संरक्षण मंत्रालय
आयएनएस चिल्का येथे अग्निवीरांच्या तिसऱ्या तुकडीचे (02/2023) दीक्षांत संचलन
प्रविष्टि तिथि:
16 MAR 2024 4:44PM by PIB Mumbai
ओदिशामध्ये आयएनएस चिल्का येथे 15 मार्च 2024 रोजी अग्निवीरांच्या तिसऱ्या तुकडीच्या (02/2023) दीक्षांत समारंभानिमित्त नेत्रदीपक संचलन आयोजित करण्यात आले होती. सूर्यास्तानंतर झालेल्या या समारंभात नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत 396 महिला अग्निवीरांसह एकूण 2,630 अग्निवीरांना या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख, फ्लॅग ऑफिसर व्हाईस ऍडमिरल व्ही श्रीनिवास यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. ख्यातनाम शिल्पकार तसेच पद्मश्री आणि पद्म विभूषण पुरस्कार प्राप्त सुदर्शन साहू हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ख्यातनाम क्रीडापटू तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त एम सुरंजय सिंह, MCPO I (PT) आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे मान्यवर पासिंग आऊट परेडला उपस्थित होते. या कार्यक्रमाला अग्निवीरांचे कुटुंबीयही उपस्थित होते. नौदलाचा 16 आठवड्यांचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल हे दीक्षांत संचलन आयोजित करण्यात आले असून, ही या अग्निवीरांची भारतीय नौदलाच्या सेवेतील नव्या प्रवासाची सुरुवात आहे.
प्रशिक्षणार्थींचे अप्रतिम प्रदर्शन, लष्करी शिस्त आणि अचूक संचलन याबद्दल नौदल प्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले. जागतिक सुरक्षा परिस्थितीत नवीन आव्हाने समोर येत असून, अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अग्निवीरांनी आपल्याला मिळालेल्या प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करायला हवा, असे त्यांनी अधोरेखित केले. अग्निवीरांनी आपल्या कौशल्य वृद्धीसाठी तांत्रिकदृष्ट्या जागरूक राहायला हवे आणि ज्ञानाचा पाया मजबूत करायला हवा, नवीन काही शिकण्याची तयारी ठेवायला हवी आणि आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी वचनबद्ध राहायला हवे असे ते म्हणाले. देशाची सेवा पूर्ण सामर्थ्याने आणि सन्मानाने करताना त्यांनी नौदलाच्या कर्तव्य, सन्मान आणि धैर्य या मूलभूत मूल्यांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अग्निवीरांच्या पालकांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकाऱ्यांनी त्यांची प्रशंसा केली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत अग्निवीरांना पदक आणि चषक प्रदान करण्यात आले.
प्रथमेश अमित दरेकर, अग्निवीर (SSR), सन्नी कुमार रजक, अग्निवीर (MR) यांना पुरुष गटात अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अग्निवीर SSR आणि MR श्रेणी अंतर्गत, नौदल प्रमुख फिरता चषक आणि सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. समृद्धी खांडवे, अग्निवीर (SSR) गुणवत्तेच्या एकूण क्रमानुसार सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर ठरली आणि तिला जनरल बिपिन रावत फिरता चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
तत्पूर्वी, दीक्षांत समारंभात नौदल प्रमुखांनी अंगद डिव्हिजनला सर्वोत्तम कामगिरीसाठीचा चषक आणि शिवाजी डिव्हिजनला उपविजेतेपदाचा चषक प्रदान केला. त्यांनी ‘अंकुर’ या आयएनएस चिल्काच्या द्वैभाषिक प्रशिक्षणार्थी मासिकाच्या उन्हाळी आवृत्तीचे प्रकाशनही केले.
PASSINGOUTPARADEOFAGNIVEERS02-23BATCHATINSCHILKA42U2.jpeg)
PASSINGOUTPARADEOFAGNIVEERS02-23BATCHATINSCHILKA8Q1R.jpeg)
PASSINGOUTPARADEOFAGNIVEERS02-23BATCHATINSCHILKAR8UI.jpeg)
PASSINGOUTPARADEOFAGNIVEERS02-23BATCHATINSCHILKA3V2K.jpeg)
***
M.Pange/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2015229)
आगंतुक पटल : 139