संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री सीबर्ड प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांचे करणार उद्घाटन

Posted On: 04 MAR 2024 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मार्च 2024

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 5 मार्च 24 रोजी नौदल तळ कारवार येथे नौदल अधिकारी आणि संरक्षण क्षेत्रातील नागरी कर्मचाऱ्यांसाठी 320 घरे तसेच  149 एकल अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा समावेश असलेल्या दोन प्रमुख जेट्टी आणि सात निवासी टॉवर्सचे उद्घाटन करणार आहेत.

सीबर्ड प्रकल्पाचा  पहिला टप्पा 10 जहाजे सामावून घेण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला होता आणि 2011 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. पायाभूत सुविधांमध्ये ब्रेकवॉटर, 10 जहाजांना बर्थिंग करण्यास सक्षम एक जेट्टी , 10,000- टन वजनाचे जहाज उचलण्यासाठी शिप लिफ्ट  आणि ड्राय बर्थ,  जहाज दुरुस्ती यार्ड,  लॉजिस्टिक्स आणि  शस्त्रास्त्र साठवण सुविधा, 1000 कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था , मुख्यालय/डेपो इमारत  आणि 141 खाटांचे नौदल रुग्णालय यांचा समावेश  आहे.

प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीमध्ये (सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समिती)  23 यार्डक्राफ्टसह 32 जहाजे आणि पाणबुड्या नांगरण्यासाठी जागा यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या भागात (IIA) पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि भारतीय हरित भवन परिषदेने आखून दिलेल्या  मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या इमारती आणि संरचना बांधण्यासाठी निर्देश देण्यात आले होते. टप्पा IIA च्या सागरी कामांमध्ये जहाजे/पाणबुडींना सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेल्या जेट्टी , 6 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची बर्थिंग जागा, तांत्रिक सुविधा, विद्युत उपकेंद्रे , स्विच गीअर्स आणि सहाय्यक सुविधा यांचा समावेश होतो. टप्पा IIA कामाचा केंद्रबिंदू हा एक बंदिस्त ड्राय  बर्थ आहे, जो 75 मीटर उंचीवर आहे, जो दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षा उंच आहे आणि 33000 वर्ग मीटरच्या  भूभागावर पसरलेला आहे. हा ड्राय बर्थ एकाचवेळी चार मोठ्या जहाजांसाठी डॉकिंग आणि  सर्वसमावेशक देखभाल सुलभ करण्याच्या दृष्टीने तयार  केला आहे.  

टप्पा -IIA मध्ये, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, वरिष्ठ आणि कनिष्ठ खलाशी आणि  नागरी कर्मचाऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुमारे 10,000 निवासस्थानांसह चार वेगवेगळ्या टाऊनशिप बांधल्या जात आहेत. 2700 मीटर धावपट्टी आणि सिव्हिल-एनक्लेव्हसह ग्रीन फील्ड ड्युअल-यूज नौदल तळामुळे नौदलाच्या  विविध प्रकारच्या जहाजांवर उतरणाऱ्या  विमानांना हवाई सहाय्य उपलब्ध होईल  आणि व्यावसायिक विमान उड्डाणांचे संचालन सुलभ होईल.

कारवार मधील नौदल तळ येथे सुरू असलेल्या बांधकामांमुळे सुमारे 7,000 कर्मचाऱ्यांना थेट रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि अप्रत्यक्षपणे देशभरात सुमारे 20,000 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. पायाभूत सुविधांचा विकास आत्मनिर्भर भारताच्या तत्त्वांशी अनुरूप असून यामध्ये 90% पेक्षा जास्त साहित्य आणि उपकरणे देशातूनच मागवण्यात आली आहेत. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, हा नौदल तळ  सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांना सरकारी रोजगार प्रदान करेल असा अंदाज आहे.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2011397) Visitor Counter : 105


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil