संरक्षण मंत्रालय
भारत-उझबेकिस्तान यांच्यातील दस्तलिक या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय लष्कराचे पथक रवाना
Posted On:
15 APR 2024 6:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2024
भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील दस्तलिक या संयुक्त लष्करी सरावासाठी आज भारतीय लष्कराचे पथक उझबेकिस्तानला रवाना झाले. उझबेकिस्तानमधील तर्मेझ येथे होणारा हा संयुक्त सराव 28 एप्रिल 2024 पर्यंत चालणार आहे. दस्तलिक हा भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान दरवर्षी होणारा संयुक्त सराव असून दोन्ही देशांमध्ये आळीपाळीने हा सराव आयोजित करण्यात येतो.गेल्यावर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात पिथोरागढ येथे हा सराव झाला होता.
या सरावासाठी निघालेल्या भारतीय लष्कराच्या पथकात एकूण 60 कर्मचारी असून त्यातील 45 कर्मचारी भारतीय लष्करातील, मुख्यतः लष्कराच्या जाट रेजिमेंटचे जवान आहेत तर 15 कर्मचारी भारतीय हवाई दलातील आहेत.
दोन्ही देशांच्या लष्करांच्या दरम्यान सहकार्याची जोपासना करणे तसेच डोंगराळ आणि निम शहरी प्रदेशातील संयुक्त अभियान पार पाडण्यासाठीच्या संयुक्त क्षमतांमध्ये वाढ करणे हा या दस्तलिक सरावाचा मुख्य उद्देश आहे. या सरावादरम्यान उच्च पातळीवरील शारीरिक क्षमता, संयुक्त नियोजन, संयुक्त रणनीतीविषयक सराव तसेच विशेष शस्त्रास्त्र कौशल्यांच्या मुलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
या सरावादरम्यान ज्या रणनीतीविषयक कौशल्यांचा अभ्यास केला जाईल त्यामध्ये संयुक्त कमांड पोस्टची उभारणी, गुप्तचर आणि टेहळणी केंद्राची स्थापना, लँडिंग साईटची सुरक्षितता, कारवाईमध्ये छोटी पथके समाविष्ट करणे तसेच ती बाहेर काढणे , हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विशेष हवाई कारवाई, वेढा तसेच शोध मोहीम आणि बेकायदेशीर संरचना उध्वस्त करणे इत्यादींचा समावेश आहे.
यावर्षीचा दस्तलिक सराव अधिक जटील करण्यात आला असून त्यात पायदळासह लढाऊ पाठबळ शस्त्रे आणि सेवा विभागातील जवानांचा देखील समावेश करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाच्या पथकामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला असून त्यापैकी एकजण रेजिमेंट ऑफ आर्टिलरी तर दुसरी अधिकारी लष्करी वैद्यकीय मदत पथकात कार्यरत आहे.
‘दस्तलिक’ सराव दोन्ही देशांच्या पथकांना डावपेच, तंत्रे तसेच संयुक्त कारवाईच्या पद्धतींच्या संदर्भात आपापल्या सैन्याच्या सर्वोत्तम पद्धती एकमेकांशी सामायिक करणे शक्य करेल. या सरावामुळे संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची पातळी सुधारेल तसेच दोन्ही मित्र देशांच्या दरम्यान असलेल्या द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना मिळेल.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017981)
Visitor Counter : 192