संरक्षण मंत्रालय

म्हैसूरमधील बीईएमएल येथे मुख्य रणगाड्यांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 1500 एचपी इंजिनची घेण्यात आली पहिली चाचणी


भारताची लष्करी क्षमता उंचावणारा हा परिवर्तनकारी क्षण असल्याचे संरक्षण सचिवांचे प्रतिपादन

Posted On: 20 MAR 2024 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 मार्च 2024

संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2024 रोजी म्हैसूर संकुलातील बीईएमएलच्या इंजिन विभागात मुख्य रणगाड्यांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 1500 अश्वशक्तीच्या (एचपी) इंजिनची पहिली चाचणी घेण्यात आली. ही कामगिरी देशाच्या संरक्षण क्षमतेच्या नव्या युगाची सुरुवात आहे, यात संरक्षण तंत्रज्ञानातील तांत्रिक कौशल्य आणि आत्मनिर्भरतेची वचनबद्धता दिसून येते.

हे 1500 एचपीचे इंजिन लष्करी प्रणोदन (गाडी पुढे ढकलणारी) प्रणालींमधील एक आदर्श बदल दर्शवते. उच्च शक्ती - ते - वजन गुणोत्तर, समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर, उणे शून्य तापमानात आणि वाळवंटातील वातावरणासह अत्यंत टोकाच्या परिस्थितीतही कार्यक्षमता सिद्ध करणारी अत्याधुनिक वैशिष्ट्ये यात आहेत. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन जागतिक स्तरावरील सर्वात प्रगत इंजिनांच्या तोडीचे आहे.

संरक्षण सचिवांनी यावेळी चाचणी कक्षाचे उद्घाटन केले. सशस्त्र दलांची क्षमता उंचावणारा हा परिवर्तनकारी क्षण असल्याचे ते म्हणाले. बीईएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शांतनु रॉय म्हणाले की, ही कामगिरी देशातील संरक्षण उत्पादनात प्रमुख योगदान देणाऱ्या बीईएमएलचे स्थान भक्कम करते आणि या महत्त्वाच्या क्षेत्रात देशाच्या गरजा भागविण्यासाठीची त्याची वचनबद्धता अधोरेखित करते.

1500 एचपी इंजिनच्या पहिल्या चाचणीने, तंत्रज्ञान स्थिरीकरणावर लक्ष केंद्रित करून, पहिल्या पिढीचे काम पूर्ण झाल्याचे सूचित केले आहे. दुसऱ्या पिढीमध्ये लढाऊ वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, डीआरडीओच्या प्रयोगशाळेत विविध चाचण्यांसाठी

बीईएमएल इंजिने तयार करेल आणि वापरकर्त्याच्या चाचणीसाठी वास्तविक वाहनांमध्ये त्यांचे एकत्रीकरण करेल. हा प्रकल्प 2025 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प ऑगस्ट 2020 मध्ये सुरु  करण्यात आला. तो वेळेवर पूर्ण होणे आणि गुणवत्ता मानकांचे पालन व्हावे याची खातरजमा करण्यासाठी पाच प्रमुख टप्प्यांमध्ये तो काळजीपूर्वक संरचित करण्यात आला आहे.

बीईएमएल चमूच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी 'वॉल ऑफ फेम' चे उद्घाटनही संरक्षण सचिवांनी केले. देशाच्या संरक्षण क्षमता उंचावण्यासाठी आणि स्वदेशी तांत्रिक नवोन्मेषातील टप्पे साध्य करण्यासाठीच्या त्यांच्या योगदानाचे हे प्रतीक आहे. संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी, संरक्षण उद्योगातील भागीदार आणि बीईएमएल लिमिटेडचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015782) Visitor Counter : 69


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu