अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआयने सुमारे 15 कोटी रुपयांचे 1.5 किलो पेक्षा अधिक कोकेन केले जप्त, नायजेरियन नागरिकासह दोघांना अटक

Posted On: 22 MAR 2024 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 22 मार्च 2024

अंमली पदार्थांच्या तस्करीवर सुरु असलेल्या कारवाई अंतर्गत,   महसूल गुप्तचर संचालनालयाच्या  (डीआरआय ) अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय टोळीचा  पर्दाफाश केला आणि सुमारे 15 कोटी रुपये मूल्याचे  1.59 किलो (एकूण वजन  ) कोकेन जप्त केले. ही टोळी  आफ्रिकेतून  भारत-नेपाळ सीमेवरून भारतात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या  पदार्थांची (एनडीपीएस ) तस्करी करत होती.

विशिष्ट गुप्त माहिती प्राप्त झाल्यानंतर, 22.03.2024 रोजी सकाळी बिहारच्या रक्सौल इथून  दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर एका रेल्वेगाडीतून  आलेल्या भारतीय नागरिकाला रोखण्यात आले आणि पांढरी भुकटीयुक्त पदार्थ असलेल्या 92 फिकट पिवळ्या रंगाच्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.एनडीपीएस क्षेत्रीय तपासणी संच वापरून केलेल्या नमुना चाचणीत जप्त केलेल्या पदार्थात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

अंमली पदार्थांची  ही खेप नवी दिल्लीतील द्वारका येथील एका व्यक्तीकडे पोहोचवली जाणार होती, अशी माहिती अधिक  चौकशी दरम्यान मिळाली. त्यांनतर त्वरीत पाठपुरावा करत एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली हा नायजेरियन नागरिक  नवी दिल्लीतील द्वारका येथे  अंमली पदार्थ  एनडीपीएस घेण्यासाठी स्कूटीवरून आला होता.

या तातडीच्या  प्रकरणात, ही टोळी  आफ्रिकन देशांतून थेट किंवा दुबईमार्गे काठमांडू, नेपाळला हवाई मार्गाने ट्रॉली बॅगमध्ये लपवून किंवा शरीरात कॅप्सूल टाकून तस्करी करत होती.  त्यानंतर या टोळीने काठमांडूमधील हॉटेल्ससह पूर्व-निश्चित ठिकाणाहून अंमली पदार्थ  गोळा करण्यासाठी नवी दिल्लीहून काठमांडूला उड्डाण केलेल्या भारतीय नागरिकांचा वापर केला आणि भारत-नेपाळ सीमा ओलांडून अंमली पदार्थांची  तस्करी केली. त्यानंतर ही खेप रस्ते मार्गाने किंवा रेल्वेने  नवी दिल्लीला घेऊन जाण्याचे नियोजन होते.

1.59 किलो (एकूण वजनाचे  ) वजनाच्या  92 कॅप्सूलमध्ये लपवून ठेवलेले कोकेन जप्त करण्यात आले, याची  किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. हे अंमली पदार्थ पोहोचवणारा  आणि प्राप्तकर्ता दोघांना अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस ) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली.

याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2016122) Visitor Counter : 101