गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता येथे बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
दिल्ली-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरच्या दुहाई-मोदीनगर (उत्तर) विभागाचेही उद्घाटन
अलिकडच्या वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासात भारताने अनुभवली गती: मंत्री हरदीप सिंग पुरी
Posted On:
06 MAR 2024 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2024
शहरातील रहदारी अधिक सहजसोपी करण्यासाठी विविध मार्ग विकसित झाले पाहिजेत, या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. हावडा मैदान - एस्प्लेनेड मेट्रो विभाग, कवी सुभाष - हेमंता मुखोपाध्याय मेट्रो विभाग, तरातला - माजेरहाट मेट्रो विभाग (जोका-एस्प्लानेड मार्गिकेचा भाग); पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंत पुणे मेट्रो; एसएन जंक्शन मेट्रो स्टेशन ते त्रिपुनिथुरा मेट्रो स्टेशन पर्यंत कोची मेट्रो रेल पहिला टप्पा, विस्तार प्रकल्प (फेज आयबी); आग्रा मेट्रोचा ताज पूर्व गेट ते मनकामेश्वरपर्यंतचा मार्ग; आणि दिल्ली-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरचा दुहाई-मोदीनगर (उत्तर) विभाग या प्रकल्पांचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. या विभागांतील रेल्वेगाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. पिंपरी चिंचवड मेट्रो-निगडी दरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तारीकरण कामाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांनी सर्व मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला आणि कोलकात्यामध्ये भारतातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोने, एस्प्लेनेड - हावडा मैदान मेट्रो मार्गावर प्रवास केला. या मेट्रो प्रवासादरम्यान त्यांनी श्रमिक आणि शाळकरी मुलांशीही संवाद साधला.
पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोलकाता येथून प्रकल्पांचे उद्घाटन केल्यावर, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे उत्तर प्रदेशातील मुरादनगर येथे दुहाई ते मोदी नगर उत्तरेपर्यंत दिल्ली-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरच्या 17 किमी लांब भागाच्या उद्घाटनाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री म्हणाले की, भारतातील पायाभूत सुविधा, विशेषत: शहरी वाहतूक क्षेत्राकडे 2014 पूर्वीच्या सरकारांनी दुर्लक्ष केले होते. “वर्ष 2014 मध्ये केवळ 248 किमीच्या मेट्रो मार्गिका कार्यान्वित होत्या, तथापि आजच्या उद्घाटनानंतर आम्ही भारताच्या आधुनिक मेट्रो प्रणालींचा विस्तार 939 किमीपर्यंत केला आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 1 कोटी पार होणे हा आमच्या यशाचा पुरावा आहे. पंतप्रधानांच्या 'गती शक्ती दृष्टिकोनाच्या' अनुषंगाने, प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी एकत्रित करण्यात येत आहे.
* * *
S.Bedekar/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012073)
Visitor Counter : 92