आयुष मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिन 25 दिवसावर आला असताना 7,000 हून अधिक योगप्रेमींनी सादर केली योगासने
Posted On:
27 MAY 2024 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2024
2024 चा आंतरराष्ट्रीय योग दिन 25 दिवसावर आला असताना, या दिनाच्या उलटगणना कार्यक्रमाची सांगता बिहारमधील बोधगया येथे एका भव्य योग प्रात्यक्षिक आयोजनाने झाली. बिहारमधील बोधगया येथील मगध विद्यापीठात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 27 मे 2024 रोजी पहाटे, उगवत्या सूर्याच्या साक्षीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात 7000 हून अधिक योग अभ्यासकांनी सामुदायिक योग शिष्टाचाराचे पालन करत योगासने केली. योगप्रेमींच्या उत्साहामुळे आणि मौल्यवान योगदानामुळे लोकांच्या जीवनात योगाचे महत्त्व पुन्हा एकदा प्रस्थापित झाले आहे. सामूहिक योगसाधनेचा हा कार्यक्रम केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक कल्याणासाठीही महत्त्वाचा ठरला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाला 25 दिवस शिल्लक असताना, आयुष मंत्रालयाच्या सामुदायिक योग शिष्टाचारानुसार बिहारमधील बोधगया येथे योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आसन प्रात्यक्षिक पार पडले.
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था (MDNIY), या स्वायत्त संस्थेने हजारो कुशल योग गुरु घडवून आपल्या देशात योगाचे परिदृश्य तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 निमित्त, आयुष मंत्रालयाने मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या सहकार्याने, 100 दिवस, 100 शहरे आणि 100 संस्था - या मोहिमेचा भाग म्हणून सामूहिक योग प्रात्यक्षिके आणि योग सत्रांची मालिका आयोजित केली आहे. शाळा, विद्यापीठे, संस्था, महाविद्यालये, कॉर्पोरेट संस्था तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह विविध भागधारकांच्या सहकार्याने हा उपक्रम चालवला जात आहे.
निमलष्करी दलाच्या जवानांनी आपापल्या क्षेत्रात योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशा प्रकारे या मोहिमेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले जात आहे.
मोठी व्याप्ती आणि प्रतिबद्धता सुनिश्चित करून, आयुष मंत्रालय, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था (MDNIY), आणि इतर नामांकित योग संस्थांनी व्यवस्थापित केलेला हा चैतन्यदायी कार्यक्रम समाज माध्यम व्यासपीठावर पार पडला. डिजिटल प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन, या कार्यक्रमाने आपला आवाका भौतिक सीमांच्या पलीकडे वाढवत जगभरातील व्यक्तींना योगाच्या परिवर्तनीय शक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम बनवले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021863)
Visitor Counter : 63