रेल्वे मंत्रालय
भारतातील इतर केंद्रीय निमलष्करी दलांच्या तुलनेत रेल्वे संरक्षण दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 9 टक्के
Posted On:
08 MAR 2024 9:38AM by PIB Mumbai
रेल्वे सुरक्षा दल (आर. पी. एफ.) ही भारतातील रेल्वे सुरक्षा क्षेत्रातील एक प्रमुख सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी संस्था आहे. रेल्वेच्या मालमत्तेचे अधिक चांगले संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी 1957 मध्ये याची स्थापना झाली. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा यात दलाची महत्वाची भूमिका आहे. प्रेम, काळजी, सामर्थ्य आणि शाश्वततेचे प्रतीक म्हणून महिला ओळखल्या जातात. हाच धागा पकडत रेल्वे संरक्षण दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण 9 टक्के आहे. भारतातील इतर केंद्रीय निमलष्करी दलांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.
या महिला सुरक्षा कर्मचारी विशेष प्रशिक्षित आहेत. त्या, सुरक्षिततेची खातरजमा करतात, संकटातील महिला प्रवाशांना मदत करतात, एकूणच प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण तयार करतात. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना महिला कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर. पी. एफ. ने विविध उपाययोजना केल्या आहेत.
विविध कामकाजा अंतर्गत त्यांच्या भूमिकेचे प्रमुख पैलू -
1. महिला सुरक्षेची काळजी घेणे -
मेरी सहेली उपक्रम - भारतीय रेल्वेत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एकट्याने किंवा अल्पवयीन मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना सुरक्षितता आणि संरक्षण प्रदान करणे हा आहे. सध्या, सरासरी 230 पथके यासाठी तैनात केल्या जात आहेत. यात भारतीय रेल्वेमधील दररोज सरासरी 400 पेक्षा जास्त गाड्यांचा समावेश आहे.
महिला प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण असावे याची खातरजमा करून, महिलांच्या डब्यांमध्ये अयोग्यरित्या प्रवास करताना आढळलेल्या व्यक्तींना पकडण्यात या पथकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
2023 या वर्षात महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमधून प्रवास करताना आढळलेल्या 77839 पुरुषांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
2. ऑपरेशन मातृशक्ती - आर पी एफ कर्मचारी, विशेषत: महिला अधिकारी, त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या ट्रेन प्रवासादरम्यान प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत करतात. एकट्या 2023 मध्ये आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी 206 बाळंतपणात मदत केली.
3. ऑपरेशन आहट (मानवी तस्करी विरोधात) - मानवी तस्करीच्या बाबतीत महिला आणि बालिका सर्वात असुरक्षित आहेत. आरपीएफने मानवी तस्करीविरोधात कारवाई सुरू केली आहे. 2023 मध्ये, 257 तस्करांसह 1048 व्यक्तींची तस्करांपासून सुटका करण्यात आली.
4. ऑपरेशन नन्हे फरिश्ते - रेल्वेला सापडलेल्या, देखभालीची आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी एक तीव्र मोहीम सुरू करण्यात आली आहे. 2023 मध्ये आरपीएफने 3973 मुलींची सुटका केली.
5. ऑपरेशन डिग्निटी- देखभाल आणि संरक्षणाची गरज असलेल्या महिलांसह प्रौढांना वाचवण्यातही आरपीएफ महिला कर्मचारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या व्यक्ती घरुन पळून आलेल्या, सोडून दिलेल्या, अंमली पदार्थांचे व्यसन असलेल्या, निराधार किंवा वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या असू शकतात. 2023 मध्ये अशा सुमारे 3492 व्यक्तींची सुटका करण्यात आली.
***
NM/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012665)
Visitor Counter : 118