संरक्षण मंत्रालय
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी वेलिंग्टन येथे संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाच्या 79 व्या तुकडीला केले संबोधित
भारतीय हवाई दलाचे समकालीन आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज हवाई दलात होणारे परिवर्तन चौधरी यांनी केले विशद
Posted On:
22 MAR 2024 4:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 22 मार्च 2024
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी आज वेलिंग्टन येथे संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाला (डीएसएससी) भेट दिली. त्यांनी या महाविद्यालयातल्या भारतीय सशस्त्र दलाच्या आणि मित्र देशातील छात्र अधिकाऱ्यांच्या 79 व्या तुकडीला मार्गदर्शन केले.
भारतीय हवाई दलासमोरील आव्हाने, क्षमता विकास नियोजन तसेच लष्करी मोहिमांसाठीचे सामान्य धोरण, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणी हे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणातून मांडले. भारतीय हवाई दल सध्या काळानुरूप आधुनिक होत असून भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होत असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाशातील मोहिमा यशस्वी करण्यासाठी अधिक वेगवान, लवचिक आणि सक्षम भारतीय हवाई दलाच्या दृष्टिकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. आपत्तीच्या काळात संकटग्रस्त भागातून भारतीय समुदायाची सुटका करण्यात भारतीय हवाई दलाचा सिंहाचा वाटा राहिल्याचे त्यांनी सांगितले. रशिया- युक्रेन युद्ध आणि इस्त्रायल- हमस संघर्ष या सध्याच्या प्रसंगातून हवाई दलाच्या सामर्थ्याबद्दलचे महत्त्वपूर्ण ज्ञान मिळाल्याचे ते म्हणाले.
महाविद्यालयात सध्या सुरू असलेला प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच लष्करी मोहिमांसाठीचे सामान्य धोरण, कार्यप्रणाली आणि अंमलबजावणीशी या प्रशिक्षणाचा असलेला संबंध याविषयीही चौधरी यांना माहिती देण्यात आली.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016083)
Visitor Counter : 128