच  मुसळ उचलते, आणि त्याचा शस्त्र म्हणून वापर करत प्रत्येक घुसखोर सैन्यासोबत एक - एक करत मुकाबला करते. एका साध्या मुसळाचा तिने शस्त्राप्रमाणे केलेला कुशल वापर त्या घुसखोर सैन्यासाठी प्राणघातक प्रतिकार म्हणून कामी येतो.

3) एव्हरीव्हेअर (EVERYWHERE)

एव्हरीवेअर या चित्रपटात आपल्या, शक्य ते सर्व विकत घेण्याची सवय लागलेल्या, वेगवान आणि फॅशनेबल जीवनशैलीशी संबंधित कथा मांडली आहे.  या जीवनशैलीनुसार  जगताना आपण जे कपडे घालतो, ते नेमके ज्या घटकापासून कच्च्या मालापासून तयार झाले आहेत त्याबद्दलच अनभिज्ञ असतो. आधुनिक फॅशन चे  बहुतेक कपडे हे पॉलिमरपासून बनवलेले असतात. जेव्हा एखादे वस्त्र वापरायोग्य राहात नाही त्यावेळी तो   कचरा  राखीव जमिनीत पुरला जातो. हा चित्रपट आपल्याला अहमदाबादमधील कचरा पुरण्यासाठीच्या पिराना इथल्या अशा विशेष राखीव  ठिकाणी घेऊन जातो. याच ठिकाणाहून वस्त्र म्हणून प्लास्टिकचे कपडे वापरणारे चित्रपटातील कलाकार आपल्यासोबत संवाद साधतात, आणि आपल्यासमोर अशाश्वत फॅशनचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडतात.

4) इंडिया - होप्स 24 (INDIA - HOPES 24)

विविध पिढ्यांमधील देशभरातील नागरिक 2024 मधील देशाच्या भवितव्याविषयीच्या त्यांच्या आकांक्षांबद्दल, त्यांना सर्वात सोयीस्कर वाटत असलेल्या त्यांच्या त्यांच्या भाषेत आपापली मते मांडतात. या चित्रपट देशाची विविधता मांडणाऱ्या देशभरातील मनमोहक दृश्यांनी सजलेला आहे. त्यामुळेच हा चित्रपट म्हणजे आपल्या भारताच्या वैभवशाली विविधतेला वंदनच आहे.

5) मोरिंगा - नेचर्स पॅनॅसिआ (MORINGA - NATURE’S PANACEA)

'अमृत काळा'त मोरिंगा म्हणजेच शेवगा हे झाड (Moringa oleifera) सर्वोत्तम अन्नाचा (super food) स्रोत म्हणून उदयाला येऊ लागले आहे. शेवग्याची  पाने पोषक तत्वांनी समृद्ध आहेत आणि त्याचवेळी पूरक पौष्टिक आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांच्या तुलनेत ती प्रचंड स्वस्त आहेत. त्यामुळेच शेवग्याचे पाने  हा  कुपोषण निर्मूलन कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यासाठीचा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. या माहितीपटातून शेवग्यापासून मिळणारे लाभ आणि  त्याचवेळी हे झाड हवामान बदलाच्या परिस्थितीचा सामना करू शकण्याच्या क्षमतेचे, तसेच संबंधित व्यवसाय उद्योगातून परिकीय चलन मिळवून देण्यातही कामी येणार असल्याने, भविष्यासाठी नफा मिळवून देणारे पिक म्हणून त्याचे महत्व मांडण्यात आले आहे.

6) बिगारी कामगार (BIGARI KAAMGAR)

या लघु माहितीपटात महाराष्ट्राच्या पुण्यामधील सफाई कामगारांच्या संघर्षमय जीवनाची कथा मांडली आहे. या माहितीपटाची कथा एका मध्यमवयीन महिला कामगाराच्या अनुभवाला केंद्रस्थानी ठेवून गुंफली आहे. चित्रपटात ही महिला कामगार आपल्या दैनंदिन जगण्याविषयी सांगते. तिच्या या निवेदनात्मक बोलण्यातूनच तिला आणि तिच्यासारख्या कामकारांचा जगण्याचा संघर्ष, जगताना त्यांना येणाऱ्या समस्या, कामाच्या ठिकाणची बिकट परिस्थिती या आणि अशा अनेक मुद्यांसोबतच आपल्या समाजाच्या कचरा व्यवस्थापनाची सवय यावर प्रकाश पडतो. या माहितीपटातून कचऱ्याच्या निर्मूलनाबद्दल स्थानिक रहिवाशांचा दृष्टिकोनही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

 

* * *

PIB Team MIFF | JPS/T.Pawar/D.Rane | 13

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025691) Visitor Counter : 36