संरक्षण मंत्रालय
‘पायाभूत सुविधांच्या विकासात उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर नवी दिल्लीत डीआरडीओकडून दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आणि उद्योग मेळाव्याचे आयोजन
भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वयंपूर्णता साध्य करण्याचे संरक्षण सचिवांचे आवाहन
Posted On:
09 MAY 2024 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2024
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने(डीआरडीओ) 9 मे, 2024 रोजी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ‘पायाभूत सुविधांच्या विकासात उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आणि उद्योग मेळाव्याचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी उद्घाटन केले. या दोन दिवसीय कार्यक्रमात डीआरडीओसह संरक्षण दले, शैक्षणिक संस्था, उद्योग सहभागी झाले असून परस्परांमध्ये संवाद निर्माण करणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि ‘पायाभूत सुविधांच्या विकासातील उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि संधींचा फायदा घेण्यासाठी, आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाची चाचपणी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्णता साध्य करण्याच्या आवश्यकतेवर संरक्षण सचिवांनी आपल्या भाषणात भर दिला. भारत हा युवा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असलेला देश आहे आणि स्वयंपूर्णतेमुळे त्यांना चांगल्या प्रकारच्या रोजगारांची हमी मिळेल, असे ते म्हणाले.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना अरमाने यांनी भू- राजकीय स्थितीमध्ये कोणताही विश्वासार्ह कल नसल्याकडे लक्ष वेधले आणि आपल्या सुरक्षेसाठी आणि राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी भारत इतर कोणत्याही देशांवर अवलंबून राहू शकत नाही, असे सांगितले. 2047 पर्यंत विकसित देश बनण्यासाठी मोठी झेप घेण्याकरिता स्वयंपूर्णता मदत करेल, यावर त्यांनी भर दिला.
सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारने दिलेला भर अधोरेखित करत संरक्षण सचिवांनी या पायाभूत सुविधा या भागातील व्यवस्था बळकट करण्यामध्ये कशा प्रकारे योगदान देत आहेत, त्याचे महत्त्व सांगितले. डीआरडीओ खाजगी क्षेत्राला संशोधन आणि विकासात मदत करत आहे आणि आगामी काळात ते एकत्रितपणे अधिक चांगले आणि वेगवान नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊ शकतील, असे ते म्हणाले. उद्योगांनी सरकारसोबत काम करावे आणि कालबद्ध पद्धतीने दर्जेदार उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे, असे आवाहन केले. एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर चांगले उत्पादन बनवण्यासाठी करता येईल, यासाठी आपल्या मनुष्यबळाचे कौशल्य वाढवण्याकरिता उद्योगांनी शैक्षणिक संस्थांची मदत घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी बोलताना संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही कामत यांनी देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या महत्त्वावर भर दिला.
500 पेक्षा जास्त प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या आणि पाच तांत्रिक सत्रांचा समावेश असलेल्या या परिसंवादात पायाभूत सुविधांच्या विकासात उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील विविध विषयांवर या उद्योगातील तज्ञ, शैक्षणिक संस्था आणि डीआरडीओचे शास्त्रज्ञ व्यापक विचारमंथन करत आहेत, असे रिसोर्स ऍन्ड मॅनेजमेंटचे महासंचालक पुरुषोत्तम बेज म्हणाले.
या कार्यक्रमाच्या सोबतच आयोजित करण्यात आलेल्या, या उद्योगातील विविध भागीदारांनी विकसित केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादने प्रदर्शित करणाऱ्या उद्योग-भागीदार प्रदर्शनाचे देखील संरक्षण सचिवांनी उद्घाटन केले.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2020108)
Visitor Counter : 99