राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स  इन मेडिकल सायन्सेसच्या बाविसाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती


उपचारांना विलंब म्हणजेच जीवनाला नकार: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 10 MAY 2024 7:12PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (10 मे, 2024) नवी दिल्ली येथे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या (एनबीईएमएस-राष्ट्रीय वैद्यकशास्त्र परीक्षा मंडळ) बाविसाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत सुवर्ण तासाचे महत्त्व अधोरेखित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, या काळात रुग्णाला उपचार मिळाले, तर त्याचे प्राण वाचू शकतात. तज्ज्ञ डॉक्टरांनी आपत्कालीन वैद्यकीय स्थितीतील रुग्णांप्रति संवेदनशील राहायला हवे, आणि अशा रुग्णाला उपचारासाठी इतरत्र जायला सांगू नये, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

न्यायाला उशीर म्हणजेच न्याय नाकारणे’, या तत्त्वाचा संदर्भ देत राष्ट्रपती म्हणाल्या की, आरोग्य सेवा क्षेत्रात तर वेळेला आणखी महत्त्व आहे, कारण उपचारांना विलंब म्हणजेच जीवन नाकारणे. त्या म्हणाल्या की, कधी आपण अशी दुःखद बातमी ऐकतो की, वेळेवर उपचार मिळाले असते तर एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकले असते. जरी जीव वाचला तरी, अनेकदा  उपचारांना विलंब झाला, तर आरोग्य नाकारले जाते. असे उदाहरण अनेकदा अर्धांगवायूच्या रुग्णांमध्ये दिसून येते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे, रुग्ण हाता-पायाची हालचाल करू शकत नाहीत, आणि त्यांना परावलंबित्व येते. 

राष्ट्रपतींनी राष्ट्रीय वैद्यकशास्त्र परीक्षा मंडळाच्या आजी-माजी सदस्यांनी गेल्या चार दशकांमध्ये वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली.  राष्ट्रीय वैद्यकशास्त्र परीक्षा मंडळाच्या प्रयत्नांमुळे देशात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढली आहे. डॉक्टरांना त्वरित आरोग्यसेवा, संवेदनशील आरोग्यसेवा आणि किफायतशीर आरोग्यसेवा याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.

गरीब रुग्णांना विनामूल्य वेळ देऊन डॉक्टर देश आणि समाजासाठी अमूल्य योगदान देऊ शकतात, असे त्या म्हणाल्या. जर या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्र  व्यवसाय म्हणून निवडले असेल, तर त्यांच्यात मानवतेची सेवा करण्याची इच्छा ओतप्रोत भरलेली आहे, असेही त्यांनी सांगितले. सेवेची भावना जपण्याचे, वृद्धिंगत करण्याचे आणि या भावनेचा प्रसार करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

आपल्या देशाची अफाट लोकसंख्या पाहता डॉक्टरांची उपलब्धता सातत्याने वाढवण्याची गरज आहे, हे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.  संख्यावृद्धी बरोबरच गुणवत्तेलाही प्राधान्य देण्याचा सर्वांचा प्रयत्न असायला हवा, असे त्या म्हणाल्या.

भारतीय डॉक्टरांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले. परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवेच्या उपलब्धतेमुळे भारत हे वैद्यकीय पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहे, असे त्या म्हणाल्या.  डॉक्टर हे देशाच्या आरोग्य व्यवस्थेतील सर्वात महत्त्वपूर्ण अंग असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्व डॉक्टर देशाच्या आरोग्य सेवांना अधिक उंचीवर नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या दीक्षांत समारंभात पदवी आणि पदके मिळविणाऱ्या पुरुष डॉक्टरांच्या तुलनेत महिला डॉक्टरांची संख्या अधिक असल्याचे नमूद करून राष्ट्रपती म्हणाल्या की, उच्च वैद्यकीय शिक्षणात मुलींचे यश हे आपल्या समाजाचे आणि देशाचे मोठे यश आहे.   बहुतेक कुटुंबांच्या संदर्भात असे म्हणता येईल की मुलींना मर्यादा आणि बंधने जाणवून दिली जातात, समाजात आणि सार्वजनिक ठिकाणीही मुलींनी त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि समाजाच्या स्वीकृतीबाबत अधिक जागरूक राहावे लागतेअशा वातावरणातही आपल्या मुली आपले कर्तृत्व सिद्ध करून नव्या भारताचे नवे चित्र रेखत आहेत, असे राष्ट्रपती  म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

***

S.Kakade/R.Agashe/SMukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2020289) Visitor Counter : 62