उपराष्ट्रपती कार्यालय

जैसलमेरमध्ये सीमा सुरक्षा दल सैनिक संमेलनाला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित

Posted On: 14 JUN 2024 4:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जून 2024

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज जैसलमेर येथे सीमा सुरक्षा दल(बीएसएफ) सैनिक संमेलनाला संबोधित करताना सैनिकांना सांगितले की, “ आज तुमच्यामध्ये आल्यानंतर मला एक नवीन ऊर्जा जाणवत आहे आणि हा क्षण माझ्यासाठी नेहमीच संस्मरणीय असेल.”

आपल्या विद्यार्थी जीवनाच्या आठवणी सांगताना धनखड म्हणाले, “मी सैनिक स्कूल चित्तोडगडचा विद्यार्थी होतो. मी पाचवी इयत्तेत असताना हा गणवेश परिधान केला होता. मला या गणवेशाची ताकद आणि महत्त्व माहीत आहे. मी माझ्या लहानपणी पाहिले आहे की एक गणवेश अचानक आपल्यामध्ये कसा बदल घडवून आणू शकतो.” सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या समर्पणाचे कौतुक करताना ते म्हणाले, “तुम्हाला पाहून मी भारावून गेलो! देशाच्या संरक्षणाची पहिली फळी - सीमा सुरक्षा दल आपले कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडत आहे. तुमचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आणि कौतुकास्पद आहे.”

काल संध्याकाळी उपराष्ट्रपतींनी जैसलमेरमधील बीएसएफच्या बावालियानवाला सीमा चौकीला भेट दिली आणि तेथे तैनात असलेल्या जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘तनोट विजयस्तंभ’ येथे कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

देशाच्या विकासात बीएसएफची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, “तुम्ही येथे सीमेवर तैनात आहात, त्यामुळे भारतीय अशा सुरक्षित वातावरणात निश्चिंत आहेत आणि हे तुमच्या संयम आणि शौर्याचे फळ आहे. तुमच्यामुळेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने काम करत आहेत.”

घुसखोरी, तस्करी इत्यादी गुन्ह्यांमधून देशाच्या शत्रूंचा सीमाभाग अस्थिर करण्याचा प्रयत्न प्रभावीपणे हाणून पाडल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी सीमा सुरक्षा दलाचे कौतुक केले. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बीएसएफचे महासंचालक डॉ. नितीन अग्रवाल, बीएसएफ वेस्टर्न कमांडचे एसडीजी वाय बी खुरानिया, जैसलमेर बीएसएफचे उपमहानिरीक्षक विक्रम कुंवर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2025290) Visitor Counter : 37