विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) - भारतीय पेट्रोलियम संस्था (IIP) यांनी साजरा केला 65वा वर्धापन दिन

Posted On: 27 APR 2024 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2024

 

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)- भारतीय पेट्रोलियम संस्था (IIP) या संस्थेने आपल्या संकुलात आज 65वा वर्धापन दिन साजरा केला. अतिशय महत्त्वाच्या अशा या संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना 14 एप्रिल 1960 रोजी झाली. आजच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला नीती आयोगाचे सदस्य आणि सीएसआयआर-आयआयपीचे मार्गदर्शक, पद्मभूषण डॉ. व्ही. के. सारस्वत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संशोधन, नवोन्मेषी तंत्रज्ञान आणि उद्योगविषयक सहकार्य यांची प्रणेता असलेल्या या संस्थेचा समृद्ध इतिहास या सोहळ्यात अधोरेखित झाला.  

यावेळी बोलताना डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी सीएसआयआर-आयआयपी चमूचे अभिनंदन केले आणि संस्थेच्या 65व्या वर्धापनदिनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारतातील ऊर्जा संक्रमण या विषयावर एक व्याख्यान देखील दिले.  डॉ. सारस्वत यांनी नजीकच्या भविष्यात जगाला दिशा देणाऱ्या स्वच्छ आणि कार्बनमुक्त तंत्रज्ञानावर भर दिला. ई- मिथेनॉल आणि ग्रीन हायड्रोजन या विषयांमध्ये आव्हानात्मक संशोधन हाती घेण्याचे आवाहन त्यांनी शास्त्रज्ञांना केले. त्यांच्या भाषणाचा सारांश पुढीलप्रमाणे आहेः   

भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राखण्यासाठी, आपल्याला अतिशय परिश्रमपूर्वक कार्बन तटस्थतेवर काम करण्यास सुरुवात केली पाहिजे.

डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी सीएसआयआर-आयआयपीमधील वैज्ञानिक समुदायासोबतही संवाद साधला. त्यांनी या संस्थेच्या वैभवात भर घालणाऱ्या वैज्ञानिक, तंत्रज्ञ, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या चमूची यावेळी प्रशंसा केली. विकसित भारतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीएसआयआर-आयआयपीच्या संचालकांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीचा आराखडा मांडला. डॉ. सारस्वत यांनी या आराखड्याची प्रशंसा केली, आणि देशाला तो अधिक फायदेशीर ठरावा, यासाठी विविध सूचना केल्या.

गेल्या 64 वर्षांत नुमालीगड वॅक्स प्लांट, शाश्वत हवाई इंधन, यूएस ग्रेड गॅसोलिन, वैद्यकीय ऑक्सिजन युनिट, स्वीटनिंग कॅटॅलिस्ट, पीएनजी बर्नर, सुधारित गूळ भट्टी अशा सारख्या विविध प्रकारच्या संशोधनविषयक कामगिरीला सीएसआयआर-आयआयपीचे संचालक डॉ. हरेंदर सिंग बिश्त यांनी अधोरेखित केले. ओक ग्रुव्ह स्कूल, मसुरीचे विद्यार्थी आणि शिक्षक देखील जिग्यासा 2.0 या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी या संस्थेमधील विविध प्रयोगशाळांना भेट दिली आणि शास्त्रज्ञ तसेच तिथे काम करणाऱ्या संशोधक विद्वानांसोबत संवाद साधला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीची जोपासना करणे, हा जिग्यासा 2.0 या कार्यक्रमाचा उद्देश आहे, जेणेकरून हे विद्यार्थी देशातील उदयोन्मुख शास्त्रज्ञ बनू शकतील.

सीएसआयआर-आयआयपीचे वरिष्ठ प्रशासन नियंत्रक अंजुम शर्मा यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे सीएसआयआर-आयआयपी चमूने आभार मानले.

 

* * *

M.Pange/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019015) Visitor Counter : 43