संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाचे प्रदूषण नियंत्रण जहाज “समुद्र पहेरेदार” ने आसियान देशांमध्ये परदेशात तैनातीचा एक भाग म्हणून व्हिएतनाममधील बंदराला दिली भेट
Posted On:
02 APR 2024 2:46PM by PIB Mumbai
दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रे (आसियान ) देशांमधे चालू असलेल्या परदेशातील तैनातीचा भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाचे (आयसीजी) प्रदूषण नियंत्रण जहाज, समुद्र पहरेदारने त्यावरील हेलिकॉप्टरसह, 02 एप्रिल 2024 रोजी व्हिएतनाममधील हो ची मिन्ह येथे बंदराला भेट दिली. तीन दिवसांच्या भेटीदरम्यान, जहाजावरील कर्मचारी, समुद्री प्रदूषण प्रतिसाद, सागरी शोध आणि बचाव तसेच सागरी कायद्याची अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करून संवाद साधतील. यासोबतच परस्परांच्या जहाजांवरील प्रशिक्षण, संबंधित विषयातील तज्ज्ञांमधील आदानप्रदान, क्रीडा स्पर्धा आणि व्हिएतनाम तटरक्षक दलासह (व्हीसीजी) विविध सरावांचाही समावेश आहे.
या भेटीचा उद्देश केवळ भारतीय तटरक्षक दल आणि व्हिएतनाम तटरक्षक दल यांच्यातील संबंध मजबूत करणे हाच नाही तर भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतांचे प्रदर्शन करणे देखील आहे. याव्यतिरिक्त, जहाजावरील 25 राष्ट्रीय छात्र सेनेचे जवान (एनसीसी) वॉकथॉन आणि सागरी किनाऱ्यांच्या स्वच्छतेतही सहभागी होतील.
भारतीय तटरक्षक दल आणि व्हिएतनाम तटरक्षक दल यांच्यात 2015 पासून विद्यमान सामंजस्य करार सुरू आहे. ही परदेशी तैनाती द्विपक्षीय संबंधांना बळ देण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण देशांसोबत आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या वचनबद्धतेची साक्ष आहे.
भारतीय तटरक्षक दलाच्या विशेष जहाजाद्वारे या देशांना दिली जाणारी ही भेट 2022 मध्ये कंबोडियात आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान घोषित केलेल्या सागरी प्रदूषणासाठीच्या भारत आसियान पुढाकाराच्या अनुषंगाने आहे. आसियान प्रदेशात समुद्र पहरेदारची तैनाती भारताची सागरी सुरक्षेबाबतची जबाबदारी आणि प्रदूषण, सागरी सहकार्याद्वारे संरक्षण आणि सुरक्षेला प्रोत्साहन देणे आदी संकल्पना प्रतिबिंबित करते. हो ची मिन्हच्या आधी, जहाजाने मनिला, फिलीपिन्सला भेट दिली.
***
S.Kakade/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016956)
Visitor Counter : 92