संरक्षण मंत्रालय
एमएच 60 आर 'सीहॉक्स' हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात आयएनएएस 334 पथक म्हणून दाखल होणार
Posted On:
03 MAR 2024 4:21PM by PIB Mumbai
आयएनएस गरुड, कोची येथे 6 मार्च 2024 रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात, एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती ) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षण विषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या या नावाने कार्यरत होणार आहे. 24 हेलिकॉप्टरसाठी,अमेरिकी सरकारसोबत फेब्रुवारी 2020 मध्ये एफएमएस करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या त्याचा ही हेलिकॉप्टर भाग आहेत.
सीहॉक्सच्या समावेशाने, भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे. अँटी-सबमरीन वॉरफेअर (ASW) म्हणजे पाणबुडी रोधी युद्ध, अँटी-सर्फेस वॉरफेअर (ASuW) म्हणजे पाण्यातून केलेले जमिनीवरील युद्ध, शोध आणि बचाव कार्य (सर्च अँड रिलीफ-SAR), मेडिकल इव्हॅक्युएशन (MEDEVAC) म्हणजे अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णांची केली जाणारी वाहतूक आणि व्हर्टिकल रिप्लेनिशमेंट (VERTREP) म्हणजे समुद्रात जहाजांना हवाई मार्गाने केला जाणारा पुरवठा, या दृष्टीने या हेलिकॉप्टरची रचना केलेली आहे. भारतीय वातावरणासाठी योग्यतेच्या अनुषंगाने,या हेलिकॉप्टर्सची कसून चाचणी घेण्यात आली आहे आणि ती पूर्णपणे साजेशी आहेत. भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा गरजा पुरवण्याच्या दृष्टीने, आधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि हवाई इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी (एव्हियोनिक्स सूट) परिपूर्ण सीहॉक्स आदर्श ठरतात. यामुळे पारंपरिक तसेच अचानक उद्भवणाऱ्या धोक्यांसाठी वाढीव क्षमता मिळते.
एमएच 60 आर हेलिकॉप्टर्स भारताची सागरी क्षमता वाढवतील, तसेच नौदलाच्या कार्यकक्षेचा विस्तार करतील आणि सागरी क्षेत्राच्या विशाल परिघात, नौदलाच्या विविधांगी सातत्यपूर्ण कार्यवाहीला पाठबळ देतील. हिंद महासागर क्षेत्रात सीहॉकची तैनाती, भारतीय नौदलाचे सागरी अस्तित्व मजबूत करेल, संभाव्य धोके दूर करेल आणि या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रदेशात सुरक्षित आणि निर्धोक वातावरण सुनिश्चित करेल.
सीहॉक्सचा ताफ्यात समावेश हे भारतीय नौदलाचे सागरी सुरक्षा मजबूत करण्याप्रति दृढ समर्पण अधोरेखित करते. तसेच या क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या दूरदर्शी ध्येयाला हे अनुरूप आहे.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2011107)
Visitor Counter : 158