संरक्षण मंत्रालय

संरक्षणविषयक परस्पर संबंधांना बळकटी देण्यासाठी भारत आणि मंगोलिया यांच्या संरक्षण मंत्रालयांच्या संयुक्त कार्यकारी गटाची 12 वी बैठक उलानबातर इथे संपन्न

Posted On: 17 MAY 2024 3:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2024

मंगोलियाची राजधानी उलानबातर इथे 16 आणि 17 मे 2024 रोजी भारत आणि मंगोलिया यांच्या संरक्षण मंत्रालयांच्या संयुक्त कार्यकारी गटाची  12 वी बैठक पार पडली. भारताच्या  संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्टेट सेक्रेटरी  ब्रिगेडियर जनरल गानखुयाग दावगदोर्ज या दोघांनी या बैठकीचे  सहअध्यक्षस्थान भुषवले. भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

संयुक्त कार्यकारी गटाच्या या बैठकीत दोन्ही देशांनी परस्परांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण क्षेत्र विषयक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांच्या प्रमुख प्रतिनिधींनी विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्यासाठीच्या उपाययोजनाही निश्चित करून त्या दिशेने कार्यवाही सुरु करण्यासाठीच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी सध्याच्या भूराजकीय परिस्थितीबद्दलच्या परस्परांची मते जाणून घेतली.

भारताच्या  संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद यांनी भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राची क्षमता यावेळी अधोरेखित केली. मंगोलियाच्या सशस्त्र दलांसोबतची भागिदारी  फलदायी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंगोलियानेही भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राच्या क्षमतेप्रती विश्वास व्यक्त केला.दोन्ही देशांच्या या प्रमुख प्रतिनिधींनी परस्परांमध्ये दृढ होत असलेल्या संबंधांची ग्वाही देखील यावेळी दिली.

भारताच्या  संरक्षण मंत्रालयाचे  सहसचिव अमिताभ प्रसाद आणि भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे यांनी मंगोलियाचे उपसंरक्षणमंत्री बी.बयारमगनई  यांचीही भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या शिष्टमंडळाने उलानबातर इथल्या प्रशिक्षण संस्थेला भेट दिली आणि तिथे राबवल्या जात असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.

मंगोलियासोबत भारताचे जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नागरी संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना परस्परांचे 'आध्यात्मिक शेजारी' मानतात. सध्याच्या आधुनिक काळात लोकशाही, स्वातंत्र्य आणि बाजारआधारित अर्थव्यवस्था यांसारख्या मूल्यांनी दोन्ही देशांना परस्परांच्या अधिक जवळ आणले आहे.

S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 



(Release ID: 2020889) Visitor Counter : 50