दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

फसवणुकीच्या प्रयत्नांची तत्परतेने तक्रार दाखल करून सायबर गुन्हेगारी रोखण्यात दक्ष आणि सजग नागरिकांची महत्वाची भूमिका


संचार साथी पोर्टलच्या मदतीने सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाला लाभला नागरिकांचा सहयोग

Posted On: 22 MAY 2024 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2024

 

सायबर गुन्हेगारी रोखण्यामध्ये दक्ष आणि सजग नागरिक महत्वाची भूमिका बजावत आहेत. संचार साथी पोर्टल वरील ‘चक्षु-रिपोर्ट संशयित संवाद’ सुविधेद्वारे, फसवणूक करणाऱ्या संशयित माहितीबाबत सक्रियपणे अहवाल नोंदवून, हे सजग नागरिक सुरक्षित डिजिटल वातावरणाच्या निर्मितीमध्ये लक्षणीय योगदान देत आहेत.

त्यांची सावध नजर आणि जलद कृती, केवळ त्यांचे नव्हे, तर इतर असंख्य लोकांचे घोटाळे, फिशिंग, अर्थात संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न आणि फसव्या उपक्रमांना बळी पडण्यापासून संरक्षण करतात. संशयास्पद संदेश, कॉल आणि तोतयागिरीचे प्रयत्न, याबाबत तक्रार करून, हे नागरिक सायबर गुन्हेगारांपासून आपले संरक्षण करणारी पहिली फळी म्हणून काम करते.

नागरिकांचा हा तत्पर दृष्टीकोन दूरसंचार विभागाला (DoT) सायबर गुन्ह्यांचा सामना आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी ठरतो. सुरक्षित डिजिटल परिसंस्था सुनिश्चित करण्यामध्ये  विभागाला सक्षम करणाऱ्या जागरूक नागरिकांप्रति दूरसंचार विभागाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या माहितीच्या आधारावर दूरसंचार विभाग सायबर/आर्थिक फसवणुकीविरोधात त्वरित आणि कठोर कारवाई करत आहे. काही ताज्या प्रकरणांमध्ये, बनावट एलआयसी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून, तसेच SBI ची बक्षिसे मिळवण्याबाबतच्या बनावट एसएमएसद्वारे लोकांना फसवले जात होते. 14 मोबाईल क्रमांकांवरून अशी फसवणूक झाल्याचे नागरिकांनी 19.05.2024 रोजी दूरसंचार विभागाच्या निदर्शनास आणले होते.

दूरसंचार विभागाने केलेली कारवाई:

दूरसंचार विभागाने 24 तासांच्या आत या प्रकरणांचे विश्लेषण केले आणि संबंधित मोबाईल क्रमांकाचे सर्व दुवे शोधून काढले. त्या अनुषंगाने, 21.05.2024 रोजी संपूर्ण भारतात या मोबाईल क्रमांकाशी जोडलेले 372 मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले, तसेच 906 मोबाईल जोडण्या  निलंबित करण्यात आल्या आणि त्यांना पुन्हा पडताळणीसाठी चिन्हांकित आले.

नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच 'चक्षु - रिपोर्ट संशयित फसवणूक संवाद' या संचार साथी पोर्टलच्या (www.sancharsaathi.gov.in/sfc) सुविधेवर अशा फसवणुकीची तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे. अशा प्रकारचे सक्रीय अहवाल, दूरसंचार संसाधनांचा सायबर-गुन्हेगारी, आर्थिक फसवणूक इत्यादींसाठी होणारा गैरवापर रोखण्यामध्ये दूरसंचार विभागाला सहाय्य करतात.

दूरसंचार विभाग/ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची तोतयागिरी करणाऱ्या बनावट सूचना, संशयित फसवणूक करणारे संवाद आणि प्रेस, एसएमएस आणि सोशल मीडियाद्वारे  फसवणूक अथवा दिशाभूल करणारे  कॉल, याबाबत जनजागृती करण्यासाठी नियमितपणे सूचना जारी केल्या जात आहेत. 

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021354) Visitor Counter : 41