पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी


सुमारे 1.25 लाख कोटी रुपये मूल्याच्या 3 सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी

"भारत एक प्रमुख सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनण्यासाठी सज्ज "

"आत्मविश्वास असलेली तरुणाई देशाचे भाग्य बदलते "

"भारताची झपाट्याने होत असलेली प्रगती आपल्या युवा शक्तीचा आत्मविश्वास वाढवणारी आहे "

"भारत वचनबद्ध आहे, भारत सेवा वितरीत करतो आणि लोकशाहीची अंमलबजावणी करतो "

''चिप उत्पादन भारताला आत्मनिर्भरतेकडे, आधुनिकतेकडे घेऊन जाईल"

"चिप उत्पादन अपार संधींचे दरवाजे खुले करते "

“भारतातील तरुणाई सक्षम आहे आणि त्यांना संधी हवी आहे. सेमीकंडक्टर उपक्रमाने ती संधी आज भारतात आणली आहे”

Posted On: 13 MAR 2024 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमाला संबोधित केले आणि  सुमारे 1.25 लाख कोटी रुपये मुल्यांच्या  तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची  पायाभरणी केली.यात गुजरात येथील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र  (डीएसआयआर ) येथे सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा, आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी (ओएसएटी) सुविधा आणि गुजरातमधील साणंद आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (ओएसएटी)) सुविधा या सुविधांचा समावेश आहे.

गुजरातमधील धोलेरा आणि साणंद तसेच आसाममधील मोरीगाव येथे सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांची पायाभरणी केली जात आहे, हा आजचा ऐतिहासिक प्रसंग  भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे ", असे पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना सांगितलॆ. “आजचे प्रकल्प भारताला सेमीकंडक्टरचे प्रमुख केंद्र  बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील”, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी या मुख्य उपक्रमांसाठी  नागरिकांचे अभिनंदन केले.  तैवानमधील सेमीकंडक्टर उद्योगातील कंपन्या या कार्यक्रमात  आभासी माध्यमातून उपस्थिती होत्या हे लक्षात घेत त्यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल उत्साह व्यक्त केला.  

या अनोख्या कार्यक्रमाशी 60,000 हून अधिक महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था जोडल्या गेल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तरुण हे  भारताच्या भविष्याचे  खरे भाग्यविधाते आहे असे सांगत आजचा हा  कार्यक्रम हा देशाच्या तरुणांच्या स्वप्नांचा कार्यक्रम असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारत आत्मनिर्भरतेसाठी  आणि जागतिक पुरवठा साखळीत मजबूत सहभागासाठी  चौफेर कार्यरत आहे याची साक्षीदार  भारताची तरुणाई आहे असे सांगत  आत्मविश्वास असलेली तरुणाई  देशाचे भाग्य बदलते हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी  आणि आधुनिकीकरणाकडे नेण्यात स्वदेशी उत्पादन म्हणजेच मेड इन इंडिया आणि डिझाईन इन इंडिया चिप्स हे प्रमुख भूमिका बजावतील, असे पंतप्रधानांनी  21 व्या शतकात तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक चिप्सचे केंद्रस्थानाकडे लक्ष वेधून सांगितले. विविध कारणांमुळे पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीपासून वंचित राहिल्यानंतर, भारत आता उद्योग  4.0 या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्याच्या उद्देशाने वाटचाल करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक सेकंदाचा सदुपयोग करण्याच्या गरजेवर भर देत आजचा कार्यक्रम हा सरकार किती वेगाने काम करत आहे याचे उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी  मांडले. सेमीकंडक्टर क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा क्रम मांडत  पंतप्रधानांनी दोन वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर अभियानाच्या घोषणेबद्दल सांगितले आणि काही महिन्यांतच यासाठीचे पहिले सामंजस्य करार झाले आणि आता तीन प्रकल्पांची पायाभरणी केली जात आहे, असे ते म्हणाले.“भारत वचनबद्ध आहे, भारत सेवा वितरण करतो आणि लोकशाहीची अंमलबजावणी करतो ”, असे पंतप्रधान म्हणाले.

आज जगातील मोजकीच राष्ट्रे सेमीकंडक्टर्सची  निर्मिती करत आहेत हे अधोरेखित करत कोरोना महामारीमुळे  निर्माण झालेल्या व्यत्ययानंतर विश्वासार्ह पुरवठा साखळीच्या गरजेवर त्यांनी  भर दिला . भारत यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले आणि देशाच्या तंत्रज्ञान अवकाश , आण्विक आणि डिजिटल सामर्थ्यावर  प्रकाश टाकला.सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भारताने व्यावसायिक उत्पादन घेण्यासाठी  चालना  देणाऱ्या भविष्यातील योजना विशद करताना पंतप्रधान म्हणाले की, " ते दिवस दूर नाही ,जेव्हा भारत सेमीकंडक्टर  क्षेत्रासाठी उत्पादनांच्या निर्मितीमध्ये जागतिक शक्ती बनेल."  व्यवसाय सुलभीकरण आणि कायदे सुलभीकरणाला प्रोत्साहन देत आज घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा भारताला भविष्यात धोरणात्मक फायदा होईल यावर त्यांनी भर दिला. गेल्या काही वर्षांत, 40,000 हून अधिक अनुपालन रद्द करण्यात आले आहेत आणि एफडीआयचे म्हणजेच थेट परदेशी गुंतवणुकीबाबतचे नियमही सोपे करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. संरक्षण, विमा आणि दूरसंचार क्षेत्रातील एफडीआय धोरणांचे उदारीकरण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर उत्पादनासाठी आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर तयार करण्यासाठी पीएलआय  योजना प्रदान केलेल्या तसेच  इलेक्ट्रॉनिक कार्यक्षेत्राच्या वृद्धीसाठी  एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर उत्पादन क्षेत्रात भारताच्या वाढत्या स्थानालाही पंतप्रधानांनी स्पर्श केला. भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.भारताच्या क्वांटम अभियानाची  सुरुवात, नवोन्मेषला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनची स्थापना आणि भारताच्या कृत्रिम अभियानाच्या विस्तारावर प्रकाश टाकत  भारत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याव्यतिरिक्त तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

सेमीकंडक्टर संशोधनाचा तरुणांना सर्वाधिक फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले. सेमीकंडक्टर उद्योगांच्या व्यापकतेचा त्यांनी संदर्भ देत ते म्हणाले की, “सेमीकंडक्टर हा केवळ एक उद्योग नसून तो अमर्याद क्षमता असलेल्या क्षेत्राची कवाडे खुली करतो.” जागतिक चिप डिझाइन आणि निर्मितीमध्ये भारतीय प्रतिभावंताच्या लक्षणीय उपस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले.  यामुळे सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात आज देश पुढे जात असताना भारतीय प्रतिभावंताची परिसंस्था पूर्ण झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या तरुणांना त्यांच्यासाठी निर्माण होत असलेल्या संधींची चांगलीच जाणीव आहे, मग ते अंतराळ असो किंवा मॅपिंग क्षेत्र असो, तरुणांसाठी ही क्षेत्रे खुली केल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.  भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था बनण्यासाठी मिळालेल्या अभूतपूर्व पाठबळ आणि प्रोत्साहनाला त्यांनी श्रेय दिले आणि आजच्या पावलामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात स्टार्टअपसाठी नवीन संधी निर्माण होतील असे ते म्हणाले. आजच्या प्रकल्पांमुळे तरुणांना अनेक प्रगत तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे”, या लाल किल्ल्यावरून त्यांनी केलेल्या विधानाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की या विश्वासाने आखलेली धोरणे आणि निर्णय महत्त्वपूर्ण फलश्रुती देतात.  “भारत आता जुन्या विचारसरणी आणि जुन्या दृष्टिकोनातून खूप पुढे गेला आहे. भारत आता वेगाने निर्णय घेत आहे आणि धोरणे बनवत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.  भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राबाबतच्या स्वप्नांची कल्पना पहिल्यांदा 1960 च्या दशकात करण्यात आली होती परंतु इच्छाशक्ती आणि संकल्पांना सिद्धीमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रयत्नांच्या अभावामुळे तत्कालीन सरकारे त्यावर कृती करू शकली नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले.  देशाची क्षमता, प्राधान्यक्रम आणि भविष्यातील गरजा समजून घेण्यात पूर्वीच्या सरकारांच्या असमर्थतेबद्दलही त्यांनी दु:ख व्यक्त केले. सध्याच्या सरकारच्या दूरदर्शी आणि भविष्यवेधी दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना, विकसित देशांशी स्पर्धा करण्याच्या महत्त्वाकांक्षेसह सेमीकंडक्टर उत्पादनाचा त्यांनी उल्लेख केला. सरकारने देशाच्या सर्व प्राधान्यक्रमांची काळजी घेतली आहे असे ते म्हणाले. गरीबांसाठी पक्की घरे उभारण्यासाठी गुंतवणूक तसेच संशोधनाला प्रोत्साहन देणे,  जगातील सर्वात मोठी स्वच्छता चळवळ राबवणे ते  सेमीकंडक्टर उत्पादनात अग्रेसर वाटचाल आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीसाठी दारिद्र्य कमी करणे ही उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.  “एकट्या 2024 मध्येच 12 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी काल  पोखरणमध्ये झालेल्या भारत शक्ती सरावाचा उल्लेख केला. या सरावाने 21 व्या शतकातील भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची झलक दिसली. भारत अग्नी-5 च्या रूपाने जगाच्या विशेष गटात सामील होत आहे, 2 दिवसांपूर्वी कृषी क्षेत्रात ड्रोन क्रांतीची सुरुवात झाली, जिथे नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना हजारो ड्रोन

सुपूर्द करण्यात आले, भारताच्या गगनयानच्या तयारीला वेग आला आहे आणि नुकतेच भारतातील पहिल्या मेड इन इंडिया फास्ट ब्रीडर अणुभट्टीचे उद्घाटन झाले याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.  “हे सर्व प्रयत्न, हे सर्व प्रकल्प, भारताला विकासाच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहेत आणि निश्चितच, आजच्या या तीन प्रकल्पांचाही यात मोठा वाटा असेल,” असे मोदी म्हणाले.

सध्याच्या जगात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या होत असलेल्या उदयावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि त्यांची भाषणे अल्पावधीतच अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्याचे उदाहरण दिलं. पंतप्रधानांचा संदेश देशभरात विविध भारतीय भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी भारतातील तरुणांचे कौतुक केले. “भारतातील तरुण सक्षम आहेत आणि त्यांना संधी हवी आहे. सेमीकंडक्टर उपक्रमाने आज ही संधी भारतात आणली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. आसाममध्ये आज तीन सेमीकंडक्टर सुविधांपैकी एकाची पायाभरणी होत असल्याचा संदर्भ देत ईशान्येत होत असलेल्या परिवर्तनाचे त्यांनी कौतुक केले.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सर्वांना भारताच्या प्रगतीला बळकटी देण्याचे आवाहन केले आणि, "मोदींची हमी तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी आहे" असे ते म्हणाले.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, सीजी पॉवर आणि  इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडचे अध्यक्ष वेल्लायन सुब्बिया आणि टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

सेमीकंडक्टर रचना, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासासाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे आणि देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे.  या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, गुजरातमधील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (डीएसआयआर) येथे सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा, आसाममधील मोरीगाव येथे आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (ओएसएटी) सुविधा आणि गुजरातमधील साणंद येथे आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (ओ. एस. ए. टी.) सुविधेची पायाभरणी करण्यात आली.

धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (डीएसआयआर) येथील सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (टीईपीएल) उभारणार आहे. भारतात सेमीकंडक्टर फॅबच्या स्थापनेसाठी सुधारित योजनेअंतर्गत ती उभारली जाईल. एकूण 91,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा हा देशातील पहिला व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब असेल.

आसाममधील मोरीगाव येथे, सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग (एटीएमपी) साठी सुधारित योजनेअंतर्गत टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (टीईपीएल) द्वारे आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट (ओएसएटी) सुविधा उभारली जाईल. यासाठी एकूण सुमारे 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

गुजरातमधील साणंद येथे, सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंगसाठी सुधारित योजनेअंतर्गत (एटीएमपी) सी. जी. पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमिटेडद्वारे आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (ओएसएटी) सुविधा उभारली जाईल. त्यासाठी एकूण सुमारे 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.

या सुविधांच्या माध्यमातून सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट होईल आणि भारतात तिचा पाया भक्कम होईल. या युनिट्समुळे सेमीकंडक्टर उद्योगातील हजारो तरुणांना रोजगार मिळेल तसेच इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम इत्यादी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळेल. या कार्यक्रमात हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सेमीकंडक्टर उद्योगातील प्रमुखांसह तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

 

 

 

 

 

* * *

NM/SonalC/Vinayak/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014147) Visitor Counter : 136