भूविज्ञान मंत्रालय

आगामी ग्रीष्म ऋतूमध्ये (एप्रिल ते जून), देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याची भारतीय हवामान विभागाची माहिती

Posted On: 01 APR 2024 9:10PM by PIB Mumbai

 

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी ) ने आज नवी दिल्लीतील पृथ्वी भवन मधील माहिका सभागृहात, ग्रीष्म  ऋतू (एप्रिल ते जून) 2024 तसेच एप्रिल 2024 चा पाऊस आणि तापमानासंदर्भात मासिक अंदाज जाहीर केला.

प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणाली मार्फत सहभाग अशा संमिश्र पद्धतीने आयोजित पत्रकार परिषदेत आज भारतीय हवामान विभागाने, आगामी ग्रीष्म  ऋतूत (एप्रिल ते जून), देशातील बहुतांश  भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचे आणि विशेषत: मध्य भारत तसेच पश्चिम द्वीपकल्पीय भारतामध्ये तापमान वाढीची संभाव्यता असल्याचे जाहीर केले.  "या ग्रीष्म  ऋतूच्या काळात पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि उत्तर ओडिशाच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा कमी तापमानाची शक्यता आहे", असे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.

एप्रिल-जून 2024 पर्यंत एल निनो ते ENSO-न्यूट्रलमध्ये संक्रमण अपेक्षित आहे आणि त्यानंतर जून-ऑगस्ट, 2024 मध्ये ला निना अनुकूल होईल”, असेही डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

एप्रिल ते जून या कालावधीत आणि एप्रिल 2024 या महिन्यात उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाविषयी बोलतांना, डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, “उष्णतेच्या लाटेदरम्यान वाढलेल्या तापमानामुळे लक्षणीय धोके निर्माण होतात, विशेषत: वृद्ध, लहान मुले आणि विविध शारीरिक व्याधींनी आधीपासूनच ग्रस्त असल्यामुळे संवेदनक्षम झालेल्या लोकांसाठी तसेच उष्णतेशी संबंधित आजार जसे की उष्णतेमुळे जाणवणारा थकवा आणि उष्माघात, अशा लोकांना हा ऋतू जास्त त्रासदायक ठरू शकतो.तीव्र उष्णतेच्या दीर्घ कालावधीमुळे निर्जलीकरण होऊ शकते तसेच पॉवर ग्रीड्स आणि वाहतूक व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधांवर ताण येऊ शकतो, असेही ते म्हणाले.  या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कूलिंग सेंटर्सची सुविधा उपलब्ध करून देणे, उष्माविषयक सूचना जारी करणे आणि प्रभावित भागात शहरी उष्ण क्षेत्रात परिणाम कमी करण्यासाठी धोरणे राबवणे यासारख्या सक्रिय उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 च्या पार्श्वभूमीवर, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेच्या लाटेपासून मतदारांचा बचाव करण्यासाठी सावधगिरीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात निवडणूक आयोगासाठी मार्गदर्शन सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि प्रमुख कमल किशोर यांनी दिली.

***

S.Kane/S.MukhedkarP.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016858) Visitor Counter : 98