कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 साजरा
“नागरी सेवेतील महिला” या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
सुजाता चतुर्वेदी, क्रीडा सचिव, अनिता प्रवीण, अन्न प्रक्रिया उद्योग सचिव आणि निधी खरे, ओएसडी, ग्राहक व्यवहार यांचे प्रमुख मार्गदर्शन
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2024 11:42AM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 च्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने काल "नागरी सेवेत महिला" या विषयावर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वार्षिक गोलमेज वेबिनार आयोजित केले. 'काऊंट हर इनः इन्व्हेस्ट इन वुमन, एक्सेलरेट प्रोग्रेस "ही या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना होती. सर्व मंत्रालये/ विभाग, राज्य एआर विभागांचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुजाता चतुर्वेदी, सचिव क्रीडा विभाग, भारत सरकार, अनिता प्रवीण, सचिव, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार आणि निधी खरे, विशेष अधिकारी, ग्राहक व्यवहार विभाग, भारत सरकार. डीएआरपीजी या वेबिनारच्या प्रमुख वक्त्यांनी यामध्ये मार्गदर्शन केले. डीओपीपीडब्ल्यू चे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन (आयडब्ल्यूडी) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानता साध्य करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांच्या मार्गात येणाऱ्या विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्याची संधी प्रदान करतो. केंद्र आणि राज्य पातळीवर सरकारमधील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीदरम्यान अनुभवलेल्या प्रेरणादायी क्षणांबद्दल वक्त्यांनी माहितीची देवाणघेवाण केली.
भारतीय खेळांमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या सरकारी धोरणांवर सुजाता चतुर्वेदी, सचिव, क्रीडा विभाग, भारत सरकार यांनी भर दिला. त्यांनी सध्या भारतात प्रचलित असलेल्या खेळांसाठीच्या स्पर्धात्मक वातावरणाची सविस्तर माहिती दिली आणि हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 दरम्यान भारतीय खेळाडूंच्या, विशेषतः महिला खेळाडूंच्या असाधारण कामगिरीचे कौतुक केले. 2030 सालच्या युवा ऑलिम्पिकचे आणि 2036 सालच्या उन्हाळी ऑलिम्पिकचे भारताकडून आयोजन करण्याचा सरकारचा दृष्टीकोनही त्यांनी मांडला.
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या विशेष कर्तव्यावरील अधिकारी(ओएसडी) निधी खरे यांनी ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणावर भर दिला. ग्राहक हक्कांचे उल्लंघन, अनुचित व्यापार पद्धती आणि सार्वजनिक हितासाठी आणि ग्राहक कल्याणासाठी पूर्वग्रहदूषित करणाऱ्या खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे नियमन करण्याच्या जबाबदारीने ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची (सी. सी. पी. ए.) स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ग्राहक संरक्षणावर या नियमांचा परिणाम आणि त्याचे महत्त्व सर्वांसमोर मांडले आणि ग्राहकांच्या हक्कांचे प्रभावी पद्धतीने संरक्षण करणाऱ्या आणि त्यांना बळकटी देणाऱ्या सीसीपीएच्या उपाययोजनांची उदाहरणे दिली.
भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सचिव अनिता प्रवीण यांनी अनेक महिला केंद्रित उपक्रमांसह अनेक नवकल्पना आणि सहयोग पुढे नेण्यासाठी अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या प्रयत्नांची माहिती सादर केली. स्टार्ट-अप फोरम फॉर एस्पायरिंग लीडर्स अँड मेंटर्स (सुफलाम) 2024, पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (पीएमएफएमई) आणि टोमॅटो, कांदे आणि बटाट्यांसाठी ऑपरेशन ग्रीन्स-योजनांना महिला उद्योजकांच्या प्रतिसादाबद्दल तपशीलवार माहिती दिली.
2023 मध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये कृषी-उद्योग हा एक महत्त्वाचा भाग असल्याने त्यांनी भारतात “श्री अन्न”ला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांची माहिती दिली. जया दुबे, संयुक्त सचिव, डीएआरपीजी यांनी आभारप्रदर्शन केले.





***
M.Iyengar/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2012987)
आगंतुक पटल : 122