सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हार्टफुलनेस संस्थेच्या सहकार्याने संस्कृती  मंत्रालय सर्वात मोठी आध्यात्मिक परिषद करणार आयोजित


हैद्राबाद येथील कान्हा शांती वनम या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्रात  14 ते 17 मार्च दरम्यान जागतिक अध्यात्म महोत्सव 2024 चे होणार आयोजन

या शिखर परिषदेला  राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती राहणार उपस्थित

Posted On: 09 MAR 2024 6:53PM by PIB Mumbai

 

संस्कृती  मंत्रालय (विशेष विभाग) आणि हार्टफुलनेस संस्था, 14 ते 17 मार्च दरम्यान जागतिक अध्यात्म महोत्सव नावाची एक विशिष्ट आध्यात्मिक परिषद आयोजित करणार आहेत. ही परिषद हैदराबाद शहराच्या बाह्यवर्ती भागात असलेल्या  हार्टफुलनेस संस्थेचे मुख्यालय - कान्हा शांती वनम येथे आयोजित करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्रात आयोजित या परिषदेत सर्व धर्म आणि पंथाचे आध्यात्मिक नेते एकत्र जमणार आहेत. आज हैदराबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, संस्कृती  मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आगामी जागतिक अध्यात्म महोत्सव आणि त्याचे महत्त्व विशद केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड  हे अनुक्रमे 15 आणि 16 मार्च रोजी शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.  संस्कृती  मंत्रालय आणि हार्टफुलनेस यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या चार दिवसीय अध्यात्म शिखर परिषदेची मुख्य संकल्पना "आंतरिक  शांती ते जागतिक शांती" अशी आहे.  या परिषदेचे उद्दिष्ट आंतरधर्मीय संवाद घडवून आणणे आणि प्रत्येक वयोगटातील आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांना दैनंदिन जीवनात अध्यात्माशी जोडण्यास मदत करणे हा आहे.

भारत संस्कृती, अध्यात्म आणि जगाला प्रेरणा देणाऱ्या  जीवनशैलीचा दर्शक आहे,'' असे  केंद्रीय  मंत्री जी. किशन रेड्डी यावेळी म्हणाले .  ''आपण आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगासमोर मूर्तीमंत उदाहरण म्हणून उभे आहोत आणि सोबतच जगाची आध्यात्मिक राजधानी बनलो आहोत. '' असेही ते म्हणाले.

या परिषदेत 100,000 हून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.  या शिखर परिषदेमध्ये विविध गटांमध्ये चर्चा, अध्यात्माशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम, भारताचा अध्यात्मिक इतिहास, शांती कथा  तसेच पुस्तके आणि संगीताच्या माध्यमातून अध्यात्माचा एक मंत्रमुग्ध अनुभव दाखवणारे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.  ज्यांना तंदुरुस्तीसाठी आणि उपचारात्मक सत्रांचा लाभ घेण्याची इच्छा आहे अशा सहभागींसाठी  पंचकर्म केंद्रे देखील स्थापन केली जाणार आहेत.

जागतिक अध्यात्म महोत्सवासाठी एकत्र येणाऱ्या संस्थांमध्ये पुढील संस्थाचा ठळक सहभाग असणार आहे - रामकृष्ण मिशन, परमार्थ निकेतन, आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन, द माता अमृतानंदमयी मठ, हैदराबादचे आर्चबिशप, रेव्हरंड कार्डिनल अँथनी पूल, चिन्ना जियार स्वामी, ब्रह्मा कुमारी, पतंजली योगपीठमहर्षि फाऊंडेशन (ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन), ईशा फाऊंडेशन, इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (आयबीसी), शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, हैद्राबादचे आर्कडायोसेस, राष्ट्र संत तुकडोजी महाराज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर देवस्थान, अखिल भारतीय इमाम संघटना, श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर आणि श्री रामचंद्र मिशन किंवा हार्टफुलनेस.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2013096) Visitor Counter : 134


Read this release in: English , Urdu , Hindi , Assamese