संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाच्या 100 दिवसांच्या संकल्प मोहिमेचा समारोप

Posted On: 23 MAR 2024 4:07PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाच्या 100 दिवसांच्या संकल्प मोहिमेचा आज समारोप झाला. डिसेंबर 2023 च्या मध्यावर ही मोहीम सुरू झाली होती. या कालावधीत हिंद महासागरात सागरी सुरक्षेशी संबंधित 18 घटना भारतीय नौदलाने शीघ्र आणि प्रथम प्रतिसाद देत हाताळल्या तसेच ते या कामासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले गेलेले नौदल ठरले. 

इस्त्रायल - हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं संकल्पअंतर्गत आपल्या सागरी सुरक्षा मोहिमांची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवली होती. 14 डिसेंबर 2024 रोजी माल्टाच्या एमव्ही रुएन या मालवाहू जहाजाचे अपहरण झाले, तेव्हा त्याचा शोध घेण्यात भारतीय नौदलाने सक्रिय भूमिका बजावली होती.   

गेल्या 100 दिवसांत नौदलाची जहाजे, विमाने आणि विशेष दलांनी सागरी सुरक्षेसाठी आणि सागरी सेवेत कार्यरत समुदायाचे विविध अपारंपारिक धोक्यांपासून रक्षण करण्याचा निर्धार केला होता. या क्षेत्रातील धोक्यांविषयीच्या माहितीचे आकलन झाल्यानंतर एडनचे आखात आणि लगतचा प्रदेश, अरबी समुद्र तसेच सोमालियाचा पूर्व किनारा अशा तीन भागांत ही संकल्प मोहीम राबवण्यात आली.

भारतीय नौदलाने समुद्रात 5000 पेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले तर  450 पेक्षा जास्त जहाज दिवस (21 पेक्षा जास्त जहाजे तैनात) मोजण्यात आले.  सागरी क्षेत्रातील धोक्यांना तोंड देण्यासाठी गस्त घालणाऱ्या विमानाचे 900 तास उड्डाण झाले. भारतीय नौदलाच्या अथक प्रयत्नांचे हे द्योतक आहे.

2008 मध्ये चाचेगिरी सुरू झाल्यानंतर हिंद महासागर क्षेत्रामध्ये प्रादेशिक आणि अतिरिक्त प्रादेशिक नौदलांच्या युद्धनौकांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली. स्वतंत्रपणे किंवा विविध बहु-राष्ट्रीय नौदलांच्या कक्षेत कार्यरत असलेल्या या युद्धनौका तैनात करण्याचे प्रमाणही सातत्याने वाढले आहे. सध्याची सुरक्षा परिस्थिती बघता, भारतीय नौदलाने या प्रदेशातील असंख्य धोक्यांमुळे उद्भवलेल्या सुरक्षा परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. भारतीय नौदलाच्या उपस्थितीत 110 पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवण्यात आले (45 भारतीय खलाशांसह), 15 लाख टन महत्त्वाच्या वस्तूंचे (उदा. - खते, कच्चे तेल आणि उत्पादने) संरक्षण करण्यात आले, जवळपास 1000 सागरी कारवाया हाती घेण्यात आल्या, 3000 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले आणि 450 पेक्षा जास्त व्यापारी जहाजे सुरक्षित राखली. सध्या सुरू असलेल्या सागरी सुरक्षा कारवायांमधून भारतीय सागरी क्षेत्रात (आयओआर)  एक मजबूत आणि जबाबदार नौदल म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची भारतीय नौदलाची क्षमता अधोरेखित झाली आहे.

डिसेंबर 2023 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये, गुरुग्राम येथील भारतीय नौदलाचे इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर अर्थात माहिती गोळा करण्याचे केंद्र, हे भारतीय सागरी क्षेत्रात (आयएफसी- आयओआर) माहितीची देवाणघेवाण सक्षम करण्यासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून मोलाची भूमिका बजावत आहे. याव्यतिरिक्त, या कालावधीत भारतीय हवाई दल आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसोबत घेण्यात आलेल्या मोहिमांमधून सेवांमधील समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता दिसून आली.

संकल्प' अंतर्गत सुरू असलेल्या सागरी सुरक्षा मोहिमांच्या प्रगतीदरम्यान भारतीय नौदलाने दाखवलेला उत्तम समन्वय, चातुर्य आणि दृढ निश्चय यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहवा मिळवली आहे. भारतीय नौदलाच्या या प्रयत्नांमध्ये भारताच्या सागरी हितांचे रक्षण करणे, सागरी धोक्यांचा सामना करणे, नव्याने डोके वर काढणाऱ्या चाचेगिरीला विरोध करणे तसेच भारतीय  सागरी क्षेत्रात अंमली पदार्थांचा व्यापार लक्षणीयरीत्या कमी करणे अशा कामगिरींचा समावेश आहे. नाविक कोणत्याही देशाचा असला तरी समुद्रात प्राणाची सुरक्षाहेच सर्वोपरी असल्याचे, भारतीय नौदलाने विविध परिस्थितींमध्ये दिलेल्या प्रतिसादातून अधोरेखित झाले आहे.

***

M.Pange/P.Jambhekar/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016212) Visitor Counter : 178


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil