संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिल्ली ते कारगिल युद्ध स्मारकापर्यंत द्रास थंडर मोटरसायकल रॅलीला लष्कराच्या उपप्रमुखांनी दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 13 JUN 2024 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2024

ऑपरेशन विजय मध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, द्रास थंडर मोटरसायकल रॅलीला आज नवी दिल्लीतील करियप्पा परेड ग्राउंड येथून लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी (निवृत्त), लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक आणि मान्यवर नागरिक यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन समारंभ झाला.

द्रास थंडर मोटरसायकल रॅलीमध्ये 13 जम्मू आणि काश्मिर रायफल्स (कारगिल) च्या अधिकारी आणि 19 सैनिकांचा समावेश आहे.  सुभेदार मेहर सिंग, वीर चक्र आणि नायब सुभेदार केवल कुमार, सेना पदक, पथकाचे सदस्य, हे ऑपरेशन विजय शौर्य पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांनी पॉइंट 4875 आणि पॉइंट 5140 वर ताबा मिळवण्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

द्रास थंडर मोटरसायकल रॅली नवी दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंड येथून द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकापर्यंत प्रवास करेल. ही रॅली कारगिल विजय दिवसाच्या रजत जयंती उत्सवाचा एक भाग आहे. 25 वर्षांपूर्वी कारगिल युद्धात विजय मिळवून देणाऱ्या भारतीय सैन्याच्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. हा चमू 100 हून अधिक शौर्य पुरस्कार विजेते, माजी सैनिक आणि वीर नारींना यादरम्यान भेटणार असून  ऑपरेशन विजयमधील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करेल.

मोटारसायकल रॅलीचा समारोप 20 जून 2024 रोजी द्रास येथील ऐतिहासिक कारगिल युद्ध स्मारक येथे होईल. 25 वर्षांपूर्वी याच दिवशी, भारतीय सैन्याने पॉइंट  5140 काबीज करून इतिहासात एक अमिट ठसा उमटवला. सुभेदार मेहर सिंग, वीर चक्र आणि नायब सुभेदार केवल कुमार, सेना पदक, यांनी शत्रूविरूद्ध अफाट धैर्य आणि शौर्य दाखवले होते आणि कारगिल युद्धादरम्यान मोक्याची शिखरे काबीज करण्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

13 जम्मू आणि काश्मिर रायफल्स (कारगिल) ने 1971 चे भारत-पाक युद्ध आणि ऑपरेशन विजय या दोन मोठ्या युद्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

मोटरसायकल स्वारांचा हा अनोखा प्रवास सशस्त्र सेना आणि राष्ट्र यांच्यातील चिरस्थायी बंधाचे प्रतीक आहे. त्याचबरोवर धैर्य, त्याग आणि देशभक्तीच्या भावनेला प्रतिध्वनीत करणारा आहे.

 

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2025093) Visitor Counter : 66