ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा घेतला आढावा, डाळ उद्योगातील भागधारकांसमवेत घेतल्या बैठका
म्यानमारमधून डाळींची आयात करण्यात येणाऱ्या अडचणींविषयी ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी यांगून मधील भारतीय मिशनसमवेत घेतली बैठक
Posted On:
13 APR 2024 11:11AM by PIB Mumbai
ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी डाळ उद्योगांच्या प्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधून हे स्पष्ट केले की, डाळींचा फॉरवर्ड ट्रेड म्हणजे वायदा व्यापार करणाऱ्यांवर अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यान्तर्गत कठोर कारवाई होईल. डाळींच्या साठ्यांवर 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने देखरेख सुरु करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हितधारकांशी संवाद साधून हे स्पष्ट केले.
उद्योगाकडून येणारे अभिप्राय आणि बाजारपेठेतील विविध प्रभावशाली घटकांकडील साठ्यावर नजर ठेवून असणारे गुप्त स्रोत यांच्याकडून मिळालेली माहिती पुढच्या पडताळणीसाठी जुळवून बघितली जात आहे.
म्यानमारमधील सुधारित विनिमय दर आणि तेथील आयातदारांनी केलेली साठेबाजी या पार्श्वभूमीवर, म्यानमारमधून होणाऱ्या डाळींच्या आयातीसंबंधीच्या अडचणी- उदा. आयात किंमती इ.- अशा अडचणींविषयी त्यांनी यांगूनमधील भारतीय मिशनशी चर्चा केली. 25 जानेवारी 2024 पासून रुपया - क्यात विनिमय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती भारतीय मिशनने दिली. व्यापार आणि व्यवहार सोपे आणि अधिक कार्यक्षम करण्याचा उद्देश त्यामागे आहे. SRVA म्हणजे स्पेशल रुपी- वोस्ट्रो अकाउंट अंतर्गत पैसे भरण्याची प्रक्रिया करण्यासाठी म्यानमारच्या मध्यवर्ती बँकेने 26 जानेवारी 2024 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ही नवी यंत्रणा सागरी व्यापार आणि सीमापार व्यापार दोन्हींसाठी आणि वस्तू व सेवा दोन्हींतील व्यापारासाठी लागू असेल. व्यापाऱ्यांनी ही यंत्रणा स्वीकारल्यास चलनाच्या रुपान्तरणावरील खर्च कमी होईल आणि विनिमय दराशी संबंधित गुंतागुंती दूर होतील. कारण मुळात, विविध चलनांच्या रुपान्तरणांचीच गरज पडणार नाही.
व्यापारी समुदायांमध्ये - विशेषतः डाळ आयातदारांमध्ये- ही यंत्रणा कार्यान्वित केल्याबद्दलची माहिती वितरित करण्यासाठी वेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून SRVA द्वारे रुपया - क्यात थेट भरणा व्यवस्था वापरण्याची विनंती त्यांना करण्यात येत आहे.
आयातदार आणि या उद्योगातील अन्य हितधारक- जसे की गिरणीमालक, साठेदार, किरकोळ व्यापारी इत्यादी- यांनी त्यांच्याकडील डाळींचे- आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्यासह- साठे प्रामाणिकपणे घोषित करावेत अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. 15 एप्रिल 2024 पासून त्यांनी दर आठवड्याला https://fcainfoweb.nic.in/psp/ या संकेतस्थळावर ते साठे घोषित करायचे आहेत. सर्व साठेदार घटकांनी साठे घोषित करण्याची खबरदारी घेण्याच्या आणि त्यांनी घोषित केलेले साठे पडताळून बघण्याच्या सूचना राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. मोठ्या बंदरांवरील गोदामांमधील तसेच डाळ उद्योगांच्या केंद्रामधील साठेदेखील वेळोवेळी तपासून बघितले पाहिजेत आणि साठेबाजी करून साठा जाहीर करण्याच्या संकेतस्थळावर खोटी माहिती भरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे.
***
S.Patil/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017838)
Visitor Counter : 123