संरक्षण मंत्रालय
विशाखापट्टणम् येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे भारतीय नौदलासाठीच्या पहिल्या फ्लीट सपोर्ट जहाजाचा स्टील कटिंग सोहळा संपन्न
Posted On:
10 APR 2024 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2024
संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या उपस्थितीत आज, 10 एप्रिल 2024 रोजी विशाखापट्टणम् येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे (एचएसएल) भारतीय नौदलासाठीच्या पाच फ्लीट सपोर्ट जहाजांच्या तुकडीतील पहिल्या जहाजाचा स्टील कटिंग सोहळा संपन्न झाला. इस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हॉईस अॅडमिरल राजेश पेडणेकर, एचएसएलचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक सीएमडीई हेमंत खत्री(निवृत्त) यांच्यासह भारतीय नौदल आणि एचएसएलमधील अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाच फ्लीट सपोर्ट जहाजांच्या तुकडीच्या संपादनासाठी ऑगस्ट 2023 मध्ये एचएसएल कंपनीशी करार करण्यात आला होता आणि ही जहाजे 2027च्या मध्यापर्यंत भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. भारतीय नौदलात रुजू झाल्यानंतर ही फ्लीट सपोर्ट जहाजे समुद्रातील जहाजांच्या मदतीच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या सागरी क्षमतेत मोठी भर घालतील. सुमारे 40,000 टनांहून अधिक विस्थापन क्षमता असलेली ही जहाजे समुद्रात कार्यरत जहाजांसाठी इंधन, पाणी, शस्त्रास्त्रे तसेच इतर साठा वाहून नेऊन त्याचा पुरवठा करतील जेणेकरून त्या जहाजांना या बाबींसाठी बंदराकडे परत यावे न लागता अधिक दीर्घकाळ सागरी कारवाया सुरु ठेवता येतील. यामुळे नौदलाच्या जहाजांची धोरणात्मक पोहोच आणि गतिशीलता यात अधिक सुधारणा होईल. दुय्यम भूमिका सांभाळताना ही जहाजे, मानवतावादी मदत तसेच आपत्ती निवारण कार्यांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी तसेच नैसर्गिक संकटांच्या काळात सागरातील जहाजांना मदत साहित्याचे त्वरित वितरण करण्यासाठी सज्ज ठेवता येतील.
संपूर्णतः स्वदेशी संरचना तसेच जहाजबांधणीसाठी आवश्यक बहुतांश उपकरणांचा स्वदेशी उत्पादकांकडून पुरवठा यामुळे हा जहाज बांधणी प्रकल्प भारतीय जहाजबांधणी उद्योग क्षेत्राला नवी चालना देईल. या प्रकल्पाची संकल्पना केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या उपक्रमांना अनुसरून आहे.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017635)
Visitor Counter : 96